पंडित भीमसेन जोशी
भारतीय संगीताला पडलेले एक सोनेरी स्वप्न म्हणजेच किराणा घराण्याचे पंडित भीमसेन जोशी होय. ज्यांनी अभंगवाणीतून महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातील घराघरात आपला स्वर पोहोचवला, आपल्या बुलंद व पहाडी आवाजाने देश विदेशात अभिजात शास्त्रीय संगीत पोहोचवले असे महान भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जीवनकार्याचा आढावा पुढील मुद्द्यांच्या आधारे पाहूया.
जन्म व बालपण :
पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९२२ रोजी कर्नाटकातील रोना या गावी झाला. त्यांचे वडील गुरूराज हे एक शिक्षक होते. भीमसेनने संगीताकडे न वळता वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी शिक्षण घ्यावे असा त्यांचा आग्रह होता. परंतु संगीतात रमणाऱ्या भीमसेनला हे पटले नाही. अखेर भीमसेनांनी घर सोडण्याचे निश्चित केले. संगीत शिक्षणाची अभिलाषा मनात ठेवून त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी घर सोडले आणि ते ग्वाल्हेरात दाखल झाले. त्यांनी गायनाच्या तळमळीपायी उत्तर भारतात अनेक ठिकाणी पायपीट केली.
गुरू आणि शिक्षण :
सुरुवातीला त्यांनी इनायत खॉंयांचे शिष्य जनाप्पा कुर्तकोटी यांच्याकडून गायनाची तालीम घेतली. त्यानंतर जालंदर येथे पंडित मंगतराम यांच्याकडे व ग्वाल्हेर येथे राजाभैय्या पूंछवाले यांच्याकडेही गाण्याचे शिक्षण घेण्याचे त्यांना भाग्य लाभले. त्यानंतर ते रामपूर येथे मुश्ताक हुसेन खॉं यांच्याकडे काही काळ शिकले. त्यानंतर त्यांचा शोध घेत असलेल्या वडीलांनी भीमसेन यांना पुन्हा घरी परत आणले. भीमसेनांची संगीत शिक्षणाची तीव्र ओढ पाहून वडील भीमसेनांना घेऊन जवळच असलेल्या कुंदगोळ गावातील रामभाऊ कुंदगोळकर यांच्याकडे गेले आणि रामभाऊंनी भीमसेनांना शिष्य म्हणून स्वीकारले. रामभाऊ सवाई गंधर्व म्हणून ख्यातनाम होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, भीमसेनांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
पुरस्कार व मानसन्मान :
भीमसेन जोशी यांनी केलेल्या अथक परिश्रमाचे द्योतक म्हणून त्यांना अनेक मानसन्मान मिळाले.
१. पद्मश्रीपुरस्कार
२. संगीत नाटक अकादमी पुरस्कार
३. पद्मभूषण
४. भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला.
जयपूर येथील गंधर्व महाविद्यालयाने त्यांना संगीताचार्य ही पदवी दिली. पुण्याचे टिळक विद्यापीठ, पुणे विद्यापीठ व गुलबर्गा विद्यापीठाने त्यांना डी. लिट. ही पदवी दिली. इतर पुरस्कारामध्येपुण्यभूषण पुरस्कार, तानसेन पुरस्कार इत्यादींचा समावेश आहे.जेम्स बेवरिज् व हिंदी कवी गुलजार यांनी त्यांच्या जीवनावर लघुपट बनवला आहे.
गायकी :
धृपद गायकीच्या तालमीमुळे त्यांचे लयीवर प्रभुत्त्व होते. ते स्वर कसदार लावत. सुरुवातीपासून पकड घेणारी त्यांची गायकी अधिक आक्रमक झाली. गतिमान व स्वरप्रधान गायकी, तिन्ही सप्तकांतील आवाजाची फिरक, अधिक आवर्तनाच्या ताना भरपूर दमसास यामुळे त्यांचे गायन प्रभावी होत असे.
कार्य :
‘धन्य ते गायनी कळा’ या नाटकाचे त्यांनी संगीत दिग्दर्शन केले होते. अनकही, गुळाचा गणपती, वसंतबहार, भैरवी, पतिव्रता, स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाप्रसंगी सादर झालेल्या ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या राष्ट्रीय एकात्मता बहुभाषिक गीतामध्ये त्यांचा मुख सहभाग होता.
सवाई गंधर्व महोत्सव :
भीमसेन जोशींनी, त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थपुणे येथे सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला. त्यांनी सुरू केलेला सवाई गंधर्व संगीत महोत्सव हा भारतातील एक मोठा संगीतोत्सव समजला जातो. पुणे विद्यापीठाच्या ललित कलाकेंद्रात पंडित भीमसेन जोशी यांच्या नावाने अध्यासन केंद्र स्थापण्यात आले आहे. अशा या महान गायकाचे २४ जानेवारी २०११ रोजी पुणे येथे निधन झाले.