उपज

0

             


          

उपज

 भारतीय संगीतात 'उपज' या संज्ञेला खूप महत्त्व आहे. 'उपज' हा हिंदी भाषेतील स्त्रीलिंगी शब्द आहे. मराठी भाषेतही हा शब्द 'उपज' असाच असून स्त्रीलिंगी आहे. 'उपज' हे भारतीय संगीताचे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानता येईल.कलाकाराचा रियाज, चिंतन, बुद्धिमत्ता, स्वभाव, सांगीतिक स्तर, त्याची मानसिकता, हजरजबाबीपणा इ. गोष्टींचे थोडक्या वेळेत दर्शन करून देणारी व कलाकारामधील वरील गोष्टींचे प्रतिनिधित्व करणारी ती 'उपज' होय. खरेतर 'उपज' या संकल्पनेला व्याख्येच्या चौकटीत बसविणे खूप कठीण किंवा जवळजवळ अशक्य आहे. म्हणून 'उपजे'ला 'संज्ञा' न म्हणता 'संकल्पना' म्हटले आहे. कारण 'संज्ञा' व 'संकल्पना' या दोहोमध्ये खूप फरक आहे. कारण 'संज्ञा' ही विशिष्ट व्यक्ती, जागा किंवा एखादी विशिष्ट गोष्ट निर्देशित करते. तर 'संकल्पना' ही मनात निर्माण झालेली रचना, तरकीब आणि संज्ञेसहित इतर अनेक गोष्टी म्हणजे विशिष्ट कार्य, कृती, एखादी स्थिती इ. सर्व गोष्टी आपल्यामध्ये सामावून घेणारी असते. त्यामुळे संकल्पनेची व्याप्ती प्रचंड व खूप सखोल आहे. (जसे की तबल्यातील पेशकार. 'संज्ञा' नसून 'संकल्पना'च. म्हणूनच पेशकारवादन 'उपज' अंगाने होण्याची अपेक्षा केली जात असावी.) .

             'संगीतशास्त्राच्या चौकटीत राहूनही नवीन प्रयोग करण्याच्या तसेच नावीन्य आणण्याच्या हेतूने कदाचित स्वतःच्याही नकळत एखादी सौंदर्यपूर्ण, सृजनात्मक, सांगीतिक क्रिया कलाकाराकडून घडते, तिला 'उपज' असे म्हणतात. महत्त्वाची गोष्टी म्हणजे ही गोष्ट जाणीवपूर्वक होत नाही. म्हणजेच 'उपज' 'केली जात नाही तर ती 'घडते'. काही कलाकार, ही माझी 'उपज' आहे असे सांगून एकच गोष्ट अनेक मैफिलींमध्ये ऐकवतात असे ऐकले आहे. ही कृती 'उपज'चा चुकीचा अर्थ लावणारी आहे. श्रेष्ठतम कलाकारालाही त्याचीच 'उपज' पुन्हा सादर करणे शक्य होईल असे नाही. कारण ती कृती नसून सृजनशील अशी आपोआप घडणारी क्रिया आहे. मराठी भाषेचा विचार केला असता 'उपज' हा शब्द 'उपजवणे' या शब्दावरून तयार झाला असावा. 'उपजवणे' या शब्दाचा अर्थ प्रसविणे, जन्म देणे, निर्माण करणे असा होतो. याचा अर्थ आठवणीत ठेवून, पुन्हा पुन्हा केली जाऊ शकणारी कृती म्हणजे 'उपज' नव्हे. साधी गोष्ट आहे; माता एखाद्या मुलाला एकदाच प्रसविते. तिला पुन्हा तसाच पुत्र प्रसवणे शक्य आहे का? खचितच नाही. नंतरचा पुत्र आधीपेक्षा चांगला तरीअसेल किंवा सुमार असेल. रंग, शरीरयष्टीमध्ये थोडाफार का होईना, फरक असेल. तीच गोष्ट संगीतातील उपजेची आहे. कलाकाराकडून घडून गेलेली एखादी सौंदर्यपूर्ण रचना पुन्हा तशीच घडणार नाही. आधीची उपज डोळ्यांसमोर ठेवून प्रयत्न केला असता पूर्वीपेक्षा चांगली अथवा सुमार कलाकृती निर्माण होईल. आपलीच एखादी रचना उपजेच्या साहाय्याने पुनःपुन्हा ऐकून पाठ करून पुन्हा मैफलीत सादर केली तर ती सृजनशील उपज न राहता एक पूर्वनिश्चित रचना बनेल. कारण कलाकार दुसऱ्यांदा सादर करताना ती 'बद्ध' झालेली असेल. हाच फरक रचना व उपजमध्ये आहे. उपजेमुळे भारतीय संगीताचे सौंदर्य वृद्धिंगत झालेले आहे. उपजेमुळे सर्व कलाकारांना आपल्या बुद्धीची झेप, सौंदर्यदृष्टी चिंतन, प्रतिभाशक्ती दाखवण्याची संधी मिळते. तबल्याच्या (अथवा अवनद्ध वाद्यांच्या) संदर्भात बोलायचे झाल्यास 'उपज' होण्याची संधी प्रामुख्याने बोलरचना, लयकारी यांमध्ये असते. ज्यांना श्रोत्यांच्या मानसशास्त्राची कल्पना आहे त्यांना हे पक्के माहीत असते की, अपेक्षाभंगातून उच्चकोटीची सौंदर्यनिर्मिती होऊ शकते. हा अपेक्षाभंग अर्थातच श्रोत्यांचा असतो. वादक आता पुढे अमुकप्रमाणे वाजवून समेला येईल अशी जाणकार श्रोते अपेक्षा करत असताना श्रोत्यांच्या कल्पनेपलीकडील मार्गाने समेला येणे व दाद घेणे ही एक प्रकारची उपजच आहे. पण हा श्रोत्यांचा सुखद अपेक्षाभंगही आहे. उपजेच्या संधी बोल, रचनेमध्ये असतात. यावेळी वाजविताना मूळ बंदिश वाजविल्यावर तालाच्या चौकटीत राहून बोलात सूक्ष्म बदल करून, बोलांच्या दर्जात बदल करून मूळ बंदिशीतील जोरकस व कमजोरकस स्थानांची अदलाबदल केल्यासही 'उपज' होऊ शकते. या प्रकारच्या उपजेची शक्यता जास्तीत जास्त विस्तारक्षम रचनांच्या बाबतीत असते. म्हणूनच विद्वान कलाकार 'कायदा' या रचनेत मूळ कायदा (मुख) एकपटीत वाजवून झाल्यावर त्या मुखातील बोलांचे वजन थोड्याफार प्रमाणात त्यांची जागा, अवसान इ. मध्ये बदल करून तसेच कधीकधी मूळ कायद्यातील बोलामध्ये किंचितसा बदल करून उपज करतात. 'पेशकार' ही संकल्पना तर पूर्णपणे 'उपज' आहे. ही उपज निर्माण करण्यात साहाय्यभूत असणारे घटक म्हणजे कलाकाराचा रियाज, चिंतन, नाद-लय,सौंदर्यदृष्टी, श्रोत्यांचे मानसशास्त्र जाणण्याची क्षमता इ. आहेत. पूर्वसंकल्पित रचना म्हणजेच गत, गततोडे, परन इ. मध्ये उपजेची शक्यता फारशी आढळत नाही. पण विशेषत: 'गत' या रचनाप्रकारामधील काही 'गती' अशा असतात की, ज्यांचा थोडाफार विस्तार होतो. अशा गतीमध्ये बोल व लयीच्या विविध दर्जाद्वारे उपज होते. तबलावादनातील दोन महत्त्वाची अंगे म्हणजे स्वतंत्र वादन व साथसंगत होय. पूर्वी आपण चर्चा केल्याप्रमाणे स्वतंत्र वादनात उपज कशी येऊ शकते है पाहिले.  


