पं.पलुस्कर संपूर्ण जीवन चरित्र

0

 

पं.पलुस्कर जीवनी

पं.पलुस्कर संपूर्ण जीवन चरित्र


पं.विष्णू दिगंबर पलुस्कर  

( १८ ऑगस्ट १८७२-२१ ऑगस्ट १९३१ ). 


          महाराष्ट्रातील एक थोर संगीतप्रसारक, गायनाचार्य व्यक्तिमत्त्व. त्यांचे मूळ आडनाव गाडगीळ पण पूर्वीचे पलुसचे रहिवासी असल्याने ते पलुस्कर म्हणून ओळखले जाऊ लागले. ‘पंडित विष्णु दिगंबर’या नावाने सुपरिचित. त्यांचा जन्म कुरुंदवाड येथे झाला. त्यांचे वडील दिगंबरपंत हे चांगले कीर्तनकार होते व कुरुंदवाडच्या छोट्या पातीचे राजे दाजीसाहेब यांच्या खास मर्जीतील होते. त्यामुळे राजघराण्यातच विष्णूजींचे सुरू झाले. त्यांच्या जीवनात बालपणीच एक गंभीर अपघात घडला. एका उत्सवात मुलांचे दारू उडविण्याचे काम चालू असताना एक भुसनळा लहानग्या विष्णूच्या तोंडावर उडाला, त्याचे तोंड भाजले व डोळ्यांना दुखापत झाली. त्यामुळे त्याचे शालेय शिक्षण स्थगित करावे लागले आणि परिणामत: ते संगीताकडे वळले. विष्णूला लहानपणापासूनच गाण्याचे चांगले अंग असल्यामुळे मिरज येथे असलेल्या संगीताचार्य पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्याकडे पाठवून संगीतविद्या शिकविण्याचे ठरविण्यात आले. कुरुंदवाडच्या राजेसाहेबांनी त्याला मिरजेला पाठवले व त्याच्यावर देखरेख ठेवण्याचे काम मिरजेच्या राजेसाहेबांवर सोपविले. बाळकृष्णबुवा यांच्याकडे विष्णूने नऊ वर्षे मन लावून संगीताचा अभ्यास केला. विष्णुजींचा आवाज मेहनतीने अत्यंत गोड, सुरीला व बुलंद झाला होता. पं. बाळकृष्णबुवांकडून त्यांनी शुद्ध स्वरूपात ग्वाल्हेर गायकी प्राप्त केली. आलाप, बोल उपज व वजनदार ताना या तिन्ही अंगांचा समतोल त्यांच्या गायकीमध्ये साधला होता. ही सर्व विद्या त्यांनी गुरुगृही संपादन केली. त्यांनी विद्यार्थिदशेतच संगीतावर खूप मेहनत केली व आता गाण्याची तयारी उत्तम झाली आहे, असे समजून १८९३ साली मिरज सोडले.

             तत्कालीन समाजात संगीतकला व तिचे उपासक यांना मुळीच मान नव्हता. ज्यांना उपजतच संगीताची खास आवड व कलेची नैसर्गिक देणगी असे, ते दूरवर जाऊन संगीतकला शिकत व संगीताच्या सेवेत समाधान मानीत. काही संस्थानांतून काहींना थोडाफार राजाश्रय मिळे; पण बहुतेकांची सांपत्तिक स्थिती चिंताजनकच असे. ह्या सर्व परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करून संगीतकलेचे पूर्वीचे वैभव व महत्त्व तिला प्राप्त करून देणे आणि समाजात कलाकाराला मानाचे स्थान मिळवून देणे, हे ध्येय गुरुगृह सोडताना विष्णुजींनी डोळ्यांसमोर ठेवले व पुढे आयुष्यभर या ध्येयपूर्तीसाठी निष्ठापूर्वक अखंड परिश्रम केले. मिरज सोडल्यानंतर ते औंध–सातारा–पुणे–मुंबई करीत बडोद्याला गेले. महाराणी जमनाबाईसाहेब यांना विष्णुजींचे गाणे आवडल्यामुळे त्यांचा बडोद्यामध्ये तीन -चार महिने मुक्काम झाला. महाराणींनी स्वत:ची शिफारसपत्रे देऊन काठेवाड, सौराष्ट्र व राजस्थान येथील राजेलोकांकडे त्यांना पाठवले. सर्व ठिकाणी त्यांच्या मैफली होऊन त्यांना आर्थिक प्राप्ती चांगली झाली. पण पैसा मिळविणे हे त्यांचे ध्येय नव्हते.

