फिल्मी गाणी आणि संगीतोपाचार
म्युझिक थेरपी या विषयांतर्गत रागदारी संगीतात वेगवेगळे राग असतात, त्याचे वादी संवादी असतात आणि हे वादी संवादी सात ऊर्जा चक्रांशी co-relate केलेले असतात.
त्याप्रमाणे हिंदी आणि मराठी सिने संगीत आणि भावगीतात असा काही दुवा मिळतो का हे शोधण्याचा मी प्रयत्न केला. त्यासाठी मी हिंदी चित्रपटातील 24 गाणी घेतली. ही सर्व गाणी भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेली आहेत. त्यांचा स्वर्गीय आवाज हे एक म्युझिक थेरपी मधील एक महत्त्वाचे औषध ठरू शकते. परंतु एक लताबाईंच्या स्वर्गीय आवाज सोडला तर त्या गाण्यांच्या सुरावटित आणखी काही मिळते का हे पाहण्यासाठी मी 24 गाणी निवडली ती खालील प्रमाणे.
१) लग जा गले : पहाडी
२) ये दिल तुम बिन : पहाडी
३) तुम्ही मेरी मंदिर तुम्ही मेरी पूजा : आसावरी
४) तेरा मेरा प्यार अमर : आसावरी
५) मौसम है आशिकाना : यमन
६) आपकी नजरोने समझा : आसावरी
७) तन डोले मेरा मन डोले : पिलू
८) मिलती है जिंदगी में : काफी आणि मधुवंती
९)मुझे तेरी मोहब्बत का सहारा मिल गया होता : भैरवी
१०) एक प्यार का नगमा है : बिलावल
११) अगर तुम ना होते :
१२) ओ बसंती पवन पागल : किरवाणी
१३) जिंदगी प्यार का गीत है :
१४) बहारो मेरा जीवन सवारो : पहाडी
१५) मेरे हमसफर : चारूकेशी
१६) नाम गुम जायेगा : खमाज
१७) जो हमने दास्ता अपनी सुनाई : चारुकेशी
१८) छोड दे सारी दुनिया किसी के लिये : चारुकेशी
१९) सत्यम शिवम सुंदरम : आसावरी
२०) एक राधा एक मीरा : आसावरी
२१) रैना बीत जाये : तोडी आणि खमाज
२२)तेरा मेरा प्यार अमर : आसावरी
२३) रहे ना रहे हम : खमाज
२४) सुनो सजना पपीहेने : केदार
मी शास्त्रीय संगीताचा अभ्यासक असल्यामुळे या गाण्यांमध्ये कुठले राग लपले आहे हे शोधण्याचा मी प्रयत्न केला. त्यामध्ये मला दरबारी ,चारुकेशी ,किरवाणी,बसंत मुखारी, पहाडी, भैरवी, खमाजी तोडी, आसावरी, यमन ,केदार, बिलावल, काफी आणि मधुवंती हे राग, म्हणजेच या रागांचे स्वर आणि स्वरसमूह सापडले. कुठलाही राग गाताना त्यातील वादी संवादीवर ठेहेराव आवश्यक असतो. म्हणजे ते वादी संवादी म्युझिक थेरपीच्या दृष्टीने सात चक्रांपैकी एका विशिष्ट चक्राशी जोडले जातात आणि नंतर स्वराभिसरणानी त्या विशिष्ट चक्रावरती चांगला परिणाम होऊन तिथे ऊर्जा भरली जाते.
परंतु फिल्मी संगीतात, भावगीतात ही संकल्पना नसल्यामुळे ती गाणी कुठल्या चक्राशी रिलेट होतात हे शोधणे अत्यंत महत्त्वाचे ठरतं.
