संगीताच्या विद्यार्थ्यांसाठी ११ यशसुत्रे
आज भारतीय शास्त्रीय संगीत लाखो काही विद्यार्थी शिकणारे आहेत. परीक्षांसाठी शिकतात तर काही आवड म्हणून शिकतात ; परंतु शिकणाऱ्यांची संख्या सध्या नक्कीच वाढलेली दिसते. या विद्यार्थ्यांनी खालील मुद्दे विचारात घ्यावेत.
१. सुरुवातीला काय शिकायचे हे समजावून घ्या. हे वाचनातून, प्रत्यक्ष गायन, वादन ऐकून, जाणकारांबरोबर चर्चा करून समजू शकते.
२. आपला संगीत शिकण्यामागचा हेतू काय ? हे स्वत : लाच विचारा. या विषयात किती खोलवर जायचे हे ठरवा. या विषयातही करिअर होऊ शकते, हे लक्षात ठेवा.
३. योग्य गुरु शोधा. संगीत ही गुरुमुखी विद्या आहे. केवळ घराच्या जवळ विद्यालय आहे, फी कमी आहे, तिथे टी.व्ही.वर पाठवतात म्हणून शिकायला जाऊ नका. गुरु हा विद्याव्यासंगी, नम्र, मितभाषी, साधी राहणी, प्रसन्न व्यक्तिमत्त्व असावे.
४. गुरुला सतत पण योग्य प्रश्न, योग्य वेळी विचारा गुरुने विद्यार्थ्यांचे शंकानिरसन केलेच पाहिजे. संवादातूनच ज्ञान प्रकट होते. गुरु शिष्य मनाने जवळ येणे गरजेचे आहे.
५. बारा स्वरांच्या जागा डोक्यात कळणे व गळ्यातून निघणे, यास वेळ लागतो. घाई करू नका. या सर्व जागा केवळ तंबोऱ्यावर ( तंबोऱ्याच्या स्वराचा आधार घेऊन ) गायल्याने कळू शकतात. २-३ महिने हार्मोनियमच्या आधाराने स्वर समजावून घ्यावेत. नंतर केवळ 'आधारस्वर सा' घेऊन गळ्यातून इतर स्वर गाण्याचा प्रयत्न करावा.
६. निदान सुरुवातीला तरी शुद्ध स्वर अलंकारांचा सराव करावा. हे अलंकार म्हणजे सात शुद्ध स्वरांच्या लॉजिकल रचना असतात. हे अलंकार कसे तयार करायचे, हे जाणून घेऊन स्वतः ५० अलंकारांची रचना करा व ते गाऊन पाहा. नंतर संपूर्ण जातीच्या रागांमध्ये हे अलंकार थोडेफार बदल करून गावे. उदा. काफी, यमन, पुरिया धनाश्री, भैरव, भैरवी, किरवाणी, तोडी वगैरे. हे अलंकार विलंबित , मध्य व द्रुत लयीत गावेत. शक्यतो वहीत, पुस्तकात पाहून गाऊ नये.
७. भारतीय रागदारी संगीत हे पाठांतर नव्हे, लिहिलेले ताना आलाप गाणे नव्हे. आलाप, ताना तत्काळ रचून तालबद्ध गाता येणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी रागज्ञान असणे महत्त्वाचे ठरते. रागाचे चलन माहीत करून घ्यावे. प्रमुख स्वर रागवांचक स्वरसमूह, रागसमय, स्वरउच्चारण हे माहीत झाले की राग गायल्यावर अपेक्षित सांगीतिक वातावरण जाणवते.
८. एका रागात वेगवेगळ्या भावना असलेल्या व वेगवेगळ्या ताल बंदिशी ( चीजा ) शिकणे गरजेचे आहे त्यामुळे रागाची व्यापकता, भव्यता व प्रगल्भता कळते. बंदिशीच्या माध्यमातून निर्गुण रागतत्व सगुणरूप धारण करते. राग प्रवाही बनतो. बंदिशीतील शब्दांमुळे मानवी जाणिवा जिवंत करतो.
९ . रागगायनात आलाप, बोल व तान यांचा अंतर्भाव करावा. आलापातून राग स्पष्ट होतो, तर बोलातून भावदर्शन व तानेतून चमत्कृतीचे सादरीकरण होते. रागस्वभाव, बंदिश, आलाप, बोल व तान यांचा ताळमेळ साधला गेला तरच गाणे श्रवणीय होते.
१०. नियमित रियाज होणे फार महत्त्वाचे आहे. मनन, चिंतन, श्रवण, विश्लेषण, प्रत्यक्ष गायन या सर्व गोष्टी रियाजात येतात.
११. चांगली तयारी झाल्याशिवाय परीक्षेस बसू नये. परीक्षेत नापास झाल्यास निराश होऊ नये व उत्तम पास झाल्यास हुरळून जाऊ नये. एवढे मुद्दे लक्षात ठेवून अभ्यास केला तर तो नक्कीच अपेक्षित यश मिळवू शकेल.
संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए नीचे दिए गए सोशल मीडिया बटन पर क्लिक करके अभी जॉईन कीजिए।
संगीत की हर परीक्षा में आनेवाले महत्वपूर्ण विषयोंका विस्तृत विवेचन