प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थाना सहाय्यक अनुदान
प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत सन २०२३-२४ या आर्थिक सहाय्यक अनुदान देण्यासाठी पात्र संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
ज्या संस्था गायन, वादन, नृत्य, नाटक, तमाशा, नकला, कटपुतलीचे खेळ तसेच लोककला या क्षेत्रात सांस्कृतिक कार्यक्रमाचे जनतेसाठी निःशुल्क सादरीकरण करेल अशा संस्था अर्ज करु शकतील.
संस्थांनी चुकीची कागदपत्रे सादर करून सहाय्यक अनुदान प्राप्त केल्याचे आढळून आल्यास सदर संस्था भविष्यात शासनाच्या अनुदानासाठी कायमस्वरूपी अपात्र ठविण्यात येईल. तसेच सदर संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
विहित नमुन्यातील अर्ज व नियम www.mahasanskruti.org या वेबसाईटवर नवीन संदेश या सदरात सांस्कृतिक संस्थांना सहाय्यक अनुदान या शिर्षाखाली उपलब्ध होतील. अर्ज दि ०३ ऑगस्ट २०२३ ते १ सप्टेंबर २०२३ या कालावधीत कार्यालयीन वेळेत उपलब्ध असून भरलेले अर्ज त्याच कालावधीत कार्यालयीन वेळेत खालील कार्यालयात स्विकारले जातील.
१) मुंबई व कोकण महसूल विभागातील संस्थांनी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई-३२. या पत्त्यावर अर्ज पाठवावेत. दूरध्वनी नं. ०२२-२२८४२६७०/२२०४३५५०
२) पुणे व नाशिक महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, बंगला नंबर ४, विमानतळ रोड, पुणे, या पत्त्यावर अर्ज सादर करावेत. दूरध्वनी नं. ०२०-२६६८६०९९
३) औरंगाबाद महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, रूम नं. ०२. एम. टी. डी. सी. बिल्डींग, गोल्ड टॉकीजच्या समोर, स्टेशन रोड औरंगाबाद ४३१००५ या पत्त्यावर अर्ज सादर करावेत, दूरध्वनी नं. ०२४०-२३३९०५५
४) नागपूर व अमरावती महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, द्वारा अभिरक्षक, मध्यवती संग्रहालय अस्थायी प्रदर्शन हॉल, तळ मजला, सिव्हिल लाईन, नागपूर या पत्त्यावर अर्ज सादर करावेत. दूरध्वनी नं. ०७१२-२५५४२११
येथे दिनांक ०३ ऑगस्ट २०२३ ते १ सप्टेंबर २०२३ या कालाधीत कार्यालयीन वेळेत अर्ज उपलब्ध असून भरलेले अर्ज त्याच कालावधीत उपरोक्त कार्यालयात स्विकारले जातील.
सहाय्यक अनुदानासाठी अर्ज करणाऱ्या संस्थांनी खालील अटी पूर्ण केल्या पाहिजेत-
(१) संस्था नोंदणी अधिनियम आणि सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम अंतर्गत नोंदणीकृत असली पाहिजे.
(२) संस्थेच्या घटनेत सांस्कृतिक कार्यङ हा महत्त्वाचा उद्देश असावा.
(३) सहाय्यक अनुदानाकरीता अर्ज करणारी संस्था किमान ३ वर्षापासून कार्यरत असावी.
(४) संस्थेने मागील ३ आर्थिक वर्षात प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात केलेले कार्य हे निःशुल्करित्या केलेले असणे आवश्यक आहे. तसेच त्याद्वारे कोणतेही उत्पन्न मिळविलेले नसावे.
(५) संस्थेच्या दरवर्षीच्या हिशोबाची तपासणी धर्मदाय आयुक्तांनी मान्यता दिलेल्या किंवा संमत्ती दिलेल्या परिक्षकाकडून किंवा सनदी लेखापालाकडून (चार्टर्ड अकाऊंटंट) करण्यात यावी. मागील ३ आर्थिक वर्षाच्या लेखापरिक्षणाच्या अहवालाच्या प्रतीत खालील बाबी नमूद केलेल्या असणे आवश्यक आहे.
(अ) नफा/तोटा पत्रक
(ब) जमा व खर्च लेखे
(क) ताळेबंद
(ड) प्रयोगात्मक कलेवर केलेल्या खर्चाच्या बाबींचा तपशील
(इ) सनदी लेखापालांचे लेखा परिक्षणात्मक अहवाल
(६) संस्थांनी चुकीची कागदपत्रे सादर करुन सहाय्यक अनुदान प्राप्त केल्याचे आढळून आल्यास सदर संस्था भविष्यात शासनाच्या अनुदानासाठी कायमस्वरुपी अपात्र ठरविण्यात येईल. तसेच सदर संस्थेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
(७) अर्थसहाय्य देताना संस्थांकडून प्राप्त होणारे अर्ज आणि त्यावर्षी सदर योजनेखाली उपलब्ध असणारी तरतूद विचारात घेऊन खालील संस्थांना अनुदानासाठी प्राधान्य देण्यात येईल.
