गुरु बदलणे योग्य कि अयोग्य
आपल्या गायन, वादन आणि नृत्य या क्षेत्रामध्ये श्रद्धेची मजबुती ही फार महत्वाची असते. ज्याची गुरुवर अटळ श्रद्धा असते तो पुढे संगीतात चांगली प्रगती करू शकतो. परंतु श्रद्धा डळमळीत झाली की ज्ञान होण्याचे प्रमाण कमी कमी होत जाते. गुरुवरची निष्ठा ही फार महत्त्वाची असते. मी आज जवळ जवळ चाळीस वर्ष या क्षेत्रात आहे. बरेच विद्यार्थी सात सात आठ वर्ष शिकून, चांगली प्रगती होत असताना देखील,अचानक काहीही न सांगता दुसरीकडे शिकायला जातात. हा माझा अनुभव. मला वाटते त्यांची श्रद्धा डळमळीत होत असावी.
मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यांनी दुसरीकडे शिकायला जाण्याच्या आधी आपल्या गुरूकडून आपल्याला काय मिळत नाही याचा विचार करायला हवा. गुरूशी मनमोकळेपणाने बोलले पाहिजे आणि चर्चा केली पाहिजे. तुम्ही मला आणखी ज्ञान, आणखी किती दिवस देऊ शकता हे गुरूला स्पष्टपणे विचारल पाहिजे. गुरुकडे आपल्या भावना जरूर स्पष्ट कराव्यात.
आता एका गुरूला सोडून दुसरीकडे जाण्याची कारण बघा कशी असतात.
पहिलं कारण : माझी मैत्रीण मला म्हणाली की ती शिकते ते गुरु जास्त चांगले म्हणून तू त्यांच्याकडेच शिकायला ये.
दुसरं कारण : तुझे गुरु पुरुष आणि तू बाई आहेस तर तुला बाईच चांगलं शिकवतील म्हणून तू दुसऱ्या एखाद्या गायिकेला गुरू कर.
तर काही विद्यार्थी काहीही कारण नसताना उगाचच दुसरीकडे शिकायला जातात.
(ads1)
काही विद्यार्थी सांगतात की अमुक गवयाचं गाणं मला भयंकर आवडलं म्हणून मी त्यांच्याकडे शिकायला गेलो.
या सगळ्यामध्ये विद्यार्थ्याचा स्वतःशी संवाद होत नाही.
त्याने स्वतःला विचारावे.
१) माझे आत्ताचे गुरू खरच मला नीट शिकवीत नाहीत का ?
२) त्यांच्याकडे पुरेसे ज्ञान आहे ना ?
३) त्यांचे शिकविण्यात कमी लक्ष आहे का ?
४) शिकविण्याऐवजी ते इतर विषयांवर जास्त बोलतात का ?
५) माझे गुरू कोपिष्ट, छांदिष्ट, आहेत काय ?
या सर्व गोष्टींवर साधक बाधक विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे. मनाला वाटते म्हणून लहरीपणाने गुरू बदलू नये. कारण गुरूच्या भावना विद्यार्थ्यात गुंतलेल्या असतात याचे भान ठेवावे.
स्वतः बरोबरचा संवाद संपू देता कामा नये. आपण दुसऱ्या लोकांचे ऐकून आपली श्रद्धा डळमळीत करून घेऊ नये.
पहिला गुरु सोडताना आपण आपल्या पहिल्या गुरुलाच विचारायला पाहिजे की मी आता कोणाकडे शिक्षण घेऊ ? काय शिकू ? गुरू म्हणाले इकडेतिकडे जाऊ नकोस तर त्यांचे ऐकून त्याच ठिकाणी आपल्याला शिकलं पाहिजे. आपलं वाचन भरपूर असले पाहिजे. आपलं ऐकण सुद्धा भरपूर पाहिजे असलं पाहिजे. गुरू केव्हा बदलावा हे पहिला गुरूच आपल्याला सांगू शकतो हे ध्यानात ठेवावे. म्हणून पहिला गुरू करताना काळजीपूर्वक करावा. धरसोड उपयोगाची नाही. कपडे बदलतो तसा गुरू बदलू नये.