किराणा घराणे
स्वराची साधना ही बाब किराणा घराण्याने सगळ्यात अधिक महत्त्वाची मानली. रागात सौंदर्य आणण्यासाठी स्वरसुद्धा तितकाच सच्चा, स्थिर व सौंदर्यपूर्ण असला पाहिजे. ह्या गोष्टीला महत्त्व दिल्यामुळे कोणत्याही रागाचा स्वरविस्तार करताना त्या रागातील वादी, संवादी व न्यास स्वर लक्षात घेऊन, प्रत्येक स्वराचा जास्तीत जास्त प्रयोग करून नवीन स्वराकडे वळताना त्याला आधीच्या आलापापासून आवाहन केले जाते. त्यामुळे संगीताच्या विकासाचा विचार करताना किराणा घराण्याने सुरेलपणा व गतिमानता ह्यांच्या विचारातून संगीत अजमावले, जोपासले, फुलवले आणि झुलवले ते फक्त स्वरातूनच. आलापीवर किराणा घराण्याच्या गायकांनी जास्त भर दिल्याने स्वरविलासाची अभूतपूर्व देणगी ह्या घराण्याने संगीताला दिली.
किराणा घराण्याची गायकी तंतअंगाची म्हणजे बीनकारीची आहे. आवाजाच्या लगावात व तानात कृत्रिमता वगैरे काही दोषही आहेत पण स्वरप्राधान्याचा फार मोठा गुण आहे. 'सुर गया तो सिर गया और ताल गया तो बाल गया' असा ह्या गायकीचा विचार. तालप्राधान्य नसले तरी लयकारीचा व लयीचा डौल त्यांनी सांभाळला. इतर घराण्यांच्या मानाने स्वर थोडे चढे, ख्यालाची लय जरा जास्त विलंबित, अप्रसिद्ध किंवा अनवट राग गाणे टाळून स्वयंभू रागांवर जास्त भर, कारुण्य, भक्तिभाव, आर्जव ह्या भावांना सुरेल स्वरांना फुलवणे असा ह्यांचा आलापीचा ढंग आहे. संथपणा व संयम पाळून स्वरप्राबल्यामुळे तालअंग कामापुरतेच ठेवून केलेल्या गायकीमुळे किराणा घराण्याला एक वेगळीच प्रतिष्ठा लाभा किराणा घराण्याचे मूळ संस्थापक बीनकार उ. बंदेअलीखाँ, उत्तरप्रदेशातील पानिपतजवळ अंबालाजवळील किराना नावाच्या गावात राहात होते, म्हणून त्यांच्या पाण्याला किराणा नाव पडले. ग्वाल्हेर गायकी शिकून खाँसाहेबांनी बीन वाद्यावर त्या गायकांचा चांगला उपयोग केला, त्यामुळे त्यांची गायकी डौलदार झाली. किराणा घराण्याचे प्रवर्तक उ. अब्दुल करीमखाँसाहेब ह्यांच्या परिपक्व व भावप्रवण गायकीने, अलौकिक स्वरसाधनेने व गोड सुरेल आवाजाने अख्ख्या महाराष्ट्राला खिळवूनठेवले होते. स्व. रहिमतखाँ व बालगंधर्व सोडल्यास त्याकाळी असा सुरीला गायक झाला नाही. बीनप्रमाणे आंस स्वरात कायम ठेवून आलापी करण्याचे त्यांचे वैशिष्ट्य होते. मुलायमपणा आलापात तर जोरकसपणा तानांमध्ये होता. आलापीत सरगम गाण्याची प्रथा त्यांनीच रूढ केली. भावपूर्ण रसपरिपोष हा त्यांच्या गायकीचा स्थायीभाव होता. लयकारीत सरगम व गमक ह्यांचा सुंदर संगम होता. किराणा घराण्याची परंपरा अशी- किराणा घराण्याची तंत अंगाने वळण घेतलेली गायकी ही त्याची मूळ पीठिका. गेले एक शतक किराणा घराण्याचं सातत्य टिकून आहे, फार मोठी गायकांची परंपरा असूनही चालू आहे ही ह्या घराण्याची संगीत जगतातील फार मोठी कामगिरी आहे.
किराणा घराण्याची वैशिष्ट्ये
१. आलापप्रधान गायकी
२. स्वरप्राधान्यता
३. स्वराचा भावपूर्ण लगाव
४. सुरेलपणा
५. एकेका स्वराने सौंदर्यपूर्ण बढत
६. गायकीची चैनदारी म्हणजे स्वराचा आनंद घेण्याची व देण्याची पद्धत
७. आवाज खुला असतो, कधी नाकेला असतो
८. ख्यालाची लय जास्त विलंबित, एकताल
९. स्वयंभू व प्रचलित राग गाण्याकडे कल.