साथसंगतीमध्ये उपजेचे स्थान 

                  गायन-वादनाला तबल्याची साथसंगत करणे हे अतिशय कष्टसाध्य कार्य आहे. साथसंगत खचितच सोपी नाही. माझ्या मते बऱ्याचवेळा साथसंगत ही स्वतंत्र वादनापेक्षा कठीण असते. कारण स्वतंत्र वादनाला वेळ, विचार, साहित्य, लय, श्रोते या सर्व गोष्टींवर एक मुख्य वादक म्हणून तबलावादकाचा हक्क असतो, तर साथसंगतीला एका बाजूला बसून मुख्य कलाकाराच्या सूचनांची अंमलबजावणी करावयाची असते. त्याला पूरक वाजवायचे असते.  त्यामुळे अर्थातच पुढच्या वादनासाठी तो काही ठोस योजना बनवू शकत नाही. अशावेळी प्रतिभावान कलाकार उपजेच्या अंगानेच साथसंगत करतात. याचसाठी स्वतंत्र वादनापेक्षा साथसंगतीमध्येच उपजेच्या शक्यता जास्त आहेत. काही तबलावादक नेहमी एकाच वादकाच्या साथीला असतात. यामुळे त्यांना मुख्य वादकाची वादनसामग्री व वादन, त्याच्या लकबी, त्याची शारीरिक व बौद्धिक क्षमता इ. गोष्टी ज्ञात असतात. त्यामुळे २/३ मैफिलींनंतरच त्या वादकाबरोबर कोणत्या लयीला कोणती गोष्ट वाजवायची हे साथीदाराने ठरविलेले असते. त्यामुळे यावेळी उपजेला संधी जवळजवळ नसतेच. याउलट काही प्रतिभावान व हजरजबाबी तबलावादक मूळ वादकाला जबाब सादर करताना पूर्णपणे उपज अंगाने वादन करतात. यामध्ये तालाच्या मात्रांचे, समेचे भान खूप चांगले असणे महत्त्वाचे असते. गायनासमवेत ठेक्याव्यतिरिक्त फारसे वाजविण्याची मुभा नसते. पण कधीकधी थोडाफार अवसर मिळाल्यास काही तबलावादक ३- ४ मात्रांपासून २/३ आवर्तनांपर्यंत उपज करतात.उपज ही संकल्पना शास्त्रीय संगीतात म्हणजेच ख्याल गायन व स्वरवाद्यांबरोबर संगत करताना दिसून येते. उपशास्त्रीय संगीतातही उपज घडू शकते. विशेषतः ठुमरीला 'लग्गीनाडा' वेळी गायनाला अनुरूप वाजविताना पूर्वी न वाजविलेली लग्गी वाजू शकते. पण सुगम संगीतात ही उपजेची शक्यता दिसत नाही. कारण सुगम संगीत हे बद्ध असते. पण बऱ्याचवेळा मोठे सुगम गायक- गायिका आपलेच पूर्वी ध्वनिमुद्रित झालेले गाणे मंचावर सादर करताना मुखड्यात वगैरे बदल करून सादर करतात.




संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए नीचे दिए गए सोशल मीडिया बटन पर क्लिक करके अभी जॉईन कीजिए।

संगीत की हर परीक्षा में आनेवाले महत्वपूर्ण विषयोंका विस्तृत विवेचन
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Please Follow on FacebookFacebook
Please Follow on InstagramInstagram
Please Subscribe on YouTubeYouTube

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top