बालगंधर्व ( जीवन परीचय )
महाराष्ट्रातील नाट्यसंगीताच्या इतिहासात मानाचा तुरा खोवणारे , ज्यांनी आपल्या मधुर आवाजाने व परीपक्व अभिनयाने महाराष्ट्राची रंगभूमी गाजवली, ज्यांनी गंधर्वयुगाची सुरुवात केली. पुरुष असूनही तब्बल ५० वर्षे ज्यांनी स्त्री-भूमिका सादर करून रसिकांच्या मनावर अधिराज्य केले, असे दैवी कलावंत म्हणजे बालगंधर्व होय. अशा या बालगंधर्वाच्या जीवनकार्याचा आढावा खालील मुद्द्यांच्या आधारे घेता येईल.
जन्म व बालपण :
नारायण श्रीपाद राजहंस हे बालगंधर्वांचे नाव. त्यांचा जन्म २६ जून , १८८८ रोजी सांगली जिल्ह्यातील नागठाणे येथे झाला. संपूर्ण राजहंस कुटुंब संगीतप्रेमी होते. त्यांचे मामा वासुदेवराव पुणतांबेकर हे ‘नाट्य कला प्रवर्तक’ नाटक मंडळीच्या संस्थापकांपैकी एक होते. बालगंधर्वांना त्यांच्या वडिलांनी शिक्षणासाठी जळगावला पाठवले. तेथे बालगंधर्वांना अनेक नाटके पाहण्याचा योग आला. अशा प्रकारे त्यांना गायन व नाट्याचे बाळकडू मिळाले.
गुरू आणि शिक्षण :
जळगावात मेहबूब खाँ हे एक उत्तम गायक राहत होते. त्यांच्याकडे नारायणरावांनी संगीताचे धडे घेण्यास प्रारंभ केला. खाँसाहेबांनी बालगंधर्वांना स्वरसाधना, स्पष्ट शब्दोच्चार व रागदारीचे शिक्षण देऊन त्यांचा गायनाचा पाया पक्का केला. याच काळात प्रसिद्ध गायक भास्करबुवा बखले यांनी मूळातच सुरेल आवाज असलेल्या बालगंधर्वांना साभिनय पदे, रंगभूमीवरील गायनकौशल्य, घरंदाज गायकीइत्यादी बाबी शिकवल्या. पं. गोविंदराव टेंबे व उ. अल्लादिया खाँ यांच्याही गायकीचा प्रभाव बालगंधर्वांवर होता.
बालगंधर्व पदवी :
लोकमान्य टिळकांना पुण्यामध्येचिमुकल्या नारायणाचे गाणे ऐकण्याचा योग आला. नारायणाचे गाणे मोहक व मधुर होते. ते ऐकून लोकमान्य टिळक भारावून गेले. त्यांनी उर्त्स्फूतपणे उद्गार काढले, अरे! हा तर साक्षात बालगंधर्व! तेव्हापासून नारायणरावांना ‘बालगंधर्व’ ही पदवी मिळाली ती कायमचीच.
किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश :
लोकमान्य टिळकांनी नारायणाला १९०५ मध्ये किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश मिळवून दिला. तेव्हा नाटकातील स्त्री-भूमिका पुरुषच करत. अशा काळात सौंदर्य लाभलले व गोड गळ्याची देणगी लाभलेले बालगंधर्व हे रंगभूमीसाठी वरदान ठरले.
