भारतीय राग संगीत..!
भारतीय शास्त्रीय संगीतातील राग ही अतिशय रमणीय, श्रवणीय, विलोभनीय अशी संकल्पना आहे. रागाची एक ठराविक सौंदर्यपूर्ण अशी आकृती अथवा छबी असते. ही आकृती तर्कसंगत, लालित्यपूर्ण, अतिशय नेटकी, अभिव्यक्त होणारी आणि विस्तारक्षम अशी असते. रागाच्या या आकृतीत असंख्य स्वर- संवाद दडलेले असतात. राग एक गाव मानलं तर, त्यात वेगवेगळ्या स्वररचनांचे उत्तम असे विविधरंगी स्वरपुष्पांनी डवरलेले रस्ते आणि गल्ल्या आपल्याला आढळून येतात. रागातील स्वरसमूहातील स्वरांचं विहंगम, सुंदर नृत्य गायक आपल्या आवाजातून सादर करतो आणि तो राग श्रोत्यांसमोर तंतोतंत उभा राहतो. राग श्रोत्यांसमोर बंदिशीचे विविध पोशाख घालून येतो. बंदिशीच्या कोंदणात रागाची आकृती बद्ध होते. बंदिशीच्या शब्दांतून राग आपल्या भावना प्रकट करू लागला की, रागभाव तयार होऊन श्रोत्यांच्या हृदयात उतरतो आणि श्रोते त्या रागाचा अवर्णनीय आनंद घेऊ लागतात. ज्याप्रमाणे एखाद्या फुलाला विवक्षित सुगंध असतो, तसा प्रत्येक रागाला एक भाव असतो. यास रागभाव असं म्हणतात. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या फुलांचा सुगंध आपल्या मेंदूत एका विशिष्ट आकृतीमध्ये लिहिला जातो आणि एखादा विवक्षित सुगंध आपण घेतल्यावर विवक्षित फूल आहे असं आपण सांगतो, त्याचप्रमाणे एखादा राग वारंवार ऐकल्यावर आपल्या मेंदूमध्ये ती एका विशिष्ट आकृतीत लिहिला जातो आणि तो राग ऐकल्यावर आपण सांगतो की, हा राग अमुक अमुक आहे. ज्याप्रमाणे सुगंधाला मानवी भावना नसतात, त्याचप्रमाणे रागालासुद्धा विशिष्ट मानवी भावना नसतात. सुगंध नेहमी माणसाला आनंद आणि सौख्य प्राप्त करून देतो. तसंच, सूरही माणसाच्या आनंदात भरच घालीत असतात. सुगंध काय किंवा मंद वाऱ्याची झुळूक काय, किंवा डोळ्यांना दिसणारं भव्य असं निसर्गाचं चित्र काय, माणसाला नेहमीच आनंदी आणि उत्साहित करीत असतं. त्याचप्रमाणे कोणतंही सुश्राव्य, सुरेल, श्रवणीय असं संगीत माणसाला समाधी अवस्थेत नेतं, त्याच्या सर्व चिंता दूर करतं आणि त्याला एका वेगळ्याच शांतीचा अनुभव करून देतं. सुश्राव्य म्हणजे कानाला सहन होणारं संगीत, सुरेल म्हणजे विरघळून गेलेलं संगीत, श्रवणीय म्हणजे लोकांच्या पसंतीस उतरलेलं संगीत. असं संगीतच समाजाला आनंदाच्या वाटेकडं घेऊन जातं. आपल्या भारतीय शास्त्रीय, राग संगीताने आज संपूर्ण जगाला आनंदाची अशी सुखमय वाट दाखवली आहे. आज पूर्ण जग भारतीय अभिजात संगीताच्या प्रेमात आकंठ बुडालं आहे.
रागात आलाप, बोल आणि तान असे तीन महत्त्वाचे घटक असतात. अलीकडे यात 'सरगम' हा एक नवा घटक मिसळला गेला. हे सर्व घटक लयीच्या श्वासावर स्वार होऊन आपलं अस्तित्व सिद्ध करीत असतात. लय म्हणजे गती (speed). ब्रह्मांडात प्रत्येक वस्तूला गती आहे. आपली पृथ्वी स्वतःभोवती एका विशिष्ट गतीत फिरत असते, त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाच्या चालण्याची, बोलण्याची, व्यक्त होण्याची. समजून घेण्याची आणि समजावून देण्याची गती ही वेगळी असते. गतीशिवाय वस्तू नाही, माणूस नाही, वृक्ष नाहीत, वेली नाहीत.... चराचरास ही गती व्यापून राहिली आहे. प्रत्येक रागालासुद्धा एक गती असते. जसं दरबारी कानडा हा राग अतिशय संथ गतीत गातात. तर सोहनी हा राग द्रुतगतीत (जलदगती) गायला जातो. द्रुतगतीत फिरणाऱ्या स्वरांचा अनुभव आपण पूर्णपणे घेऊ शकत नाही, कारण आपल्या कानांची शक्ती तेवढी तीव्र नसते; परंतु संथ गतीत गायलेल्या स्वरांचा पूर्ण अनुभव आपण आपल्या कानांनी घेऊन आणि कर्णेद्रियांमध्ये साठवून ठेवू शकतो. म्हणून आलापांच्या प्रशस्त मंदिरावर तानांचा कळस असतो असं म्हटलं जातं. म्हणून प्रत्येक राग गाताना आलाप, बोल आणि ताना हे तीनही घटक खूप महत्त्वाचे आणि आवश्यक आहेत, त्यामुळे रागाची एक मनोहर आणि सुंदर मूर्ती गायक किंवा वादक आपल्या प्रतिभेच्या उत्कट करू शकतो.