पंडीत रविशंकर चौधरी
भारतीय संगीत जगभर मान्यता पावले, त्याला मानसन्मान, प्रतिष्ठा मिळाली. भारतीय संस्कृती व संगीताचे संस्कार श्रेष्ठ ठरले, एका जिद्दी पण शांत व्यक्तिमत्त्वाच्यावादकाने हे सारे घडवले, त्या कलावंताचे नाव म्हणजे पं. रविशंकर.
जन्म व बालपण :
भारतरत्न पंडित रविशंकर यांचा जन्म ७ एप्रिल १९२० रोजी वाराणसी (बनारस,काशी) येथे झाला. वडील शामाशंकर चौधरी हे त्या काळातील अतिशय उच्चविद्याविभूषित व्यक्तिमत्त्व होते. राजनितीबरोबरच संस्कृत भाषेवर प्रभुत्व असणारे शामाशंकर कायदे तज्ज्ञ होते. पं. उदयशंकर हे रविशंकरांचे मोठे बंधू महान नर्तक व चित्रकार होते. एकूणच हा सांगीतिक, सांस्कृतिक वारसा पं. रविशंकरांना मिळाला. बालपणापासूनच रविशंकरांना संगीताचे आकर्षण वाटू लागले व वयाच्या दहाव्या वर्षीच ते पं. उदयशंकरांच्या नृत्यसंचात दाखल झाले. बालपणीच ते या नृत्यसंचासोबत विदेश दौऱ्यावरही गेले. नृत्याबरोबरच बासरी, शहनाई, व्हायोलिन, सारंगी अशा वाद्यांचीही ओळख होऊन वाद्यवादनाकडे रविशंकरांचा ओढा वाढू लागला. या नृत्यसंचामध्ये अनेक प्रथितयश कलावंतांचा सहवास रविशंकरांना लाभला आणि त्यांच्या जीवनाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले.
शिक्षण :
उ. अल्लाउद्दीन खाँ हे पं. उदयशंकरांच्या नृत्य संचासमवेत एकदा युरोप दौऱ्यावर होते. त्या संचात रविशंकरही होते. रविशंकर यांच्या आईचे निधन झाले, हाआघात मोठा होता. या काळात उ. अल्लाउद्दीन खाँ यांनी रविशंकरांना पितृवत सांभाळले. युरोप दौऱ्यावर असताना अल्लाउद्दीन खाँ यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान नसल्यामुळे रविशंकर त्यांचे दुभाष्याचे काम करत असत. खाँसाहेबांच्या सरोदवादनाचा व व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव रविशंकरांवर सातत्याने पडत होता. त्यामुळे खाँसाहेबांची जवळीक हळूहळू वाढू लागली. युरोप दौऱ्यावर असतानाच रविशंकरांनी स्वतंत्र अशा चित्रसेना नायक या कथानृत्याची रचना तयार करून सादर केली व रसिकांची वाहवा मिळवली. हे सर्व होत असताना खाँसाहेब हे सर्व जवळून पाहात होते व त्यांनी रविशंकरांना सल्ला दिला की कोणत्या तरी एका गोष्टीवर लक्ष केंद्रीत कर आणि रविशंकरांनीही खाँसाहेबांचे शिष्यत्वपत्करून संगीतावर लक्ष केंद्रीत केले.युरोप दौऱ्याहून परत आल्यानंतर उदयशंकरांच्यानृत्यसंचातील वास्तव्य सोडून रविशंकरानी उ. अल्लाउद्दीन खाँ यांच्याकडे मैहर येथे जाऊन गुरुकुल पद्धतीने ‘सतार’ वादनाची तालीम घ्यायला सुरुवात केली. रविशंकर व अल्लाउद्दीन खाँ यांची भेट म्हणजे रविशंकरांच्याआयुष्यातील व भारतीय संगीताच्या इतिहासातील एक ऐतिहासिक घटना मानली जाते.योग्य गुरू व स्वतःची अफाट श्रम करण्याची तयारी यामुळे गुरूंकडून त्यांना नेहमीच उत्तेजन मिळत गेले. अत्यंत कडक शिस्तीमध्ये सुमारे सहा वर्षे सतारवादनाची तालीम घेतली. यादरम्यान वडीलांचेही निधन झाले. गुरूंचा वरदहस्त, नित्य साधना व संगीतावर असलेली निस्सीम श्रद्धा या बळावर तणावपूर्ण काळातही सातत्याने त्यांनी आपल्या साधनेवर लक्ष दिले. खाँसाहेबांचे सुपुत्र उ. अली अकबर खाँ व कन्या अन्नपूर्णादेवी यांच्याबरोबर रविशंकरांना तालीम मिळत गेली. सतारवादनात होत असलेली प्रगती आणि गुरूच्या सहवासात मिळवलेले ज्ञान यामुळे अल्पावधीतच पं. रविशंकरजी एक प्रथितयश कलावंत म्हणून ओळखले गेले. त्याचाच परिणाम म्हणजे अलाहाबाद येथे झालेल्या संगीत महोत्सवामध्ये पं. रविशंकरांच्या सतारवादनाचा पहिला जाहीर कार्यक्रम झाला.या दरम्यान खाँसाहेबांची कन्या अन्नपूर्णा देवी यांच्याशी पं. रविशंकरांचा विवाह झाला. १९४५ सालापासून त्यांनी बॅलेसाठी संगीत रचना व चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन सुरू केले अनेक चित्रपटांना संगीत दिले.चित्रपट संगीत दिग्दर्शन :धरती के लाल, निचानगर, पथेर पांचाली, अपुरा संसार याचबरोबर चापा कोया, चार्ली व गांधी चित्रपटांसह काबुलीवाला, अनुराधा, गोदान, मीरा, दि चेरिटेल, दि फ्लूटअँड दी ॲरो अशा अनेक चित्रपटांना पं. रविशंकरांनी उत्कृष्टसंगीत दिले.
