लोणचे बनवित/खात आहात? मग हे वाचाच..!
सध्या कच्च्या गावरान कैरीचे लोणचे बनविण्याचा मोसम सुरू आहे. अशी कैरी बाराही महिने उपलब्ध होत नाही, म्हणून ती टिकवून ठेवण्याची पद्धत म्हणून लोणचं घातलं जातं. हा त्यामागचा खरा उद्देश. विविध मसाले आणि मीठाच्या संपर्कात कैरीच्या फोडी बहुधा टिकून राहतात. कालांतराने त्यात मुरल्याने चवीत काही बदल होतात. पण तेही सहसा हवेहवेसे वाटणारे असतात. लोणचे खाल्याने तोंडाला चव येते. पचन प्रक्रिया सुरळीत सुरु राहते.
वर्षाऋतू म्हटलं की अम्ल विपाकी जल, जलाची दुषित अवस्था, पालेभाज्यांची सुद्धा तशीच काहीशी अवस्था, नविन धान्ये इत्यादींना तोंड देता देता दमट ओलसर वातावरण, चिकचिक हेही सहन करावे लागते. आणि या सर्वाचा परिणाम म्हणून शरीरात होणारे अग्निमांद्य!
वर्षाऋतूत निसर्गत: होणारा वातप्रकोप आणि अग्निमांद्य या दोन प्रमुख समस्या स्वास्थ्य बिघडवू शकतात. अशा वेळी लोणचे उचित मात्रेत सेवन करणे अत्यंत हिताचे. लोणच्यात काळी मिरी, लवंग, धणे, मेथीदाणा, मोहरीडाळ, दालचिनी, हळद, चटणी (लाल तिखट), सुंठ, बडिशेप, हिंग आणि वेलदोडे अशा मसाल्यांचा वापर होतो.
हे मसाले मंद होत चाललेल्या भुकेला आणखी कमी होण्यापासून रोखतात. उलटपक्षी पचन वेग वाढवून अनुकूल स्थिती निर्माण करतात. थोडक्यात अनेक आजारांचे मूळ असलेल्या अग्निमांद्यास यामुळे अटकाव होतो.
लोणच्यात सहसा तीळ तेल किंवा मोहरीचे तेल वापरले जाते. पण आपल्याकडे मोहरी तेलाचा फारसा प्रघात नाही. आणि तीळ तेल लोणच्याला "अधिक गरम पडेल" असे बनविते. म्हणून शुद्ध शेंगदाणा तेल श्रेयस्कर. मीठ सैंधव घातले तर उत्तमच. सैंधव मीठ आरोग्यासाठी लाभकारकच. मीठ आणि तेलाचे प्रमाण उचित असेल तरच लोणचे टिकाऊ बनते असा अनुभव आहे.
कैरी दळदार अर्थात जास्त गर असलेली आणि शक्यतो गावरान, मोठ्या जून झाडावरची असावी. कैरी आणल्यावर किमान ४/५ तास स्वच्छ पाण्यात भिजत पडू द्यावी. म्हणजे चिकाचे अंश आणि अन्य धूलिकण आदी दोष दूर होतात. महत्वाचे म्हणजे कैरीत स्वभावत: असलेली उष्णता मर्यादित होते.
तिची पिकण्याकडे असलेली प्रवृत्ती नियंत्रित होते. अशी कैरी पाण्यातून काढून स्वच्छ वस्त्राने कोरडी करून हवेशीर ठेवावी. पाण्याचा थोडाही अंश राहिल्यास लोणच्यात fungus ऊर्फ बूरा लागतो, हे सर्वांना माहीत असेलच. स्वच्छ, कोरड्या कैरीच्या सारख्या मध्यम आकाराच्या फोडी कराव्यात. त्यांनाही थोडा वेळ हवेत मोकळे ठेवून नंतर आधीच बनवून ठेवलेल्या आणि थंड झालेल्या खारात मिसळावे.
आरोग्याचे उचित लाभ व्हावे, असे वाटत असेल तर ही सर्व प्रक्रिया "घरगुती" असली पाहिजे. तयार लोणची मसाले, बाजारातून स्वच्छता इत्यादीचा विचार न करता आयत्या कापून आणलेल्या कैऱ्या वापरून जमणार नाही. तयार झालेले लोणचे चिनी किंवा साध्या मातीच्या बरणीत भरले जाते.
लोणचे भरण्यापूर्वी त्या बरणीस आतून निखाऱ्यावर थोडा हिंग मोहरी टाकून येणारी धुरी देतात. त्यामुळे आतून ते पात्र कोरडे, शुद्ध आणि निर्जंतुक होते. लोणचे थंड होऊन भरल्यावर त्याच्या तोंडावर स्वच्छ वस्त्र बांधावे, जेणेकरून बरणीत मोकळ्या जागेत थोडी हवा खेळती राहील. अधूनमधून हे वस्त्र बदलत असावे आणि लोणचे सुरुवातीला काही दिवस तरी स्वच्छतेची खबरदारी घेऊन नियमित चाळत असावे.
लोणचे योग्य मात्रेत सेवन केल्याने वर्षाऋतूत होणारे संभाव्य अग्निमांद्य रोखले तर जातेच त्याशिवाय वातप्रकोपाला सुद्धा नियंत्रणात ठेवता येते. तेल, सैंधव आणि उष्ण गुणधर्माचे घटक यासाठी मदत करतात. लोणच्यामुळे कफ क्षीण व्हायला मदत मिळते. कोलेस्टेरॉल आणि अन्य प्रकारची चरबी कमी करण्याची युक्ति लोणचे "औषधासारखे" खाल्ल्यास साध्य होऊ शकते.
माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा...!
✔️ *Disclaimer* : सदर माहिती केवळ जनहितार्थ प्रसारित करण्यात येत आहे. माहितीच्या सत्यतेची पडताळणी कृपया वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवर करावी.
अपने संगीतप्रेमी दोस्तों में हमारे लेख अवश्य शेअर करें । संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए हमारा फेसबुक पेज Sangeet-Jagat को लाइक कीजिए और हमसे व्हाट्स ऐप पे जुड़े रहने के लिए यहाँ क्लिक करे।