पं. बिरजू महाराज
जीवनी
जन्म :
४ फेब्रुवारी १९३८ भारतीय संगीताच्या परंपरेमध्ये विविध नृत्यशैलींचा मोठा प्रभाव आहे. त्यामधील कथ्थक नृत्याला जागतिक रंगमंच मिळवून देण्याचे कार्य अनेक महान नर्तक/ नृत्यांगणांनी केले. त्यामध्ये पद्मभूषण पं. बिरजू महाराज यांचे नाव विशेषत्वाने घ्यावे लागेल.
जन्म व बालपण :
पं. बिरजू महाराज यांचा जन्म ४ फेब्रुवारी, १९३८ साली लखनौ येथे झाला. त्यांचे मूळ नाव ब्रिजमोहन मिश्रा असे आहे. संगीताचा फार मोठा वारसा घेऊन पं. बिरजू महाराज जन्माला आलेले आहेत. ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ या उक्तीप्रमाणे पं. बिरजू महाराजांचे वडील पं. अच्छनमहाराज जेव्हा इतर शिष्यांना नृत्याची तालीम देत असत त्यावेळी बाल बिरजू त्याचे तंतोतंत अनुकरण करायचे. इतर शिष्यांचे गंडाबंधन ते नेहमी पाहात असत. बिरजू महाराजांनी थोडे पैसे जमा केले आणि वडील अच्छन महाराजांकडे आपल्यालाही गंडाबंधन करावे असा आग्रह धरला आणि खऱ्या अर्थाने हा बाल हट्ट व नृत्यविषयीची आवड पाहून अच्छन महाराजांनी त्यांना अगदी बालवयातच नृत्याचे धडे देण्यास सुरुवात केली.
गुरू व शिक्षण :
खऱ्या अर्थाने वडील व गुरू पं. अच्छन महाराज यांच्याकडून कथ्थक नृत्याची तालीम घ्यायला बिरजू महाराजांनी सुरुवात केली. अगदी बालवयातच नृत्य शैलीतल्या अनेक गोष्टी शिकून घेतल्या. बालवयामध्येच डेहराडून येथे त्यांनी आपल्या नृत्याचा कार्यक्रम करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. या दरम्यान दुर्दैवाने बिरजू महाराज यांच्यावर फार मोठा आघात झाला. अच्छन महाराजांचे देहावसान झाले. बालवयातील हा आघात बिरजू महाराजांनी मोठ्या धैर्याने सहन केला. वडिलांच्या मृत्यूनंतर बिरजू महाराजांच्या जीवनाला मोठी कलाटणी मिळाली. यानंतर बिरजू महाराज आपल्या मातोश्री श्रीमती महादेवी यांच्याबरोबर आपल्या आजोळी लखनौ येथे स्थायिक झाले. त्यानंतर त्यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून त्यांचे काका पं. शंभू महाराज आणि लच्छु महाराज यांच्याकडून कथ्थकमधील रितसर तालीम घेतली.
सांगीतिक कार्य :
सन १९५३ च्या दरम्यान दिल्ली येथे भारतीय कलाकेंद्राची स्थापना झाली. तेव्हापासून पं.बिरजू महाराज हे या केंद्राशी संबंधित आहेत. या ठिकाणी मात्र खऱ्या अर्थाने पंडितजींच्या अंगभूत आविष्काराला मोठा वाव मिळाला. ‘मालती माधव’, ‘कुमार संभव’, ‘डालिया’ अशा अनेक नृत्यनाटिकांच्या रचना त्यांनी केल्या. देशभरातल्या अनेक मैफिलींमधून या नृत्यनाटिकांना मोठा प्रतिसाद मिळाला. भारत सरकारच्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्रमुख कलाकार या नात्याने त्यांचा सहभाग राहिलेला आहे.
चित्रपट क्षेत्रातील योगदान :
पं.बिरजू महाराजांचे चित्रपट सृष्टीत मोठे योगदानआहे. अनेक चित्रपट गीतांचे नृत्यदिग्दर्शन पंडितजींनी केलेले आहे. १९७७ साली सत्यजीत राय यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ या चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शन करण्याबरोबरच गीतगायनही त्यांनी केले आहे. २००२ साली फिल्म देवदासमधील अप्रतिम अशा ‘काहे छेड छेड मोहे’ या शास्त्रीय संगीतावर आधारित उत्कृष्ट नृत्य संयोजन त्यांनी केले. याचबरोबर डेढ इश्कीया, उमरावजान, बाजीराव मस्तानी अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे.
पंडितजींची नृत्यशैली :
पं.बिरजू महाराज एक उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक व नर्तक म्हणून सर्वांना परिचित आहेत. परंपरागत नृत्यशैलीचे शिक्षण त्यांनी घेतलेले असले तरी वर्तमानाला अनुकूल असे नवनवीन प्रयोग ते नेहमीच करतात. त्यांच्या नृत्यामध्ये प्रामुख्याने सौंदर्यपूर्णता, लयकारी व कलात्मकतेचा सुंदर समन्वय आपल्याला पाहायला मिळतो. त्यांनी भावप्रदर्शनाच्या माध्यमातून केलेला लय-लयकारीचा आविष्कार सर्वसामान्य रसिकांनाही मंत्रमुग्ध करतो. पं.बिरजू महाराज हे एक अष्टपैलू कलावंत आहेत. उत्तम नृत्य करण्याबरोबरच गायन, तबला, पखवाज, ढोलक ही वाद्येही ते अत्यंत सफाईदारपणे वाजवतात. नृत्यनाटिकांच्या संगीत रचनाही ते स्वतः करतात.
मानसन्मान व पुरस्कार :
एक उत्तम नर्तक, उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक, नृत्य गुरू, गायक, वादक अशा अनेक कार्यांमध्ये समर्पित झालेले व्यक्तिमत्व म्हणून पंडितजींचा नावलौकिक आहे. त्यांच्या या महत्त्वपूर्ण सांगीतिक योगदानाबद्दल त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. प्रामुख्याने भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या पुरस्काराने त्यांचा यथोचित गौरव केला. उत्तर प्रदेश सरकारने ‘कालिदास’ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. याचबरोबर काशी हिंदू विश्व विद्यालय व खैरागढ विश्वविद्यालय यांनी पंडितजींना मानद डॉक्टरेट ही उपाधी दिली. सोव्हिएत संघाने ‘नेहरू फेलोशिप’ दिली. याशिवाय संगीत नाटक अकादमी पुरस्कार, बाजीराव मस्तानी चित्रपटातील ‘मोहे रंग दो लाल’ या गीताच्या नृत्य दिग्दर्शनाबद्दल फिल्म फेअर अॅवार्ड व लता मंगेशकर पुरस्काराचेही ते मानकरी आहेत.