गंधर्व नाटक मंडळीची स्थापना :
अण्णासाहेब किर्लोस्करांच्या निधनानंतर बालगंधर्वांनी १९१३ मध्ये गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली. परंपरागत गोष्टींना छेद देत बालगंधर्वांनी नवनवीन बाबी रंगमंचावर आणल्या. विविध देखाव्यांचे पडदे आणून नेपथ्यात आमूलाग्र बदल केले. वेशभूषा, साजशृंगारांची साधने, रंगभूषेसाठी विविध उपकरणे त्यांनी रंगमंचावर आणली . नाट्यानुरूप संगीत, प्रसंगानुरूप रंगमंचावरील हालचाली, प्रभावी नाट्याभिनय अशा बाबींचा त्यांनी विचार केला. अशा प्रकारे बालगंधर्वांनी गंधर्वयुगाची सुरुवात केली. स्त्रियांचे नटणे, मुरडणे, हावभाव या गोष्टींबरोबरच स्त्रियांचे अंतरंग प्रकट करणे अशा बाबी ते लीलया करीत असत. त्यामुळे त्यांच्या स्त्री-भूमिका पाहण्यासाठी व त्यांचे गायन ऐकण्यासाठी नाट्यप्रेक्षक एकच नाटक अनेक वेळा पाहत असत. तसेच त्यांच्या पदांना अनेक वेळा वन्समोअर मिळत असे. वन्समोअर मिळाल्यानंतर प्रत्येक वेळी ते पद वेगवेगळ्या ढंगामध्ये सादर करत असत. बालगंधर्वांची वेशभूषा, दागिने पाहून कित्येक कुलीन स्त्रिया त्यांचे अनुकरण करीत असत. त्या काळी गंधर्व फॅशनच रूढ झाली होती. अशा प्रकारे त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले.
संगीत नाटके व स्त्री - भूमिका :
बालगंधर्वांनी १९०६ ते १९५५ या काळात जवळपास २७ स्त्री भूमिका रंगवल्या. त्यांनी पहिली स्त्री भूमिकाशाकुंतल नाटकात केली. त्यानंतर सौभद्रमधील सुभद्रा, मानापमानमधील भामिनी. स्वयंवरमधील रुक्मिणी, विद्याहरणमधील देवयानी, शारदामधील शारदा, मृच्छकटीकमधील वसंतसेना व एकच प्याला या नाटकातील सिंधू अशा अनेक स्त्री भूमिका त्यांनी अजरामर केल्या.
गायकी :
भास्करबुवांच्या गायकीत ग्वाल्हेर, आग्रा अशा घराण्यांच्या गायकीचा संगम झाला होता. याचा प्रभाव बालगंधर्वावर असला तरी त्यांनी आपली वेगळी गायनशैली विकसित केली होती. त्यांचे मधुर गायन श्रोत्यांच्या अंतः करणाला भिडत असे. ते लयीचे पक्के होते. स्पष्ट शब्दोच्चार, दाणेदार तान, याचबरोबर लडिवाळपणा व मादकता यांचा मिलाफ त्यांच्या गायकीत झाला केला.
फिल्म कंपनीत पदार्पण :
बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळी बंद झाल्यानंतर १९३५ मध्येप्रभात फिल्म कंपनीच्या धर्मात्मा चित्रपटामध्ये भूमिका केली. परंतु या एकाच चित्रपटानंतर बालगंधर्वांनी प्रभात फिल्म कंपनी सोडली.
मानसन्मान :
• पुणे येथे भरलेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होण्याचा बहुमान त्यांना मिळाला.
• संगीत नाटक अकादमीने अभिनयासाठी राष्ट्रपती पदक देऊन त्यांचा गौरव केला.भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार दिला.
• त्यांच्या जीवनावर आधारित बांलगंधर्व हा चित्रपट प्रदर्शित झाला.
मृत्यू ः ४ जून १९५५ पर्यंत म्हणजेच वयाच्या ६७ व्या वर्षांपर्यत त्यांनी रंगमंचावर भूमिका केल्या. त्यांची ‘एकच प्यालातील’ सिंधूची भूमिका अखेरची ठरली. त्यानंतर आजारपणामुळे ते भूमिका करू शकले नाहीत. यातच दि. १५ जुलै, १९६७ रोजी पुणे येथे आयुष्याच्या रंगमंचाचा अखेरचा निरोप घेतला.