जगातील सर्वात लोकप्रिय वाद्य म्हणून तबला या वाद्याकडे आज बघितले जाते. हे वाद्य तबला व डग्गा या दोन भागांचे मिळून बनले आहे. तबल्याला दायॉं व डग्ग्याला बायॉं असे म्हणतात. तबला डग्ग्याच्या विविध अंगांचे विश्लेषण:
तबला
१.खोड – तबल्याचे खोड शिसम, सागवान, खैर, बिजासारा, फणस इत्यादी. झाडांच्या बुंध्यापासून बनवतात. खोडाचा आकार वरच्या बाजूने निमूळता होत गेलेला असतो खोडाच्या तोंडाकडील भागाचा व्यास साधारणपणे सव्वापाच, साडेपाच, सहा इंच इतका असतो व तळाचा भाग नऊ इंचापर्यंत असतो. उंची साधारण एक फूट असते. खोड मशीनवर आतल्या बाजूने कोरलेले असते.
२. पुडी - शाई, लव, चाट, गजरा इ. भागांची मिळून पुडी तयार होते. ही बकऱ्याच्या चामड्यापसून बनवलेली असते. संपूर्ण पुडी तबल्याच्या मुखावर चामडीच्या वादीने मढवलेली असते.
३.शाई – साधारण शाई ही तबल्याच्या पुडीच्या मध्यावर घालतात. शाईचे एकावर एक पातळ थर मऊ दगडीगोट्याने घासून भरतात. सरस किंवा मैद्याची खळ, शाई पावडर यांच्या मिश्रणापासून शाई तयार करतात. या शाईमुळे तबला स्वरात लावता येतो. शाईचा थर पातळ असेल तर तो उंच स्वरात आणि शाईचा थर जाड असेल तर तो खालच्या स्वरात तबला लावला जातो.
४. लव – शाई व चाटीच्या मध्ये साधारण अर्धा ते एक इंच रूंदीचा जो भाग असतो त्याला लव असे म्हणतात.
५. चाट – लवेच्या बाजूला आणि गजऱ्याला चिकटून जो अर्धा ते एक इंच रुंदीचा जो भाग असतो त्याला चाट किंवा किनार असे म्हणतात.
६. गजरा- पुडीला गोलाकार बाजूने गुंफून ठेवण्यासाठी चामडीच्या वादीपासून वेणीसारखा गजरा गुंफलेला असतो. गजऱ्याला सोळा घरे व चौसष्ठ छिद्रे असतात. गजऱ्याच्या सोळा छिद्रांतून वादी ओवलेली असते.
७. वादी – तबल्याच्या मुखावर पुडी घट्ट राहावी यासाठी गजऱ्याच्या छिद्रातून जी चामड्याची लांब पट्टी ओवलेली असते त्याला वादी म्हणतात. ही वादी तबल्याच्या तळाशी असलेल्या गुडरीला गुंफलेली असून ती अखंड असते सध्या नॉयलॉनची वादी देखील पहायला मिळते
८. गठ्ठे – तबल्याच्या पुडी वरील ताण कमी अधिक करण्यासाठी गठ्ठ्यांचा उपयोग केला जातो या मुळे तबला स्वरात लावला जातो. साधारणपणे तीन इंच लांब व एक इंच जाडीचे दंडगोलाकार आठ गठ्ठे वादीच्या खाली लावलेले असतात.
९. गुडरी – ही तबल्याच्या तळाला असते तबल्याच्या तळाशी वादीपासून एक कडे तयार केलेले असते. या कडयामधून वादी ओवून गजऱ्यामध्ये ओवलेली असते यामुळे पुडीवरील ताण कायम रहातो.
डग्गा
भांडे – डग्ग्याची पुडी ज्या भागावर मढवलेली असते त्या भागाला भांडे असे म्हणतात. हे भांडे पित्तळ, तांबे व लोखंड इत्यादी धातूपासून बनवलेले असते. भांड्याचा आकार गोलाकार असून आतून पोकळ असतो. भांड्याची उंची साधारण २०–२२ सें. मी इतकी असते. भांड्याचा व्यास साधारण नऊ इंच इतका असतो. डग्याचे भांडे मोठे, मध्यम व लहान अशा विविध आकारात बाघायला मिळते. काही ठिकाणी मातीचे भांडे देखील पहायला मिळते. डग्ग्याचे पुडी, शाई, मैदान, गजरा, वादी, गुडरी भागांची रचना साधारण तबल्याप्रमाणेच असते, डग्ग्याची शाई मध्यभागी न लावता एका बाजूला चाटीच्या जवळ लावतात.