(१) ज्या संस्थांच्या मागील ३ आर्थिक वर्षाच्या लेखापरिक्षण अहवालात कोणतेही विपरीत आक्षेप नाहीत, अशा संस्था.
(२) ज्या संस्थांच्या मागील ३ आर्थिक वर्षात ज्यांनी विविध नामांकित आणि मान्यताप्राप्त अशा स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविले आहे किंवा त्यांच्या कलावंतांनी गौरव प्राप्त केला आहे, अशा संस्था.
(३) ज्या संस्थांच्या मागील ३ आर्थिक वर्षात प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रात केलेले कार्य नाविण्यपूर्ण व वैशिष्टपूर्ण आहेत, अशा संस्था
(४) ज्या संस्थांनी कलेच्या क्षेत्रात राज्य / देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा संस्था.
(५) ग्रामीण भागात, आदिवासी दुर्लक्षित भागात आणि औद्योगिक क्षेत्रात कलेचे कार्यक्रम करणाऱ्या संस्थाबाबत प्राधान्याने विचार करण्यात येईल.
६) संस्थांनी प्रयोगात्मक कलेचे सादरीकरण, जतन व संवर्धन करताना खालील बाबी कटाक्षाने टाळण्याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
(१) जातीय किंवा धार्मिक विद्वेष उफाळून येईल किंवा बळावेल, असे कोणतेही कार्य करता येणार नाही, किंवा असा कोणताही कार्यक्रम सादर करता येणार नाही.
(२) शासकीय धोरण किंवा सामाजिक नितिमत्ता यांच्याविरुध्द असलेला कोणत्याही गोष्टीचा आपल्या कार्यात किंवा कार्यक्रमात समावेश करता येणार नाही.
(३) विशिष्ट व्यक्तीवर टिका करणारा कार्यक्रम सादर करता येणार नाही.
(४) राजकीय वाद किंवा हिंसाचार उद्भवेल किंवा वाढेल असे कार्य किंवा कार्यक्रम सादर करता येणार नाहीत.
७) संस्थेस एकदा अनुदान प्राप्त झाल्यानंतर पुढील ३ वर्षे सहाय्यक अनुदान मिळणार नाही. चौथ्या वर्षी योजनेच्या निकषाच्या आधारे संस्थेच्या अर्जाचा अनुदानासाठी विचार करण्यात येईल.
८) प्रयोगात्मक कलेचे जतन व संवर्धन करणाऱ्या संस्थांना अनुदान : ज्या संस्था प्रयोगात्मक कलेचे जतन व संवर्धन करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्य करत आहेत अशा महाराष्ट्रातील तीन संस्थांना अनुदान देण्यात येईल.
(अ) लुप्त होणाऱ्या कलांचे तसेच आदिवासी कलांचे पुर्नजीवन, सादरीकरण व दस्तऐवजीकरण यासाठी कार्य करत आहेत.
(ब) दुर्मिळ कलासाहित्य ( लिखित व दृकश्राव्य), वाद्य व सामुग्री याबाबींचे जतन / संग्रह / प्रदर्शन त्याचप्रमाणे दुर्मिळ ध्वनिमुद्रीकांचे श्रवणसत्र कार्यक्रम आयोजित करण्याचे कार्य करत आहेत
(क) विशेष बालकांसाठी (मतिमंद, अंध, अपंग, मूकबधीर तसेच बालगृह / निरिक्षण गृहातील बालके) प्रयोगात्मक कलेचे प्रशिक्षण तसेच विशेष बालकांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याचे कार्य करत आहेत अशा संस्था.
(ड) याव्यतिरिक्त अन्य माध्यमातून प्रयोगात्मक कलेचे जतन व संवर्धन करणाऱ्या संस्था.
९) सदर योजनेअंतर्गत सहाय्यक अनुदानासाठी खालील उपक्रम पात्र धरण्यात येणार नाहीत-
(१) रक्तदान शिबीर
(२) श्रमदान शिबीर
(३) वृक्षारोपण कार्यक्रम
(४) दिंडी
(५) एडस् जनजागृती
(६) क्रिडा स्पर्धा
(७) बैलांची शर्यत
(८) पर्यावरण रक्षण
(९) सत्कार समारंभ
(१०) पथनाट्य
(११) शाळेचे वा महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन
(१२) हळदीकुंकू समारंभ
(१३) केवळ उद्घाटन कार्यक्रमाचे फोटो
सदर योजनेची अधिक माहिती, अर्ज व नियम www.mahasanskruti.org या वेबसाईटवर नवीन संदेश या सदरात सांस्कृतिक संस्थांना सहाय्यक अनुदान या शिर्षाखाली आपणास पाहता येईल.