लावणी व भांगडा नृत्य
लावणी
लावणी हा महाराष्ट्राच्या लोकनृत्यांमधील महत्त्वाचा नृत्यप्रकार आहे. तर ‘लवण म्हणजे सुंदर’ लवण या शब्दावरून लावण्यगीत वा लावणी शब्द तयार झाला आहे.लावणी हा कलाप्रकार शृंगार, वीरता वा भक्ती या रसांचा परिपोष करण्यासाठी पूरक असे माध्यम समजला जातो. ‘लास्य’ रसाचे दर्शन घडवणारी लावणी हा महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय लोककला प्रकार आहे. लास्य रस म्हणजे शृंगाराचा परिपोष असणारा रस होय. लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी (नृत्यातील भाव) यांचा त्रिवेणी संगम. लावणीच्या साथीला तुणतुणे, ढोलकी व पायपेटी ही वाद्येप्रामुख्याने वाजवली जातात.लावणीच्या उत्पत्तीविषयी दोन स्वतंत्र विचार प्रवाह आहेत. लावणीचे मूळ हे संतांच्या विराण्या, गवळण, अभंग यात दिसते. संतांचे संस्कार घेऊन शाहीरांनी ज्या विविधरसांच्या रचना केल्या त्यात लावणीचा समावेश होता. महाराष्ट्रातील संतांचे संस्कार हे तंतांवर (शाहीरांवर) होते. बाराव्या तेराव्या शतकात महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात जी अध्यात्मिक क्रांती झाली त्या क्रांतीपर्वात अनेक संत उदयाला आले. ते भिन्न जातीपातीचे होते. संताचा हा कार्यकाळ थेट सतराव्या शतकापर्यंतचा मानला जातो. त्यानंतर तंतांचा उदय झाला. ज्यात प्रभाकर, रामजोशी, सगनभाऊ, अनंत फंदी आदींचा समावेश होता. या शाहीरांनी अनेक गण, लावण्या रचल्या त्या सर्व लावण्याशृंगारिक होत्या असे नव्हे तर वीररस प्रधान व वात्सल्यप्रधानही होत्या. विसाव्या शतकात पठ्ठे बापूराव, भाऊ फक्कड, अर्जुना वाघोलीकर, हरि वडगावकर, दगडू बाबा साळी, कवी बशीर आणि मोमीन कवठेकर आदी कलावंतांनी गण, गवळण, लावण्या अशी कथागीते रचली. या कथागीतांचीच पुढे वगनाट्ये झाली. लावणीकार बशीर, मोमीन कवठेकर यांनी तब्बल पन्नास वर्षे तमाशा सृष्टीला आपल्या लेखणीतून विविध प्रकारचे मनोरंजनात्मक साहित्य पुरवले. लावणी, गण, गवळण, पोवाडे, सवाल-जवाब आणि वग नाट्य अशासर्व प्रकारच्या लेखातून त्यांनी भरीव असे योगदान दिले आहे. ‘भृंगावती’ गेय रचना म्हणजे लावणी. लावणी म्हणजे चौकाचौकात पदबंध लावत जाणे. कृषिप्रधान संस्कृतीत श्रमपरिहारासाठी जी गीते गायली जातात. त्यांची जातकुळी लावणीसारखीच असते. लावणी शब्दांचे साधर्म्य कृषिसंस्कृतीतील पेरणी, लावणीशी देखील जोडले जाते. संत साहित्यानंतरचा काळ हा लावणीचा उदय काळ मानला जातो.
वेषभूषा :
लावणी नृत्यासाठी महाराष्ट्रातील परंपरेनुसार चालत आलेली नऊवारी साडी, विविध भरगच्च अलंकार, कमरपट्टा बिंदीसह पायात घुंगरू आणि केसांचा अंबाडा व त्यावर गजरा अशी वेशभूषा दिसून येते.
लावणीचे मुख्यत : तीन प्रकार पडतात.
१. नृत्यप्रधान लावणी
२. गानप्रधान लावणी
३. अदाकारी प्रधान लावणी
प्रारंभ काळात लावणी गेय स्वरूपात माहीत होती. नृत्यप्रधान लावणी हे अगदी अलीकडच्या काळातील रूप होय. जुन्नरी, हौद्याची, बालेघाटी, छक्कड, पंढरपुरी बाजाची अशी लावणीची विविध रूपे होत. जुन्नरी व हौद्याची लावणी प्रामुख्याने ढोलकी फडाच्या तमाशात सादर होते. बालेघाटी लावणी ही रागदारी थाटाची विलंबित लयीची लावणी होय. संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या सत्यभामाबाई पंढरपूरकर यांनी पंढरपुरी बाजाच्यालावणीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. छक्कड म्हणजे द्रुत लयीतील उडत्या चालीची लावणी. यमुनाबाई वाईकर यांनादेखील लावणीतील विशेष येागदानाबद्दल संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांनी बालेघाटी लावणीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. भारत नृत्य महोत्सवात पॅरिसला माया जाधव यांनी लावणी सादर केली त्यामुळे लावणीला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठाप्राप्त झाली. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ हा लावणीवर आधारित कार्यक्रम अमेरिकास्थित मराठी कलावंत डॉ. मीना नेरूरकर यांनी सादर केला. त्यामुळे लावणीकडे अभिजनवर्ग वळला हे जरी खरे असले तरी गावोगावच्या जत्रांमधून, उत्सवांमधून लावणी पिढ्यानपिढ्या जनसामान्यांचे मनोरंजन करीत असल्याचे आजही आपल्याला दिसून येते.
