संगीतातील शिष्य
संगीत ही सादरीकरणाची कला आहे. यातून स्वतःला व ऐकणाऱ्याला मनशांती देता आली पाहिजे.ही कला थेट मनाशी निगडित आहे. म्हणून पहिल्याप्रथम "मी समाजाचे काही देणे लागतो", ही शिष्याची मनोभूमिका असणे गरजेचे आहे. आपण पुढे चांगले गाऊ लागलो की भरपूर बिदागी घेऊ व खूप प्रसिद्ध होऊ अशी लोभी भूमिका नसावी. आपले आयुष्य देण्यासाठी नसून घेण्यासाठी आहे असे लोभी विचार नसावेत. असे विचार असेल तरच संगीत शिक्षणास आरंभ करावा.
संगीतात योग्य गुरू मिळणे हे देखील भाग्यात असावे लागते. गुरू शिष्य यांचे मनोमिलन व्हावे लागते. शिष्याने गुरू शोधण्यासाठी विषयाचा प्राथमिक अभ्यास करणे(वाचन,श्रवण) महत्वाचे असते. आपल्याला नक्की काय शिकायचे ह्याची थोडीफार कल्पना शिष्याला असणे जरुरीचे असते. गुरू आणि शिक्षक यात फरक असतो. थोड्याशा ज्ञानावर केवळ वेळ जावा व थोडाफार आर्थिक लाभ व्हावा या हेतूने बरीच मंडळी संगीत विद्यालये काढतात.तिथे गेल्यास शिष्याला विशेष ज्ञान होत नाही.त्याने तशी अपेक्षाही करू नये. "गुरू असे ज्ञानाचा पुरा,त्याच्या साम्यासी नसे दुसरा" असे म्हटलेच आहे. म्हणून शिष्याला गुरुची परीक्षा करता येणे महत्वाचे असते. त्यासाठी माहितगार लोकांचा सल्ला, स्वतःचे प्राथमिक ज्ञान उपयोगी पडते. घरापासून जवळ आहे म्हणून तो गुरू करू नये. जो गुरू मितभाषी,शांत,ज्ञानी, सतत ज्ञान घेणारा व कुणाला किती,कसे व कुठल्या माध्यमातून ज्ञान द्यावे हे जाणणारा असतो ,तो गुरू निवडावा. हे सर्व गुरूचे गुण शिष्याला थोड्याशा सहवासाने कळून येतात. सहवासातून गुरुची परीक्षा होते.
असे गुरू मिळाले की शिष्याने अतिशय श्रद्धेने त्यांचे ऐकले पाहिजे. ते सांगतात तसा रोजच्या रोज रियाझ केला पाहिजे. लोक काय म्हणतात, त्याकडे कानाडोळा करून गुरूंच्या आज्ञेत रहायला हवे. शिष्याने स्वतःची प्रगती स्वतः न मोजता ते काम गुरूंकडे सोपवायला हवे.
मुख्य म्हणजे आपल्या डोक्यात जे जे लहान सहान प्रश्न येतील ते गुरूंना विचारले पाहिजेत. संवादातूनच ज्ञान प्रकटते. अर्जुनाने कृष्णाला प्रश्न विचारले म्हणून कृष्ण महात्म्याने गीतेचे तत्वज्ञान सांगितले.
संवादातून शिष्याप्रमाणे गुरूचे ज्ञानही वाढते. शिष्याला गुरुची भीती वाटता कामा नये. शिष्याचा गुरूवर पूर्ण विश्वास असायला हवा. गुरुविषयी कोणी निंदास्पद बोलले किंवा गुरुची उणीदुणी काढली तर शिष्याने त्यावर विश्वास ठेवता कामा नये. गुरूच्या बाबतीत कुठलीही कूशंका शिष्याच्या मनात येता कामा नये.
शिष्याने वाचन,श्रवण,मनन आणि चिंतन करणे गरजेचे आहे. सुरुवातीला रियाझ गुरूच्या समोर करणे हितकारक असते. नाहीतर चुकीचा रियाझ शिष्याला दोन पावले मागेच आणतो.
शिष्याने गुरूच्या परवानगीशिवाय दुसरीकडे संगीत शिकण्यास जाऊ नये. गुरुकडील देण्यासारखे ज्ञान संपले की ते आपोआपच शिष्याला दुसरा गुरू सुचवतात.
शिष्याने सलगपणे निदान १२ ते १४ वर्षे संगीत शिकणे जरुरीचे आहे. त्याला बैठकीत बसल्यावर एक राग, मनाने, निदान अर्धा ते पाऊण तास, योग्य रीतीने गाता यायला हवा. गायनातील बंदिश, आलाप,बोलालाप,तान,बोलताना,लयकारी ही अंगे समर्थपणे दाखविता यायला हवीत.
हे जर जमले तर तो आपल्या गुरूंचे नाव सार्थ करू शकतो.
✍️किरण फाटक
अपने संगीतप्रेमी दोस्तों में हमारे लेख अवश्य शेअर करें । संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए हमारा फेसबुक पेज Sangeet-Jagat को लाइक कीजिए और हमसे व्हाट्स ऐप पे जुड़े रहने के लिए यहाँ क्लिक करे।