पं. विष्णू नारायण भातखंडे
जन्म : १० ऑगस्ट, १८६० मृत्यू: १९ सप्टेंबर, १९३६
भारतीय संगीताच्या विकासासाठी ज्या अनेक महापुरुषांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले त्यामध्ये पं. विष्णू नारायण भातखंडे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. ज्या काळामध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला सर्वच बाजूंनी प्रतिकूल परिस्थिती होती, अशा कालखंडात पंडितजींनी भारतीय संगीतामध्ये लक्षणीय बदल घडवून त्याला नवीन दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. बालपण व शिक्षण पं. विष्णू नारायण भातखंडे यांचा जन्म १० ऑगस्ट, १८६० ला मुंबईतील वाळकेश्वर या ठिकाणी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी झाला. बालपणापासून पंडितजींना संगीताची आवड होती. त्यांचे आई-वडील दोघेही संगीतप्रेमी होते. पं. विष्णू नारायण भातखंडे हे शाळेत एक हुशार विद्यार्थी होते. सन १८८३ मध्ये बी.ए. व १८९० साली एल.एल.बी.ची परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली व लाहोर शहरामध्ये वकिलीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. एकीकडे शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करत असतानाच संगीताचा सखोल अभ्यासही त्यांनी सुरू ठेवला. पंडितजींनी संगीतातल्या अनेक तज्ज्ञांकडून विविध गोष्टींचे अध्ययन केले. ज्यामध्ये प्रामुख्याने पं. रावजीबुवा बेलबागकर यांच्याकडून धृपद गायकी, उ. अली हुसेन व 3. विलायत हुसेन यांच्याकडून ख्याल गायनाचे शिक्षण त्यांनी घेतले. धृपद व ख्याल गायकीबरोबरच सतार व बासरी वादन करण्यातही ते निपुण होते. सतार वादनाचेशिक्षण त्यांनी सेठ वल्लभदास यांच्याकडून घेतले. त्यांचे विविध मैफिली ऐकणे, संगीतावर अभ्यास करणे चालू होते. या दरम्यान पं. भातखंडे हे 'गायन उत्तेजक मंडळी' या संस्थेचे सभासद झाले. या संस्थेच्या माध्यमातून विविध कलाकारांच्या मैफलींचे आयोजन केले जात असे. अनेक मैफलींचे अवलोकन केल्यानंतर त्यांना कलावंताच्या प्रस्तुतीकरणामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. अनेक गोष्टी खटकायला लागल्या. कुठेतरी हिंदुस्थानी संगीताची दुर्दशा होत आहे आणि त्याला योग्य दिशा दिली पाहिजे या दृष्टीने कलाकारांचे शास्त्रशुद्धतेकडे होणारे दुर्लक्ष, बंदिशींच्या शब्दांचे अशुद्ध, अस्पष्ट उच्चार, कलाकारांचा घराण्याबाबतचा दुराग्रह अशा अनेक बाबींवर विचार करून ह्यामधील तफावत दूर करण्याचा निश्चय त्यांनी केला.
सांगीतिक कार्य :
(१) पं. भातखंडे यांनी हिंदुस्थानी संगीत शास्त्राची नव्याने उभारणी करण्यासाठी भारत भ्रमण करायला सुरुवात केली. भारतभरातल्या अनेक विद्वानांशी सखोल चर्चा करण्याच्या हेतूने त्यांनी अनेक परिसंवाद घडवले आणि संगीताच्या विविध विषयांवर अनेक व्याख्याने दिली, इतर प्रांतांतील व भाषांतील संगीतविषयक साहित्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी अनेक भाषांचा अभ्यासही केला. अनेक दुर्मिळ ग्रंथांचा अभ्यास करून मोठ्या प्रमाणात ग्रंथांचे संपादन व भाषांतर त्यांनी केले.
(२) भारतीय संगीतातील श्रुती स्वर विभाजनातील - सात स्वरांच्या स्थानाबाबत निर्णायक मत. (३) व्यंकटमखींच्या ७२ थाटांचा अभ्यास करून पंडितजींनी रागांचे दहा थाटात वर्गीकरण केले.
