सतार व जलतरंग
सतार
भारतीय वाद्यांना फार मोठी प्राचीन परंपरा लाभलेली आहे.काळाच्या ओघात काही नवीन वाद्ये उदयास आली. वर्तमानामधील प्रसिद्ध तंतुवाद्य म्हणून सतार या वाद्याचा उल्लेख करावा लागेल. सतारीला ‘द क्वीन ऑफ इंडियन इंस्ट्रुमेंट्स’ असे म्हणायला हरकत नाही. सतार या भारतीय तंतुवाद्याला सितार, सेतार, सेतारा अशा विविध नावाने ओळखले जाते. या वाद्यांच्या उत्पत्तीबाबत विद्वानांमध्ये विभिन्न मते असल्याचे दिसून येते.
सतार या वाद्याची निर्मिती व त्यामधील परिवर्तने :
मध्य पूर्वेतील तंबूर व पंडोर या वाद्याशी सतारीचे नाते जोडले जाते. पुतळ्यांवर व मुद्रांवर अशा वाद्यांच्या प्रतिमा आढळतात. फारसी भाषेत याला तार, दुत्तार, सेह-तार (त्रितंत्री) इत्यादी नावे आहेत. शारंगदेवांच्या संगीत रत्नाकर या ग्रंथात तीन तारांच्या वाद्याला त्रितंत्री असे म्हटले आहे. या वाद्यात कालानुरूप बदल होत गेले व सध्याची सात तारांची सतार विकसित झाली. संगीत समयसार या ग्रंथात सितार हेच नाव आहे. सेहतार या काश्मिरी वाद्याशी वर्तमानमधील सतारीचे बरेचसे साम्य आढळते. याच बरोबर ‘उद’ या पर्शियन वाद्याशीही सतारीचे साम्य आढळते. अमीर खुसरो या संगीत तज्ञाने या पर्शियन वाद्याची व भारतीय वीणा या वाद्याची सांगड घालून सतार निर्माण केल्याचे सांगितले जाते.
सतारीची रचना :
सतारीचा आकार सर्वसाधारणपणे तंबोऱ्यासारखा असतो. तंबोऱ्याप्रमाणेच सतारीला एक भोपळा, गळा व एक पोकळ लाकडी दांडी असते. ही दांडी वरच्या बाजूने चपटी व खालून गोलाकार असते. याची लांबी तीन फुट व रुंदी तीन इंच असते. या दांडीवर वक्राकार पितळी किंवा पंचधातूचे पडदे असतात. तारांच्या आधारासाठी हस्तीदंती पट्टी व घोडी तसेच स्वर मिळवण्यासाठी खुंट्या लावलेल्या असतात. वादनासाठी असलेले पितळी पडदे खाली-वर सरकवता येतात. यामधील ७ तारा पोलाद व पितळाच्याअसतात. शेवटच्या दोन तारांना चिकारीच्या तारा म्हणतात.
सतार वाजवण्याच्या पद्धती :
सतारवादनात प्रभुत्व मिळवणे अतिशय अवघड आहे. उजव्या हाताच्या तर्जनीवर घातलेल्या मिझराबाने (नखीने) तार छेडली जाते. उजव्या हाताचा अंगठा खालच्या भोपळ्यावर दाबून धरल्याने उजवा हात स्थिर राहतो. सतार वादन हे प्रामुख्याने आलाप, जोड, झाला या क्रमाने वाजवून गत वाजवली जाते. चिकारीच्या तारेवर पहिल्या बोटाने किंवा करंगळीने झंकार निर्माण करतात, यालाच झाला असे संबोधले जाते. या वाद्याला तबला वाद्याची साथ असते. अलीकडील काळात तबल्याबरोबर पखवाजही साथीसाठी घेतला जात आहे.विलंबित, मध्य, द्रुत, अतिद्रुत गतीचे व मींडयुक्त स्वरांचेही वादन या वाद्यामध्ये करता येते.
सतार वाद्याची लोकप्रियता व कलावंतांचे योगदान :
अमीर खुसरो यांची दोन मुले फिरोज खाँ आणि मसजिद खाँ ही सतारवादनात पारंगत होती तर आधुनिक काळातील उ. विलायत खाँ, पं. रविशंकर या आंतरराष्ट्रीय कलाकारांनी देशविदेशात या वाद्यांचे वादन करून या वाद्याला व भारतीय संगीताला ही मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली.
जलतरंगची ऐतिहासिक पार्श्वभूमी व त्याचे विविध संदर्भ :
जलतरंग हे प्राचीन भारतीय वाद्य आहे. या वाद्याचा शोध चौथ्या ते सहाव्या शतकादरम्यान लागल्याचे मानले जाते. या वाद्याला जलवाद्य, उदक किंवा जलतंत्री वीणा असेही म्हटले जाते. पूर्वीच्या काळी धातूच्या भांड्यामध्येपाणी ठेवून वाजवले जाणारे हे वाद्य अलीकडील काळात मात्र चिनीमातीचे बाऊल वापरून वाजवले जाते. कृष्णाच्याकाळामध्ये या वाद्याला जलयंत्र या नावाने ओळखले जायचे.
जलतरंगची रचना :
यामध्येचिनीमाती, धातू किंवा पितळेच्या वेगवेगळ्या आकाराच्या वाट्या असतात. कमीतकमी बारा, जास्तीत जास्ती सव्वीस लहानमोठ्या आकाराच्या वाट्या यामध्येवापरतात. अर्धगोलाकार पद्धतीने या सर्व वाट्यांची मांडणी केली जाते व त्यामध्ये पाण्याचा स्वरानुरूप वापर केला जातो.
जलतरंगाची वादन पद्धती :
रागाच्या, गीताच्या अनुषंगाने अनेक लहान मोठ्यावाट्या कमी जास्त पाणी भरून अर्धगोलाकार रचना करून जलतरंगाचे वादन करावे लागते. जलतरंग लाकडी काड्यांनी वाजवले जाते. पाणी भरलेल्या वाट्यांच्या कडांवर लाकडी काड्यांनी हलकेच टिचकीसारखा आघात करून यातून नाद निर्माण केला जातो. या आघाताने पाण्यावर तरंग उठतात आणि त्यातून वादक आपल्या कौशल्याने संगीताची वैविध्यपूर्ण निर्मिती करतो. काड्या किती जोरात वा हलके मारायच्या हे त्या त्या कलावंताचे कौशल्य असते.
जलतरंग वादक व त्याचे योगदान :
जलतरंग या वाद्याला सर्वत्र प्रतिष्ठा मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अनेक कलावंतांनी केलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कुमार पंकज साखरकर, पं. दत्तोपंत मंगळवेढेकर, रामराव परसातवार, मास्तर बर्वे, शंकर विष्णू कान्हेरे, मिलींद तुळाणकर, सिता दोरया स्वामी, रागिणी त्रिवेदी इत्यादी.