जयपूर घराणे
सन १८९५-९६ च्या सुमारास अल्लादिया खाँ साहेब करवीर मुक्कामी आले, कोल्हापुरात छत्रपतींच्या दरबारात गायक म्हणून राहिले. खाँसाहेबांनी आपली स्वतंत्र गायकी निर्माण केली. ज्यावेळी त्यांचा आवाज त्यांना साथ देत नव्हता तेव्हाही अतिशय विचाराने त्यांनी आपली गायकी प्रगल्भ करण्याचा प्रयत्न केला. राग संगीताचे स्वर व लय हे मूलाधार असून त्या दोन्ही घटकांची सन्तुलित योजना करून संगीतात सौंदर्य आणण्याची अभिनव योजकता त्यांनी दाखवली. उत्तम सुरेलपणा व लयदारपणा हे घटक विद्यार्थ्यांच्या मनावर ठसविण्यासाठी प्रथम आवाज खुला, निकोप, रुंद, घोटीव व तेजस्वी बनवावा लागतो ही जाणीव त्यांनी संगीत शिकणाऱ्या कलावंतांना करून दिली... संगीताच्या विकासात व प्रसारात ग्वाल्हेर घराण्याच्या खालोखाल या जयपूर घराण्याच्या व त्यातही स्त्री कलावंतांचा फार मोठा वाटा आहे. खाँसाहेबांनी त्यांच्याकडून खूप मेहनत करून घेतली होती. स्त्री च्या आवाजात पुरुषीपणा न आणता ओजस्वीपणा आणण्याचे सामर्थ्य त्यांच्या गायकीत होते. स्वर व लयीचा समन्वय करून रागात सौंदर्याविष्कार करण्याचं जयपूर गायकीचं वैशिष्ट्य ठरलं. अनेक रसांनी युक्त अशा बंदिशी जयपूर घराण्यात असल्याने गायनाविष्कार समृद्ध झाला. उत्तम शिष्य तयार झाले. सुराशी प्रामाणिकपणा व लयीचा डौल याचा समतोल सांभाळून गायकीत सौंदर्य कसं आणायचं याचं शिक्षण शिष्यांना दिलं गेलं.
जयपूर घराण्याची गायकीची वैशिष्टये
१. संक्षिप्त बंदिश
२. वक्र ताना
३. गमकेच्या घुमटाकार ताना
४. आवाजाचा लगाव अकृत्रिम व मोकळा
५. शिल्पाकृतीसारखी लहान लहान तानांच्या आधारे आलापाची बढ़त
६. आवाज निकोप व खुला
७. स्वरसौंदर्यावर विशेष भर व त्या दृष्टीने लयकारी. रांगोळी किंवा कशिदाकाम करावे तसे कोरीव सौंदर्य गायनात ८. स्वर व लयीचे संतुलन
९. मध्यम लयीत तिलवाडा, त्रिताल हे ताल प्रामुख्याने घेऊन विलंबित ख्यालाचे गायन
१०. अप्रचलित व अनवट राग गाण्याकडे कल, उदा. नट, खट खोकर देवसारव, कानडा प्रकार, केदार प्रकार व मिश्र किंवा जोड राग. उदा. बसंती, केदार वगैरे.
११. आलापचारीत कल्पकता व बुद्धिप्रधान गायकी
१२. घरंदाज व दुर्मिळ चीजांचा संग्रह.
संस्थापक जरी मनरंग असले तरी परंपरा खरी सुरू झाली ती अल्लादिया खाँ साहेबांपासूनच. जयपूर घराण्याची गायकी जरी अवघड असली व सर्वसामान्यांना ती डोईजड वाटत असली तरी ह्या गायकीने कलावंतांच्या मनाची पकड़ घेतली व जयपूर घराण्याच्या गायकीचा वृक्ष वटवृक्षासारखा फोफावत गेला. जयपूर घराण्याचे गायक तर सर्वस्वी आदर्श व समतोल गायकी कुठली तर ती जयपूर घराण्याचीच असे मानतात.