गुरुशिष्य परंपरा व आधुनिक संगीत शिक्षण पद्धती
‘‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ’’
भारतीय संस्कृतीतील विविध कलांचे संवर्धन करण्यासाठी महान गुरु शिष्य परंपरा अगदी प्राचीन काळापासूनच आपल्या देशात अस्तित्वात आहे. अगदी पुरातन रामायण, महाभारत काळापासून गुरुकुलात प्रतिभाशाली विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना पारंगत केले जात असे. भारतीय संगीतात गुरु-शिष्य परंपरेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. गुरु-शिष्य परंपरेपासून आधुनिक संगीत शिक्षणाचा प्रवास कशा पद्धतीने झाला तो खालील मुद्द्यांच्या आधारे पाहता येईल.
गुरु-शिष्य परंपरा :
गुरूंना पूर्वी संगीत क्षेत्रात खूप मानाचे स्थान होते. अनेक राजे-महाराजे व बादशहांना आपल्या दरबारात मोठे संगीत तज्ज्ञ आहेत याचा अभिमान वाटत असे. अशा थोर गुरूंचे अनेक राजांनी व बादशहांनी शिष्यत्व पत्करले. राजाश्रय लाभल्यामुळे हे कलावंत रात्रंदिवस संगीत साधना करून विद्यादान करत असत. शिक्षणासाठी अनेक शिष्यांना पायपीट करावी लागे. अखंड परिश्रम करून गुरुसेवा करून गुरूंची मर्जी संपादन करावी लागत असे. शिष्यांना गुरूंच्या समोर बसून विद्या ग्रहण करावी लागे. या काळात ग्रंथांची उपलब्धता व संगीत जतन करून ठेवण्याची काही सोय नसल्यामुळे शिष्यांना गुरुकुल पद्धतीशिवाय पर्याय नव्हता. गुरुगृही राहून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरच या शिष्याला आपली कला सादर करण्याची अनुमती मिळत असे. अगदी प्राचीन काळापासून आजही गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व आहे. सर्व ललित कलांपैकी संगीत ही अशी एकमेव कला आहे की जी गुरूमुखातूनच घ्यावी लागते. स्वरतालाचे ज्ञान, आवाज व स्वर लावण्याचे तंत्र, राग विस्ताराची पद्धत अशा अनेक बाबी गुरूच समजावून सांगू शकतो. त्यामुळे आजही संगीतात गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व टिकून राहिले आहे. १४ व्या शतकाच्या उत्तरार्धात घराण्यांचा उदय झाला.घराण्यांच्या उदयामुळे संगीतक्षेत्र ढवळून निघाले. शास्त्रीय गायन व त्यातल्या त्यात ख्यालगायनाचा प्रचार होऊ लागला.
आधुनिक संगीत शिक्षण पद्धती :
इंग्रजांनी भारतीय कला व संगीताची उपेक्षा केल्यामुळे कलावंतांना संस्थानिकांचा अथवा कोठ्यांचा आधार घ्यावा लागला. अशा काळात महाराष्ट्रात दोन तेजस्वी तारे जन्माला आले. ते तारे म्हणजेच पं. वि. ना. भातखंडे व पं. वि. दि. पलुस्कर. पं. वि. दि. पलुस्कर यांनी ५ मे १९०१ रोजी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. या पाठोपाठ पं.वि.ना. भातखंडे यांनीही मॉरिस कॉलेज, माधव संगीत विद्यालय, भारतीय संगीत विद्यालय अशा विद्यालयांची सुरुवात केली. या विष्णुद्वयांनी भारतीय संगीतात शास्त्र व क्रियात्मक संगीत यांचा समन्वय घडवून आणला. शास्त्रशुद्ध स्वरलेखन करून अनेक ग्रंथांची निर्मिती केली. स्वरलिपीची निर्मिती करून भारतीय संगीत जिवंत ठेवले. अशा प्रकारे पं.पलुस्कर व पं.भातखंडे यांनी संगीतासाठी सर्वस्व अर्पण केले. गुरु-शिष्य परंपरा मागे पडत असतानाच संगीत विद्यालयाच्या माध्यमातून आज संगीताचा प्रसार होत आहे. अनेक संगीत विद्यालयांतून संगीताचे शिक्षण देणे चालूआहे. परीक्षा पद्धती, त्याला अनुरूप अभ्यासक्रम यामुळे आज संगीत घराघरात जाऊन पोहोचले आहे. अनेक संगीत संस्थांकडून संगीताच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. यामुळे अनेक कानसेन व तानसेन निर्माण होत आहेत.आधुनिक काळामध्ये गुरुकुल पद्धतीबरोबरच परीक्षा पद्धती अस्तित्वात आली त्यामुळे एका गुरूकडे अनेक शिष्य एकाच वेळी शिकू लागले. अभ्यासक्रम वेळेमध्ये पूर्ण करण्याकडे गुरूंचा अधिक कल राहिला. श्रोत्यांची अभिरुची
लक्षात घेता कलाकाराला विविध गीतप्रकार सादर करण्याची गरज निर्माण झाली. त्यामुळे आधुनिक काळामध्ये एक शिष्य वेगवेगळ्या गुरूंकडे वेगवेगळे गीतप्रकार शिकू लागला.
थोडक्यात आधुनिक काळामध्ये एकाच गुरूकडे अनेक शिष्य आणि एक शिष्य अनेक गुरूंकडे संगीताची तालीम घेऊ लागला. त्यामुळे घराण्याच्या भिंती अस्पष्ट झाल्या.
आजकाल Online शिक्षण पद्धतीही अस्तित्वात आली आहे. एकमेकांपासून दूर अंतरावर असलेले गुरू Online शिक्षण पद्धतीने शिष्याला गायन, वादन, नृत्य
शिकवताना दिसतात. Head Phone च्या माध्यमातून दूर अंतरावरील गुरूंचे संगीतातील बारकावे शिष्य आत्मसात करू शकतो. तसेच शिष्याच्या गाण्यातील त्रुटी गुरू सुधारू शकतो. त्यामुळे अत्यंत सोयीची अशी ही शिक्षण पद्धती आजकाल लोकप्रिय होताना दिसते.
संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए नीचे दिए गए सोशल मीडिया बटन पर क्लिक करके अभी जॉईन कीजिए।
संगीत की हर परीक्षा में आनेवाले महत्वपूर्ण विषयोंका विस्तृत विवेचन