भजन कीर्तनाने ताण-तणाव होतो कमी..!
भजन आणि कीर्तनामुळे ताण-तणाव दूर होऊ शकतो, असे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या एका संशोधनातून समोर आले आहे. मानसिक आजार दूर करण्याच्या प्रक्रियेत भजन -कीर्तन प्रभावी ठरते, असेही संशोधन सांगते. विद्यापीठाच्या संस्कृत विभागाने हा दावा केला आहे. ताण-तणाव दूर करण्यात औषधापेक्षा भजन आणि कीर्तनाची जास्त मदत होते, असा निष्कर्ष संशोधनातून समोर आला आहे. ज्या लोकांना बालपणी नैतिक मूल्ये शिकवली जातात, चांगले संस्कार केले जातात, त्यांना भविष्यात तणावाच्या समस्येचा फारसा सामना करावा लागत नाही. तणावातून बाहेर पडण्यात योगदेखील महत्त्वाची भूमिका पार पाडतो, असे संस्कृत विभागाचे प्राध्यापक सुधीर कुमार यांनी सांगितले. विभक्त कुटुंबातील बहुताश मुलांना तणावाचा सामना करावा लागतो. त्यातही पालकांचे एकुलते एक अपत्य असलेल्या मुलांचे प्रमाण यात सर्वाधिक आहे, असे संशोधन सांगते. औषधे शारीरिक समस्यांसाठी उपयोगी ठरतात. आधुनिक काळात ताण-तणावाच्या समस्या वाढत आहेत. या सर्व संकल्पना पाश्चात्त्य जगातून आल्याचे आपल्याला वाटते. मात्र आपल्या पुराण आणि वेदांमध्ये ताण तणावाचा उल्लेख आहे, असे संशोधक नंदिनी दास यांनी म्हटले. चांगल्या आरोग्यासाठी अध्यात्म आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.