               संगीतकलेला सामाजिक प्रतिष्ठा व कलावंतांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी संगीताचा प्रसार करणे, संगीताचे शिक्षण जनतेला मुक्तहस्ते व कमी खर्चात मिळावे म्हणून ठिकठिकाणी संगीत विद्यालये स्थापन करणे, गरीब व सत्प्रवृत कुटुंबातील मुले घेऊन त्यांचे पालनपोषण करून, त्यांना संगीतकलेचे शिक्षण देणे व त्यांतून उत्तम कलाकार आणि संगीतशिक्षक तयार करणे, हे विष्णुजींचे ध्येय होते. गिरनार पर्वतावरील एका साधूच्या उपदेशानुसार त्यांनी पंजाब हे कार्यक्षेत्र निवडले. लाहोर येथे ५ मे १९०१ रोजी त्यांनी ‘गांधर्व महाविद्यालय’ ह्या संस्थेची स्थापना केली. ह्या विद्यालयाद्वारे त्यांनी समाजात संगीताभिरुची निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच पद्धतशीर अभ्यासक्रम आखून संगीत विषयाच्या निरनिराळ्या परीक्षा विद्यार्थ्यांसाठी निर्माण केल्या आणि त्यायोगे संगीतविषयक पदव्या विद्यार्थ्यांना दिल्या. त्याचप्रमाणे विद्यालयातर्फे संगीत परिषदाही भरविल्या. विष्णुजींनी या विद्यालयामार्फत निवडक विद्यार्थ्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी शिरावर घेऊन त्यांना गायक बनविण्याचे कार्य केले. त्यांनी संगीतकलेला शिस्तबद्ध वळण लावण्याचा प्रयत्न केला व स्त्रीवर्गातही संगीताचा प्रसार केला. मुंबईच्या शाखेत स्त्रियांना शिक्षण देण्याची खास व्यवस्था केली. त्यासाठी आपल्या पत्नी रमाबाई व भाची श्रीमती अंबूताई पटवर्धन यांना संगीताचे शिक्षण देऊन तयार केले. सुसंस्कृत व कुलीन स्त्रियांना व्यासपीठावर येण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. संगीतकारांसाठी, संगीतकारांची व संगीतकारांनी चालविलेली संगीतसंस्था असे या विद्यालयाचे व त्याच्या इतरत्र स्थापन झालेल्या शाखांचे स्वरूप होते. सभागृहांतून संगीताचे जलसे भरविण्यासही त्यांनी चालना दिली. या जलशांचे वक्तशीरपणा हेही एक लक्षणीय वैशिष्ट्य होते. १९०८ साली ते मुंबईस आले व मुंबईत त्यांनी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. हे विद्यालयही खूप भरभराटीस आले. सँडहर्स्ट रोडवर १९१४ साली या विद्यालयाच्या मालकीची इमारत बांधण्यात आली. या इमारतीमध्ये विद्यार्थी निवास, छपाई, वाद्ये दुरुस्ती इत्यादी कार्येही चालत. १९१२ सालापासून ते तुलसीदासांच्या रामायणावर प्रवचने करू लागले व त्यांद्वारे त्यांनी संगीताचा समाजात प्रसार केला. संगीताची प्राचीन मौलिकता त्यांनी जतन केली. त्यांच्या संगीतविद्येच्या प्रसाराला त्यांनी धार्मिक अधिष्ठानाची जोड दिली. ‘रघुपती राघव राजाराम’ हे भजन त्यांनी जनसामान्यांत लोकप्रिय केले. ते देशभक्तही होते. ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगीत प्रत्येक सभेत म्हणण्याची प्रथा त्यांनी रूढ केली. आपले विद्यार्थी घेऊन प्रचारासाठी ते देशभर अनेक वेळा फिरले. अशा तऱ्‍हेने संगीताचा प्रसार त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्‍यांतून केला. स्वत:ची एक वेगळी अशी संगीतलेखनपद्धती त्यांनी निर्माण केली. संगीत बालप्रकाश, राग प्रवेश, संगीत बालबोध, स्वल्पालाप गायन, टप्पा गायन, होरी, मृदंग – तबला पाठ्यपुस्तक, रामनामावली, रामगुणगान ( मराठी ) बंगाली गायन, कर्नाटकी संगीत, बालोदय संगीत, व्यायाम के साथ संगीत, महिला संगीत, राष्ट्रीय संगीत, भारतीय संगीत लेखनपद्धति  इ. हिंदी-मराठी पुस्तकांचा अंतर्भाव होतो. विष्णुजींनी संगीतक्षेत्रात नेतृत्व करून समाजात या कलेला प्रतिष्ठा देण्याचे व त्याविषयी अभिरुची निर्माण करण्याचे, तसेच संगीतकलेला व संगीतकारांना पद्धतशीर वळण लावण्याचे कार्य केले. मिरज येथे त्यांचे निधन झाले.                                                                                                                 विष्णु दिगंबरांच्या बहुतेक शिष्यांनी ठिकठिकाणी गांधर्व महाविद्यालये स्थापन करून त्यांचे कार्य सुरू ठेवले. १९३१ साली गुरुंच्या स्मरणार्थ अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ या संस्थेची स्थापना अहमदाबाद येथे केली.संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए नीचे दिए गए सोशल मीडिया बटन पर क्लिक करके अभी जॉईन कीजिए।

संगीत की हर परीक्षा में आनेवाले महत्वपूर्ण विषयोंका विस्तृत विवेचन
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Please Follow on FacebookFacebook
Please Follow on InstagramInstagram
Please Subscribe on YouTubeYouTube

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top