भारतीय नृत्याचा प्रसार करून त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी अनेक कलावंतांनी हातभार लावला. त्यामधून सामाजिक संदेश जनसामन्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करणाऱ्या, पारंपरिक कलेला विज्ञानाची जोड देणाऱ्या महान नर्तिका म्हणजे पं. मृणालिनी साराभाई होय. त्यांच्या जीवनकार्याचा आढावा खालील मुद्द्यांच्या आधारे घेता येईल.
जन्म व बालपण :
चेन्नई येथे ११ मे १९१८ रोजी उच्चशिक्षित परिवारात पंडिता मृणालिनी साराभाई यांचा जन्म झाला. रचनात्मकता व कल्पकता त्यांच्यामध्ये लहानपणापासून दिसत होती. जेव्हा त्या चार वर्षाच्या होत्या तेव्हा कुठलेही गाणे ऐकले की त्या गाण्यावर थिरकायला व नृत्याभिनय करायला लागत.
शिक्षण :
पंडिता मृणालिनी साराभाई यांचे प्रारंभिक शिक्षण स्वित्झर्लंडमध्ये झाले होते. तिथे त्यांनी काही पाश्चात्य नृत्यशैलींचेही अध्ययन केले होतो. भारतात आल्यानंतर शिक्षणासाठी शांतिनिकेतन येथे गेल्या. त्या ठिकाणी त्यांना रवींद्रनाथ टागोर अाणि नंदलाल बोस हे महान गुरू लाभले. या दोन गुरूंच्या सान्निध्यात मृणालिनी यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व घडले. पंडिता मृणालिनी साराभाई यांनी भरतनाट्यम्, मोहिनीअट्टम्, कथकली आणि मणिपुरी नृत्याचे शिक्षण गुरू मिनाक्षी सुंदरम् पिल्लई, मत्थुकुमार पिल्लई, चोक्कलिंगम पिल्लई आणि कुंजुकुरूप अशा महान गुरूंकडून मिळवले होते. त्याचप्रमाणे अमेरिकन ॲकॅडमी ऑफ ड्रामॅटिक आर्ट्समधूनही त्यांनी प्रशिक्षण घेतले होते. या सर्वांचा मिलाप यांच्या नृत्यामध्ये होता.
कार्य :
पंडिता मृणालिनी यांनी पारंपरिक कलांना शास्त्र, विद्या आणि विज्ञानाशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यांनी आपल्या कलेला सामाजिक घडामोडींशी जोडले आणि ज्वलंत सामाजिक मुद्दे जोरदारपणे आपल्या नृत्यरचना आणि नृत्यनाटिकांच्या माध्यमातून मांडले. १९६०-६१ च्या दशकात जेव्हा गरीब घरातील मुली हुंडाबळी पडायच्या तेव्हा मृणालिनींनी हुंड्याची समस्या केंद्रस्थानी ठेवून नृत्याची संरचना तयार केली. त्यांनी नारी सबलीकरण, अस्पृश्यता, मानवाधिकाराचे दहन, मानवी मूल्यांचे अवमूल्यन आणि पर्यावरण इत्यादी अनेक विषयांकडे लोकांना आकर्षित केले. या कार्यामध्ये त्यांना पं. राम गोपाल आणि सी. पण्णिकरांसारख्या विद्वान आणि प्रयोगशील नृत्यशिल्पींचाही महत्त्वपूर्ण सहयोग मिळाला.जगप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. साराभाई यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या गुजरातमधील अहमदाबाद शहरात स्थायिक झाल्या. १९४८ मध्ये त्यांनी ‘दर्पण ॲकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ याची स्थापना केली. तिथे वेगवेगळ्या कलाविद्यांचे शिक्षण दिले जाते. १८०० पेक्षा अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी येथून प्रशिक्षित झाले आहेत.
पुरस्कार :
मृणालिनी यांना पद्मश्री पुरस्कार, पद्मभूषण पुरस्काराने अलंकृत केले आहे. त्यांना संगीत नाटक ॲकॅडमीने फेलोशिप प्रदान केली होती. फ्रेंच अर्काईव्हजकडून पदक आणि डिप्लोमा मिळवणारी ही प्रथम भारतीय महिला होती. मेक्सिकन सरकारने त्यांच्या प्रभावशाली नृत्यनाटिकांसाठी त्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित केले होते. तसेच त्यांना इतरही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले होते. प्रख्यात नृत्यांगना, अभिनेत्री आणि समाजसेविका मल्लिका साराभाई या मृणालिनी यांच्या कन्या आहेत. मृणालिनी यांनी ‘मृणालिनी साराभाई द वॉईस ऑफ द हार्ट’ या नावाचे स्वतःचे आत्मचरित्र लिहिले आहे. अशा या महान नृत्यांगना नृत्य जगतात ‘अम्मा’ म्हणून ओळखल्या जात होत्या. २१ जानेवारी २०१६ रोजी त्यांचे निधन झाले.