भांगडा
भांगडा हे राष्ट्रीय ख्यातीचे लोकनृत्य आहे. भांगडा नृत्याचे उगम स्थान हे ल्यालपूर आहे. पीक आल्यानंतर पंजाबमध्ये लोक मोठ्या आनंदाने त्याचे नाचून स्वागत करतात आणि काही ठिकाणी तर शेतीच्या हंगामात गव्हाची पेरणी झाल्यापासून ते कापणी व मळणी होईपर्यंतच्याकालावधीत रोज रात्री सर्व जण मिळून हे नृत्य करतात. वैशाखी यात्रेबरोबर भांगड्याचा मौसम संपतो. उत्तम पिकाच्या आनंदाप्रीत्यर्थकिंवा विवाहासारख्या मंगलप्रसंगी हे नृत्य करण्याचा प्रघात रूढ आहे. गावातील युवक पौर्णिमेच्या रात्री एखाद्या शेतात एकत्र जमून ढोलाच्यातालावर हे नृत्य करतात. सळसळणारा चैतन्यपूर्ण जोम व उत्कट आनंदाचा प्रत्यय या नृत्यातून पहावयास मिळातो. पंजाबच्या सुफल-समृद्ध संस्कृतीचे प्रतिबिंब या नृत्यातून दिसून येते. पंजाबमधील सर्व लोकनृत्यात भांगडा हे फार लोकप्रिय, ओजस्वी आणि स्फूर्तिदायक लोकनृत्य मानले जाते.
वेषभूषा :
रंगीबेरंगी लुंग्या, पगड्या किंवा फेटे, हातात रुमाल, पायात पंजाबी जोडे (खुस्से), झब्बा, त्यावर जरीचे जाकीटअशी वेशभूषा करून व हातातील काठीला घुंगरू बांधून हे नृत्य करतात. काही नर्तक नाचतानाचता ढोल वाजवणाऱ्याच्या जवळ जाऊन पंजाबी लोकगीतांतील कडवी, उंच किंवा चढत्या स्वरात म्हणतात. या गाण्याच्याओळीनंतर पुन्हा जोरदार नृत्य सुरू होते. अत्यंत उत्साहपूर्ण असे भांगडानृत्य सर्वांनाच आकर्षून घेते.हे नृत्य करत असताना ढोलवादक हा मधोमध उभा असतो. इतर नर्तक त्याच्याभोवती वर्तुळाकार नृत्य करतात. मूळात हे समूहनृत्य असल्याने याला विशिष्ट नर्तनसंख्येचे बंधन नाही. नृत्यातील थकवा थोडासा दूर होऊन नृत्यात रंग भरावा किंवा स्फूर्ती मिळावी म्हणून ‘हडिप्पा’, ‘बल्ले बल्ले’, ‘ओ बले बले’ अशा जोशपूर्ण आरोळ्या देऊन हातात काठ्याघेऊन, खांदे मोठ्या आकर्षकपणे उडवून, बोटाला हातरुमाल बांधून आणि उड्या मारून अनेक आकर्षक कसरती करत टाळ्या वाजवत हे नृत्य करतात. प्रत्येक नृत्य हे गीताशी जोडलेले असते. पण नृत्याची रंगत वाढवण्यासाठी बरेचदा केवळ तालवाद्याच्यासाथीवरही हे नृत्य केले जाते. या नृत्याला स्वतंत्र गायकाची जरूर नसते. एक नर्तक समोर येऊन आवेशपूर्ण ढंगामध्ये गाणे म्हणतो. या गीतामध्ये प्रेम, आनंद या भावनांबरोबरच कित्येकदा दुःख आपत्तीचेही चित्रण असते. रंगमंचावर हे नृत्य सादर करताना प्रथम ढोलवादक येतात व मागून नर्तक येतात. गळ्यात ढोल अडकवलेला वादक मध्यभागी उभे राहून दोन काठ्यांनी ढोल वाजवतो. त्याच्या दोन्ही बाजूंनी पारंगत नर्तक उभे राहून ते संपूर्ण नृत्याचे नेतृत्व करतात. ते मधूनमधून हाताचा पंजा कानावर ठेवून पुढे सरसावून पारंपरिकाबी लोकगीतातील बोली अथवा ढोला देतात. ह्यावेळी नृत्यात काहीसा खंड पडतो व त्यानंतर पुन्हा जोमाने नृत्य सुरू होते. कित्येकदा एखाद्या नर्तकाच्या हातात लांब काठी असून तिच्या टोकावर अनेक रंगांनी सुशोभित केलेली लाकडी चिमणी बसवलेली असते. नर्तक तिची मान व शेपूट दोरीच्या साहाय्याने नृत्याच्या तालावर वर खाली करतो. त्यामुळे या नृत्याला किंचित विनोदाची झालर प्राप्त होते. हे लोकनृत्य असल्याने परंपरागत शरीर हालचालीखेरीज इतरही उत्स्फूर्त हालचाली करण्याचा प्रघात दिवसेंदिवस रूढ होत चाललेला आहे. हे मूलतः पुरुषी नृत्य असले तरी अलीकडे महिलांचाही त्यात सहभाग दिसतो. पुरुषी भांगडा नृत्यातील चैतन्य व जोम स्त्रियांच्या गिद्धा नामक नृत्यप्रकारातही दिसून येतो.