आपटा (Bahunia racemosa) या फॅबेसी कुटुंबवर्गातील झाडाचे पौराणिक आणि औषधी महत्व आहे. विजयादशमीच्या दिवशी सोने म्हणून जी वृक्षाची पाने दिली जात ती आपट्याच्या याच प्रजातीची आहेत. या बहुनिया जिनस मध्ये बऱ्याच विविध स्पेसिज आढळतात. त्यातील ही रेशिमोजा ही एक महत्वाची स्पेशिज आहे. भारतात आणि श्रीलंकेत या वृक्षांची संख्या काही दशकांपूर्वी बरीच होती. पण जंगलतोडीच्या भस्मासुराने त्यातील बरीच गिळून टाकली आहेत. त्यांचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता आहे. संस्कृतमध्ये याला अश्मंतक म्हणजे खडकनाशक किंवा दगडनाशक असे म्हणतात. ह्याची मूळे जमिनीत पाण्याच्या शोधार्थ खोलवर पसरतात, मार्गात असलेले खडक फोडण्याची यांची क्षमता असते. खडकाळ जागी वनीकरण करण्यासाठी या झाडाचा चांगला उपयोग होतो. कमी पावसाच्या प्रदेशात खडकाळ माळरानावर याची लागवड करावी. आयुर्वेदात या वनस्पतीचा औषधी उपयोग म्हणजे मुतखडा जिरविण्यासाठी सुचविला आहे. पित्त आणि कफ नाशक असेही त्याचे उपयोग आहेत. बहुनिया प्रजातीच्या काही झाडांची दुहेरी पाने बरीच मोठी असतात. त्यांचा वापर गुजरातमध्ये विडी वळण्यासाठी केला जातो. याला कठमुली, झिंजेरी आणि सोना असेही म्हणतात. कांचन वृक्ष याचाच भाऊबंद आहे. त्याचे नाव आहे Bahunia verigata.
अश्मनंतकः कषायस्तु हिमः पित्तकफापहः।
मधुरः शीतसंग्राही दाहतृष्णाप्रमेहजित् ।।
अश्मंतक महावृक्ष महादोष निवारण
इष्टानाम दर्शनं देही कुरु शत्रुविनाशनं॥
या श्लोकात म्हंटल्याप्रमाणे हा वृक्ष दोष निवारकतेचे प्रतीक मानला गेला आहे. त्यामुळे विजयादशमीला इष्ट मित्रांना त्यांचे दोष, त्रास दूर व्हावेत म्हणून त्याची पाने प्रतिकात्मक म्हणून दिली जातात. शत्रूप्रवृत्तीचा नाश देखील यात अपेक्षित आहे. शततारका आणि कुंभ राशीसाठी हा आराध्यवृक्ष म्हणून सुचविलेला आहे.
आपट्याची झाडे सरळसोट कधी वाढत नाही. वेडेवाकडे, पोक आल्यासारखे वाढणे हा त्याचा गुणधर्म आहे. पाने जुळी असून गर्द हिरवी असतात. फांद्या भरपूर असतात. शेंगा चपट्या आणि दंडगोल आकाराच्या असतात. या वृक्षाची फुले पांढरी व लहान असतात. कांचन वृक्षाची फुले तुलनेने मोठी व लाल रंगाची असतात. पाने , शेंगा आणि बिया यांचे बरेच औषधी उपयोग आयुर्वेदात सांगितले आहेत. जुन्या काळात तोटयाच्या बंदुका वापरत, त्यासाठी लागणाऱ्या वाती या झाडाच्या आंतरसालीपासुन तयार होत असत .
एकूणच पर्यावरणाच्या दृष्टीने हा अतिशय उपयुक्त आणि महत्वपूर्ण वृक्ष आहे. ह्याचे संस्कृतीमूल्य देखील तेव्हढेच महत्वाचे आहे. त्यामुळे आज विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने न खुडता, आपण प्रत्येकाने एक आपट्याच्या वृक्ष रोपण करू यात, म्हणजे पुढच्या पिढ्यांना सोने लुटता येईल.