परंतु प्रत्येक रागामध्ये काही विशिष्ट स्वरसमूह अनेक गाण्यांमध्ये मला लपलेले आढळले आणि ते स्वर समूह लताबाईंनी इतक्या परिणामकार रितीने गायलेले आहेत की त्या स्वयंसमूहांचा परिणाम विशिष्ट चक्रांवर होऊ शकतो असं मला तीव्रतेने वाटलं. गाण्यातले भाव व्यक्त करण्याचे सामर्थ्य, त्यांचा स्वर्गीय आवाज,त्यातून निर्माण होणारे स्वरब्रह्म, शिवाय आवाजातील सूक्ष्म ऊर्जा भरण्याची एक हातोटी हे सगळे गुण मला त्यांच्या गायनात जाणवले. शिवाय त्यांच्या गायनातील मिंड, खटका, कंपन, स्पर्श स्वर, कण स्वर इत्यादी अलंकार त्यांच्या गळ्यातून अत्यंत सहजपणे निघतात आणि ऐकणाऱ्याच्या हृदयाला स्पर्श करून जातात. असाच स्वर आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांनाही लाभला आहे. गायकांमध्ये मोहम्मद रफीजी, किशोरकुमार, मन्ना डे, महेंद्र कपूर, मुकेशजी यांचीही गाणी आज अजरामर आहेत. यात जशी गायकांची कमाल आहे तशी संगीतकारांची सुद्धा कमाल आहे.
शंकर जयकिशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, नौशाद, सी.रामचंद्र, वसंत देसाई, सचिन देव बर्मन, राहुलदेव बर्मन, जयदेव, हेमंतकुमार, मदन मोहन अशा आणि अजून कित्येक संगीतकारांनी जीव ओतून दिलेले संगीत आजही सामान्य जनांना आनंद देत आहे. देत राहील.
शब्द आणि भाव यांच्या तरल वाटेवरून अलगद पुढे घेऊन जाणारे स्वरांचे समूह एका वेगळ्याच सांगीतिक अवकाशात घेऊन जातात आणि मनातील सूक्ष्म भाव साकारत साकारत करतात एक मौल्यवान कलाकृतीची निर्मिती आणि देतात तो फक्त आनंद आणि कल्पनातीत सुख.
मला असं वाटलं की प्रत्येक सिद्ध रागामध्ये असे विशिष्ट स्वर समूह असतात की ज्यामुळे विशिष्ट चक्रांची ऊर्जा पुन्हा त्यात भरली जाते किंवा आपली पिचुटरी आणि पीनियल ग्रंथी ही उद्दीपित होऊन त्यातून वेगवेगळे स्त्राव म्हणजेच हार्मोन्स(endorphins, dopamine, serotonin,oxytocin) स्त्रवून त्यातून आपल्या मनाला एक वेगळा असा आनंद मिळत राहतो आणि आपले मन आणि शरीर हे दुरुस्त होत जाते.
ते स्वरसमुह कोणते असावे ?
"सा ध", "सा प", "सा म" ही सर्व कॉमन स्वरजोडपी आहेत.
पहाडी : प नी(कोमल) ध प ग रे सा.
ग प प ध म, प ग ग गरेसारे म म प
आसावरी थाट: सा रे रे ग(को.), सारेरे सा नी(को), ध(को) नी(को) सा सा
वसंत मूखारी(भैरव आणि भैरवी चे मिश्रण): ध(को) प ध(को) ध(को) प म गम प प, मप ध(को) प म, सारेसा, म प सा नी(को).
चारुकेशी : प ध(को) नी(को) ध(को) म ग रे, ग म ग रे सा नी(को) ध(को)
या स्वरसमुहांचे साम्य कदाचित शास्त्रीय संगीतातील रागांगाशी असावे असे मला वाटते.
परंतु या पूर्ण विषयात संशोधन व्हावे आणि या फिल्मी गाण्यांचा संगीतोपाचारांशी कसा संबंध येतो हे सिद्ध व्हावे असे मला वाटते.
यामागील वैज्ञानिक कारणांचा संशोधकांनी शोध/वेध घ्यावा असे मला वाटते.