राग समय व रस सिद्धांत

0

 
राग-समय-व-रस-सिद्धांत

राग समय व रस सिद्धांत

 (डॉ. प्रभाताई अत्रे यांच्या एका लेखाच्या अनुषंगाने)


    आज (दिनांक: ११/०९/२०२२,लोकसत्ता) लोकसत्तेत डॉ. प्रभा अत्रे यांचा एक सुंदर लेख वाचनात आला. त्यांचे विचार, लेखन आणि त्यांच्या बंदीशी या काळाशी सुसंगत आणि आधुनिक जगाशी तादात्म्य पावणाऱ्या अशा असतात. त्यांचं लेखन मला नेहमीच आवडत आलेल आहे. या लेखात त्यांनी विज्ञान आणि राग समय, रस सिद्धांत यावर चर्चा केलेली आहे. किंबहुना राग समय या सिद्धांतावर त्यांनी फार सुंदर असे आधुनिक काळाशी सुसंगत असे विचार मांडलेले आहेत.


           खरंतर राग समय सिद्धांतामागे असलेले विज्ञान आपल्यापर्यंत पोहोचू शकलं नाही असं मला राहून राहून वाटतं. संगीत ही एक साधना आहे. प्रत्येक राग ही एक स्वरानुभुती आहे. 


           प्रत्येक स्वराला एक प्रकारचं स्वतःचे असे तेजोवलय असते. त्या वलयाप्रमाणे जेव्हा स्वर एकमेकात मिसळत जातात त्यावेळेला एक विशिष्ट वातावरण निर्मिती होत असते. आपले राग संगीत हे मेलडी म्हणजेच सूर संगती या संकल्पनेवर आधारित आहे. स्वराला स्वर जोडत जोडत त्याची स्वरमाला तयार करणे ही आपल्या संगीताची खासियत आहे. कुठल्याही एका स्वराचा विचार गाताना होत नसतो. अनेक स्वरांची एकत्रित वलये मात्र एखाद्या स्वराला पुढे आणण्यासाठी वापरली जातात. त्या संकल्पनेला आपण वादी आणि संवादी असं संबोधितो. परंतु नुसता एक स्वर स्वतंत्रपणे कोणी गात नाही आणि तसं जर कोणी गायलं तर ते संगीत आहे असं आपण मानणार नाही. स्वरांच्या विविध मिश्रणातून निर्माण झालेला एक ऊर्जाप्रकाश , रागरस , किंवा वातावरण याचा शोध आज पर्यंत हजारो प्रतिभावंतांनी आणि गायकांनी घेतला आणि त्यातून हा राग समय निर्माण झाला असावा असं मला राहून राहून वाटतं.


           राग गायन हे काही विशिष्ट लोकांसाठीच असावे असं मला वाटतं. यात दोन प्रकार पडतात. एक लोकांसाठी(मनोरंजनासाठी) गायन आणि दुसरा प्रकार म्हणजे स्वतःसाठी(साधना) राग गायन करणे. राग गायन स्वतःसाठी करताना आपल्याला या समय सिद्धांताची चांगली प्रचिती येऊ शकते. जेव्हा आपण सकाळी ०७.०० वाजता किंवा सहा ते सात या दरम्यान भैरव राग गात असतो त्या वेळेला "कोमल रे" आणि "कोमल ध' हे स्वर विशेषत्वाने प्रकाशित होतात अशी आपल्याला सूक्ष्म जाणीव होते. त्यातून सूर्य जसजसा वर येतो, म्हणजेच संगीतातील आरोह हा प्रवाहित होत जातो तसतसे कोमल ध चे प्राबल्य वाढत जाते. आणि या कोमल ध मधून सुंदर अल्हाददायक आणि भक्तिमय अशा प्रकाश तत्त्वाचा आपण अनुभव घेत राहतो. निदान मला तरी तसा अनुभव आला आहे. परंतु एखादा राग (उदाहरणार्थ यमन, बिहाग) जर आपण पहाटे पहाटे जाऊ लागलो तर ती पहाट आपल्याला तेवढीशी मनाला पटत नाही. कारण यमन राग हा अवरोही चलनाने गातात आणि गंधारावर येऊन पडतात. परंतु पहाटेच्या वेळेला सूर्य हा वरवर येत असतो आणि त्याच्याबरोबर विरुद्ध जर यमन रागातील स्वर आपण अवरोही ढंगाने म्हणत राहिलो तर त्याचा उलटा परिणाम आपल्याला दिसू लागतो. म्हणून यमन रागातील गंधार हा अवरोहातून अतिशय चांगल्या प्रकारे व्यक्त होतो. आणि अवरोह म्हणजेच सूर्याचं निर्गमन किंवा मावळण. सूर्याच्या मावळण्याशी यमन रागातील अवरोहाचा संबंध असतो, आणि ग म्हणजेच गांधार या स्वरामध्ये एक आर्त शांतता आणि विरहाची भावना भरलेली असते असं मला राहून राहून वाटतं. या सर्व स्वरसंवेदना आणि अनुभूती या प्रत्येक गायकाने आपापल्या सामर्थ्याप्रमाणे किंवा आपापल्या संवेदनशीलतेप्रमाणे घ्याव्यात म्हणजे राग समय हा आपल्याला कळू लागतो.


