वैज्ञानिक उपकरणे व शास्त्रीय संगीत
वर्तमानकाळात विज्ञानाने अफाट प्रगती केली आहे. बहुदा सर्वच क्षेत्रांत विज्ञानाची घोडदौड जोमाने सुरू आहे. संगीतक्षेत्रही याला अपवाद नाही. पूर्वीच्या काळी आवश्यक वाद्ये, कलाकार व एखादे बऱ्यापैकी व्यासपीठ /बैठक एवढ्याच गोष्टी मैफिलीला आवश्यक होत्या. पण काळ बदलत गेला. प्रथमतः ध्वनिक्षेपक आला व हळूहळू एकेक वैज्ञानिक उपकरणांनी संगीतात शिरकाव केला. आज बाजारामध्ये संगीतोपयोगी अशी बरीच वैज्ञानिक उपकरणे उपलब्ध झाली आहेत. त्यात प्रामुख्याने तानपुरा, तबला, तालमाला, लेहरा मशीन इ. अनेक वैज्ञानिक उपकरणे संगीताच्या सादरीकरणावेळी अथवा रियाजावेळी आपली भूमिका बजावतात. प्रत्येक गोष्टीच्या बऱ्या-वाईट बाजू असतात. आता आपण प्रथमतः या उपकरणांचे फायदे पाहू.
तानपुऱ्यासारखी मोठी वाद्ये प्रवासात त्रासदायक ठरतात. कारण त्यांची ने-आण तसे जिकिरीचे आहे. पण इलेक्ट्रॉनिक तानपुरा पिशवीत घालून कोठेही नेता येतो. तसेच त्या एका बॉक्स (इले. तानपुरा) मधून सर्व स्वरांचे तानपुरे वाजतात.. त्यामुळे ते बऱ्याचवेळा सोयीचे जाते. एखाद्या विद्यालयाच्या शिक्षकाला स्त्री व पुरुष या दोघांनाही शिकवताना लागणारे काळी ४/५ व काळी १/२ चे तानपुरे जरी उपलब्ध झाले नाहीत तरी तो केवळ इलेक्ट्रॉनिक तानपुऱ्यावर सर्व पट्ट्यांमध्ये शिकवू शकतो.
बऱ्याच ठिकाणी साथीदारांचा अभाव आढळतो. मुंबई-पुणे इ. सारख्या मोठ्या शहरांचा अपवाद वगळता अन्यत्र गायन-वादनाला अनुरूप अशी साथसंगत करणारे व सर्व ताल प्रभुत्वाने वाजविणारे तबलजी खूपच दुर्मिळ आहेत. अशा वेळी 'तालमाला' या वैज्ञानिक उपकरणाचा खूप फायदा होतो. तीच गोष्ट लेहरावादकाची. . बऱ्याच ठिकाणी केवळ तीनताल व तोही जुजबी वाजवणारे लेहरावादक आढळतात. गांधर्व महाविद्यालयाच्या 'विशारद'च्या वगैरे अभ्यासक्रमात तीनतालेतर तालांतही वादनाचा समावेश आहे. पण सर्व ठिकाणी इतर तालांत लेहरा वाजवणारे उपलब्ध नसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची पंचायत होते. अशा वेळी लेहऱ्याचे मशीन अत्यंत उपयुक्त आहे. शिवाय या मशीनमुळे विद्यार्थी रियाजावेळीही याचा लाभ उठवूशकतात व इतर सर्व तालात तीनताला इतकेच आत्मविश्वासाने वाजवू शकतात. क्लिष्ट लयकारीचा अभ्यास तासन्तास करू शकतात. लयकारीसंदर्भातील विविध प्रयोग करू शकतात.
ही झाली वैज्ञानिक उपकरणांतील वाद्ये. याबरोबरच अलीकडे, सी.डी., डी.व्ही.डी., पेनड्राईव्ह, हार्डडिस्क इ. गोष्टी संगीतात प्रभावीपणे काम करत आहेत. लहानात लहान उपकरणातही शेकडो तासांचे ध्वनिमुद्रण साठविणे शक्य झाल्याने संगीताचे आदानप्रदान सोपे झाले आहे. ध्वनिक्षेपक, ध्वनिमुद्रण इ. गोष्टीही अत्यंत प्रगत झाल्याने संगीतातील बारीकसारीक गोष्टीही ध्वनिमुद्रणात ठळकपणे अनुभवता येतात. आपण या उपकरणांच्या उपयोगितेच्या दृष्टिकोनातून चर्चा करत असल्याने यांच्या त्रुटी अभ्यासणेही गरजेचे आहे.
१) तानपुऱ्याबद्दल विचार करावयाचा झाल्यास इलेक्ट्रॉनिक तानपुरा 'वाजतो' तर नेहमीचा तानपुरा 'बोलतो'. इलेक्ट्रॉनिक तानपुऱ्यात आस जरी मिळाली तरी त्यात तुटकपणा जाणवतो, तर नेहमीचा तानपुरा अविरतपणे झंकारतो. विद्युतदाब कमी जास्त झाल्यावर इलेक्ट्रॉनिक तानपुन्याचा स्वर कमी-जास्त होतो तर मानवनिर्मित तानपुन्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. इलेक्ट्रॉनिक तानपुरा केवळ बटणे फिरवून लागतो. त्यामुळे संगीताला आवश्यक असणारी 'कान तयार होण्याची' प्रक्रिया थंडावते. या उलट मानवनिर्मित तानपुरा लावताना स्वर व त्यातील बारकावे अनुभवायला मिळतात व कान तयार होतो.
२) 'तालमाले 'संदर्भात बोलायचे झाल्यास हेच सांगता येईल. यातून केवळ ठोके मिळतात. बोल वाजत नाही. अर्थात कलाकाराच्या बायांमधून येणारा नाद त्यातून निर्माण होणे शक्यच नाही. तसेच ठेकाभरी, बोलबाट यांद्वारे निर्माण होणारे सौंदर्य 'तालमालेतून निर्माण होणे शक्यच नाही. विद्युतदाबाचा परिणामही आहेच.
३) लेहरा मशीनबद्दल हेच सांगता येईल. विद्युतदाबाच्या परिणामामुळे लयीत फरक होऊ शकतो. तसेच प्रत्यक्ष लेहरावादकाबरोबर वाजवून सवय असेल तरी ही लेहरा मशीनबरोबर शब्दश: 'जुळवून घ्यावे' लागते. लेहरा मशीन हे शेवटीयंत्रच असल्याने विविध जातिंना पूरक असे सूचक वादन यात शक्य होत नाही, जे एक अनुभवी लेहरावादक करत असतो.
या सर्व गोष्टींचा विचार केला असता हे लक्षात येते की या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा निश्चितच उपयोग आहे. पण जिथेपर्यंत इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा प्रश्न आहे तिथेपर्यंत सांगायचे झाल्यास मानवनिर्मित वाद्यांना पर्याय नाही.