(४) पं. भातखंडे यांनी स्वतंत्र स्वर लेखन पद्धती तयार केली. जी 'भातखंडे स्वर लेखन पद्धती म्हणून आज भारतीय संगीतात सर्वत्र परिचित आहे.
(५) विविध घराण्यांच्या कलाकारांकडून मिळालेल्या बंदिशी ध्वनिमुद्रित करून त्या बंदिशी स्वरलिपीबद्ध केल्या.लेखन कार्य आणि ग्रंथ संपदा :
पंडित भातखंडे यांनी भारतीय संगीतावर विविध भाषांमध्ये विविध टोपणनावांनी फार मोठी ग्रंथसंपदा लिहिली. 'स्वर मालिका हा त्यांचा गुजराथी भाषेत लिहिलेला प्रथम ग्रंथ होय. एक ते सहा या भागांतील क्रमिक पुस्तक मालिकेच्या माध्यमातून ‘हिंदुस्थानी संगीत पद्धती' या पुस्तकाचे क्रमशः प्रकाशन त्यांनी केले. याचबरोबर 'अभिनव ताल मंजिरी' हा ग्रंथ संस्कृत भाषेत प्रकाशित केला. 'श्री मल्लक्ष संगीतम्' या ग्रंथाचे मराठी भाषांतर करून 'हिंदुस्थानी संगीत पद्धती' हा ग्रंथ त्यांनी लिहिला. लक्षणगीत संग्रह, गीतमालिका या पुस्तकांबरोबरच चार खंडांत संगीत शास्त्र, हृदय प्रकाश, रागविबोध प्रवेशिका, संगीत दर्पण, संगीत पारिजात व त्याही पुढे जाऊन 'संगीत नादोदधी' या ग्रंथांचे प्रकाशन आणि संपादन त्यांनी केले.पंडित भातखंडे यांनी इंग्रजी भाषेमध्ये शॉर्ट हिस्टॉरिकल सर्व्हे ऑफ म्युझिक ऑफ अप्पर इंडिया' आणि 'फिलॉसॉफी ऑफ म्युझिक' ही पुस्तके लिहिली.ही सर्व ग्रंथसंपदा त्यांनी चतुर पंडित, विष्णु शर्मा, मंजिरीकार, हररंग, भारद्वाज शर्मा अशा अनेक टोपण नावांनी लिहिली.
विविध संगीत परिषदांचे आयोजन :
बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांच्या प्रेरणेने पंडित भातखंडे यांनी बडोदा, दिल्ली, बनारस, कानपूर, अजमेर, लखनौ या ठिकाणी संगीत परिषदांचे यशस्वी आयोजन केले. या परिषदांच्या माध्यमातून चर्चा, परिसंवाद, व्याख्यान लेख इत्यादी माध्यमातून भारतीय संगीतावर सखोल मंथन घडवून आणले.
विविध संस्था व महाविद्यालयांची स्थापना
संगीत शिक्षणाचा प्रसार, प्रचार सर्वत्र झाला पाहिजे या सद्हेतूने पंडित भातखंडे यांनी अनेक संगीत महाविदयालयांची स्थापना केली. त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय संगीत विद्यालय (बडोदा), होळकर स्टेट संगीत महाविद्यालय (इंदौर), माधव संगीत विद्यालय (ग्वाल्हेर), मॉरिस कॉलेज ऑफ इंडियन म्युझिक (लखनौ) यांचा समावेश होतो.या महाविदयालयांच्या माध्यमातून संगीत अभ्यासक्रम निश्चित करून परीक्षा पद्धती अस्तित्वात आणली आणि संगीत क्षेत्रामध्ये लक्षणीय बदल घडायला सुरुवात झाली.
विविध मानसन्मान व पुरस्कार:
भारतीय संगीताला एक नवी दिशा देऊन, त्यात आमूलाग्र बदल घडवून समाजाच्या सर्व स्तरापर्यंत संगीत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केल्याबद्दल पं. भातखंडे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त भारत सरकारने पोस्टाचे तिकीट काढून त्यांचा मरणोत्तर गौरव केला. याचबरोबर काशी येथील 'संगीत कलानिधी हा पुरस्कार त्यांना मिळाला.अशा या महान कलावंताचे निर्वाण १९ सप्टेंबर, १९३६ रोजी झाले.