वैविध्यपूर्ण रचना, संगीत, दिग्दर्शन व इतर सांगितीक कार्य:
पं. रविशंकर दिल्ली येथील ऑल इंडिया रेडिओवर संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. याच काळात त्यांनी वाद्यवृंद चेंबर ऑर्केस्ट्राची स्थापना केली.
• एच. एम. व्ही. (हिज मास्टर्स व्हाईस) या कंपनीच्या संगीत विभागात संगीत सहायक म्हणून महत्त्वपूर्ण कार्य.
• इंडियन पिपल्स थिएटरमध्ये नृत्य व नाट्याचे दिग्दर्शक म्हणून यशस्वी कामगिरी.
• ‘अमर भारत’ या कथानृत्याची रचना.
• ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ चे संगीत दिग्दर्शन.
• ‘चंडालिका’ या नृत्यनाटिकेचे संगीत दिग्दर्शन.
• विविध रागांवर आधारित वाद्यवृंद रचना, त्यामध्ये प्रामुख्याने काली बदरीया, निर्झर, उषा, रंगीन कल्पना अशा अनेक रचना लोकप्रिय झाल्या.
• ‘सारे जहाँसे अच्छा’ या गीताचे संगीत दिग्दर्शन.
• एशियाड क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने ‘अथ स्वागतम् शुभ स्वागतम्’ या स्वागतगीताचे यशस्वी संगीत संयोजन.
• भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्तझालेल्या कार्यक्रमात राग-सुवर्ण जयंतीचे सादरीकरण.
• किन्नर स्कूल ऑफ म्युझिक या संस्थेची स्थापना
आंतरराष्ट्रीय कार्य :सोव्हिएत युनियनमध्ये झालेली मैफिल ही त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय मैफिल होय. यानंतर त्यांनी युरोप, अमेरिका येथे अनेक कार्यक्रम केले. त्यामध्ये प्रामुख्याने एडिनबर्गफेस्टिव्हल, रॉयल फेस्टिव्हल हॉल येथे झालेल्या मैफिलींचा समावेश करावा लागेल. बीटल्सपैकी एक असलेले जॉर्ज हॅरिसन यांनी रविशंकर यांच्याकडे सतार शिकण्यास सुरुवात केली. रविशंकरांनी जॉर्ज हॅरिसन यांच्यासोबत जॅझ संगीताचे अनेक कार्यक्रम केले. या माध्यमातून अभिजात पाश्चात्य व भारतीय संगीताच्याविविध प्रवाहांवर त्यांनी काम केले. म्हणूनच जॉर्ज हॅरिसनयांना पं. रविशंकर यांचे पॉपजगतातील मेंटर (पालक) मानले जाते. याच काळात रविशंकर यांनी मॉन्टेरी पॉप फेस्टिव्हल, वॅडस्टक फेस्टिव्हल यामध्ये भाग घेतला. शिवाय विदेशातील विविध महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये त्यांनी भारतीयसंगीतावर अनेक व्याख्याने दिली.न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील ‘कन्सर्टफॉर बांगलादेश’ या जॉर्ज हॅरिसन आयोजित कार्यक्रमात पं. रविशंकर यांचे सतारवादन झाले.पाश्चात्य संगीत विश्वातील प्रसिद्ध व्हायोलिन वादक यहुदी मेनुहीन तसेच सरोदवादक उ. अली अकबर खाँ यांच्याबरोबरही पं. रविशंकर यांनी अनेक कार्यक्रमात जुगलबंदी केली आहे. याशिवाय संगीततज्ज्ञ फिलीप ग्रास यांच्या सोबतची ‘पॅसेजेस’ ही त्यांची एक उल्लेखनीय रचना आहे. फिलीप ग्रॉसच्या ओरायन रचनेत सतारवादक म्हणून पं. रविशंकर यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिलेला आहे.