टीव्ही वरील मालिका

0

 
टीव्ही-वरील-मालिका

टीव्ही वरील मालिका


फार पूर्वी चित्रपटसृष्टीत मारामाऱ्या, गोळीबार , हिंसा , विवाहबाह्य संबंध असे विषय विशेष हाताळले जात नव्हते. फार तर प्रेमाचा त्रिकोण असायचा. पण त्यात डावपेच, बलात्कार नव्हते. त्याकाळी पुनर्जन्म , प्रेम , ऐतिहासिक , चागला संदेश देणारे , घरेलु विषय असायचे. अमोल पालेकर नायक असलेले सर्वच चित्रपट खूपच सोज्वळ पण सुंदर होते. जवळजवळ सर्वच चित्रपटांचे कथानक बांधेसूद असायचे. या काळात सर्व चित्रपट अतिशय श्रवणीय आणि दर्जेदार अशा संगीताने नटलेले असायचे. अतिशय प्रतिभावंत संगीतकार या काळात होऊन गेले.


नंतर हळूहळू या चित्रपटातून हिंसेचा संचार झाला. हिंसेची सर्व प्रकारची आयुधे वापरली जाऊ लागली. न पटणाऱ्या मारामाऱ्या, मोठमोठ्या मोटारींची तोडमोड,

बेछूट गोळीबार, बलात्काराचे प्रसंग , स्त्रियांचे शरीर प्रदर्शन अशा गोष्टी सिनेमात दाखविल्या जावू लागल्या. संगीत हळूहळू चित्रपटातून कमी कमी होत गेले. पूर्वीच्या चित्रपटातून १०- १० गाणी असायची तिथे सध्या एखाददुसरे गाणे चित्रपटातून दिसू लागले. आयटेम साँग ही चित्रपटाची गरज झाली. हेच लोकांना आवडते असा दावा निर्माते करू लागले. कलेच्या आविष्कार स्वातंत्र्याच्या नावाखाली हे सर्व घाणेरडे रसायन लोकांच्या डोळ्यात कोंबु लागले. यामुळे समाजात नक्कीच नकारात्मकता वाढीस लागली. दया, क्षमा , शांती ,आदर , आदर्श , अहिंसा हे सर्व हद्दपार झाले. वास्तवाच्या नावाखाली बळजबरी , अन्याय , अनादर , क्रौर्य , क्रोध , विषारी डावपेच यांना सिनेमात मानाचे स्थान मिळाले. 


या सर्व वादळात काही चित्रपट खूप चांगलेही निघाले. या सर्व हिंसेच्या गर्दीत आनंद, अभिमान , परिचय , अमर प्रेम , स्वदेस , तारे जमिनपर , ३ इडिएट्स , पिकू , दंगल , लगान सारखे अनेक चांगले चित्रपट ही निघाले.


मराठीत प्रहार , डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर काशिनाथ घाणेकर , वन रूम किचन , मी शिवाजी राजे भोसले बोलतोय सारखे अनेक चांगले चित्रपटही निर्माण झाले.


नंतर टीव्ही आले. त्यावर सुरुवातीला खूप कमी वाहिन्या होत्या. पुढे पुढे वाहिन्यांचे पीक आले. त्यावर "Daily soap" सुरू झाले. याला आपण मालिका(सिरियल) म्हणू लागलो.


या सिरियल म्हणजे विलंबित लयीत आकारणारी एक कथा असते. पण ही विलंबित लय सर्वच निर्मात्यांना झेपली नाही. शास्त्रीय संगीतात सुद्धा विलंबित लयितील बडा ख्याल गाणे फार अवघड असते.


कथा किती , कशी ताणावी आणि त्याचवेळी ती रसाळ ,तर्कशुध्द, आकर्षक कशी बनवावी हे लेखक आणि निर्मात्याला कळायला हवे. पार्श्वसंगीत किती प्रमाणात वापरावे , त्याचा volume कीती ठेवावा ह्याचाही दिग्दर्शकाला अंदाज असायला हवा. मालिका वर्ष वर्ष ताणल्या जाऊ लागल्या. कथानकाचे तीन तेरा वाजू लागले. मालिकेत डावपेचांना उधाण आले. आणि या मालिका बेचव, निसत्व, आणि नकारात्मक होत गेल्या.


आज काही अपवाद सोडले तर बहुतेक सिरियल चे कथानक हे स्त्री वरील अत्याचार दाखविणारे असते. या मालिकांतील स्त्री अगतिक, स्वभावाने गरीब अशी दाखवितात . स्त्रीची वेगवेगळ्या प्रकारे छळणुक कशी दाखविता येईल ह्याचा विचार सीरियलचे लेखक करीत असतात. त्यातून त्यांना कसला विकृत आनंद मिळतो देव जाणे. पण या सिरियल महिलावर्गात विशेष प्रेमाने बघितल्या जातात हे आश्चर्य आहे.


यात वेगवेगळे डावपेच, सुड , दुसऱ्याला अपमानित करण्याच्या युक्त्या भरपूर असतात. त्यातून सिरियलच्या प्रत्येक पात्राला accident घडवून आणणे , आजारी पाडणे हे चालूच असते. या सर्व प्रकारात "सकारात्मकता" पार हरवून गेली आहे. दृकश्राव्य माध्यमाचा जनमानसावर परिणाम हा सुद्धा मोठा व प्रभावी असतो.

म्हणून यावर विचार व्हायला हवा. याला कोणीतरी विरोध करायला हवा. याविरुद्ध एक चळवळ उभी रहायला हवी. 


कारण आता टीव्ही घराघरात, गावागावात पोहोचला आहे. लाखो लोक आज मनोरंजनासाठी टीव्ही वर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत टीव्ही च्या सशक्त माध्यमातून चांगल्या , समाज कल्याणकारी अशा विचारांना चालना मिळणाऱ्या आणि सकारात्मक विचार देणाऱ्या मालिका तयार व्हायला हव्यात. स्त्रीला सन्मानास्पद ठरतील अशी कथानके सादर व्हावीत. हिंसा, क्रौर्य , डावपेच या गोष्टी कथानकातून हद्दपार व्हायला हव्यात. तरच टीव्ही हे माध्यम समाजाला हितकारक आणि उपकारक होईल असे मला वाटते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top