           परंतु सूर्यदर्शन आज-काल फार कमी लोकांना होते. सकाळीच घाई गडबडीत माणूस आपापल्या नोकरीच्या ठिकाणी गाड्या पकडून जातो आणि तिथेच दहा दहा तास एयर कंडीशन रूम मध्ये बसून काम करतो. त्यामुळे त्याला निसर्गातील पहाट, सकाळ, दुपार, संध्याकाळ (त्यातूनही कातरवेळ, संधिप्रकाश) आणि रात्र याची विशेष संवेदना होते असं मला वाटत नाही. कारण एकदा ऑफिसमध्ये जाऊन बसल्यावर त्याला सूर्यदर्शन तर होतच नाही. परंतु घरी गेल्यावर पुन्हा बंद खोलीत बसल्यावर त्याला चंद्र दर्शन सुद्धा होत नाही. चांदण्याही त्याला बघता येत नाहीत. कातर वेळ, संधी प्रकाश या गोष्टी बघण्याचे भाग्य आज फार कमी लोकांना मिळत असते. हे सर्व वातावरण प्रभाताईंनी आपल्या लेखात फार चांगल्या पद्धतीने मांडले आहे.


         डॉ. प्रभाताई लिहितात, "आज मानव निसर्गापासून खूप दूर...चार भिंतींच्या आत कृत्रिम वातावरणात राहतो आहे. त्याची जीवन पद्धती, त्याच्या सवयी यामध्येही खूप बदल झाला आहे. अशा परिस्थितीत राग आणि समय यांचा संबंध कसा जोडायचा ?".

त्या पुढे म्हणतात," काळ बदलतो आहे, पाहून कलाही बदलते. हे बदल नुसते अपरिहार्य नसतात तर महत्त्वाचे आवश्यकही असतात. त्यामुळे कला त्या त्या काळाच्या संदर्भात अनुभवायला हवी. स्वच्छ मनानं कुठल्याही घटनेचा अनुभव घेणे फार कठीण असतं. संस्कार, शिक्षण, सहवास, अनुभव, क्षमता इच्छा इत्यादी गोष्टी एखादी गोष्ट चांगली आहे की वाईट हे ठरवताना परिणाम करतात".


       आणि म्हणूनच राग समय सिद्धांत आज कितपत काळाच्या कसोटीवर उतरेल असा एक प्रश्नही मांडला आहे. आज शास्त्रीय गायन हे बंद हॉलमध्ये गायले जाते त्यामुळे राग गायन होताना कोणती वेळ आहे हे श्रोत्यांना जाणवत नाही. म्हणून राग समय सिद्धांत तेथे थोडासा मागे पडतो. 


      आता रसनिष्पत्ती याबाबत जर विचार केला तर मला असं वाटतं की शास्त्रीय संगीतातील राग त्यातील स्वरांच्या अभिसरणातून किंवा स्वभावातून एक वेगळा प्रभाव आणि एक वेगळाच रस निर्माण करतो. आणि हा रस माणसातील विकार दूर करतो. विचारांना थांबवतो. रस म्हणजेच आपण नवरस मानतो. त्यामध्ये विरह, प्रेम, भक्ती शांती,हास्य, बीभत्स असे अनेक रस येतात. परंतु हे सर्व रस मनाला विचलित करतात आणि मनाला विकार वश करतात. त्यामुळे मानसिक मानसिक आणि शारीरिक आरोग्य कुठेतरी बिघडते असे मला वाटते. परंतु शास्त्रीय संगीतातील रागांच्या स्वरांच्या विशिष्ट आंदोलन आणि कंपनामुळे मनातील विकार आणि विचार यांना पायबंद बसतो.

आणि मन एका समाधी अवस्थेमध्ये जाते, असे मला वाटते. रागातील स्वराभिसरण जे काही रसायन तयार करते त्यातून एक विशिष्ट राग रस निर्माण होतो आणि तो मनाच्या अनियमित आणि वाईट आंदोलनांना म्हणजेच राग, लोभ, मोह, काम, अहंकार यांना शांत करतो आणि तो साधक अध्यात्माच्या वाटेवर सुखेनैव प्रवास करू लागतो. म्हणून भारतीय शास्त्रीय संगीत हा एक वेगळा संजीवक आणि सात्विक भाव निर्माण करणारा रस आहे असे मला वाटते.


      डॉ.प्रभा ताई म्हणतात, "संगीत कला ही इतर कलांच्या मानाने शुद्ध कला मानली जाते. विश्वातील कोणत्याही गोष्टीचं संगीत प्रतिनिधित्व करीत नाही. संगीताची स्वतःची भाषा आहे आणि ही भाषा फक्त संगीताचा च अर्थ सांगते."


       शास्त्रीय संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन जर आपण केवळ मनोरंजन हा न ठेवता "आरोग्य" , "संगीत उपचार" आणि "आनंद घेणे" हा ठेवला तर काळाच्या कोणत्याही कसोटीवर आपले संगीत हे उतरू शकते असे मला वाटते.

आपले संगीत हे संपूर्ण मानवी जीवन आरोग्यदायी, आनंदी, समाधानी बनवण्यासाठीच निर्माण झाले आहे असे मला वाटते.


       मी डॉ प्रभाताईंना अशी विनंती करीन की त्यांनी अशा प्रकारचे सुंदर आणि विचार प्रवर्तक लेख लिहीत राहावे म्हणजे आमच्याही सांगीतिक विचारांना चालना मिळेल आणि खत पाणी मिळेल.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top