संगीत का शिकावे ?
संगीत शिकण्यामागे तीन हेतू असू शकतात. एक आपला आत्मिक अथवा अध्यात्मिक विकास, दुसरा पैसा व प्रसिद्धी मिळविणे आणि तिसरा मार्ग म्हणजे शिक्षकी पेशा.हे तीन मार्ग अगदी वेगळे आणि वेगवेगळ्या दिशांना जाणारे आहेत. एक मार्ग निवडला की दुसऱ्या मार्गावर शक्यतोवर जाऊ नये.
आत्मिक विकास म्हणजे काय हे समजावून घेऊ. आपल्या प्रत्येकात(प्रत्येक माणसात) स्वभावदोष असतात. काम,क्रोध,मद,मत्सर,लोभ व दंभ(अहंकार). संगीत शिकल्यामुळे व संगीताची आराधना,उपासना केल्यामुळे यातील एक एक दोष गळून पडतो. मन शांत होते. भावनांचे कल्लोळ नाहीसे होतात. हे जग नश्वर आहे हे सत्य जाणवते. राग गायल्याने क्रोध(राग) येणे खूप कमी होते. लोभ व मोह अंतरात निर्माण होणे कमी कमी होत जाते. यामुळे आपोआप अहंभाव कमी होतो व संगीत साधक एक वेगळीच अद्भुत अनुभूती घेतो. परंतु हे सगळे कधी साधते ? तो जेव्हा स्वतःचे,स्वतःसाठी गायन करतो. जे त्याला आवडते तेच तो गातो.लोकांना त्याचे गायन अथवा कलाविष्कार आवडेलच असे नाही. आणि हा साधक लोकांना काय आवडेल याचा विचारही करीत नाही. "स्वांत सुखाय" असे तो आयुष्यभर गात रहातो.
दुसरा मार्ग पैसा व प्रसिद्धीचा. यात संगीत साधक लोकांना काय आवडेल याचा जास्त विचार करतो. स्वतःला काय आवडते ते तो फार कमी प्रमाणात गातो. अर्थात त्यामुळे त्याची आंतरिक घुसमट होते. पण लोकांसाठी गायचे असल्याने तो ती सहन करतो. कारण लोकांना आवडणारे गायले तरच पैसा व प्रसिद्धी मिळणार असते. यात त्याच्या कलेचा दर्जा किंचित घसरतो. कारण त्याला स्वतःला काय आवडते ते त्याला आयुष्यात फार कमी वेळा गाता येते. यात त्याचे आत्मिक समाधान हरवते.
म्हणून संगीत कशासाठी शिकायचे हे प्रत्येक विद्यार्थ्याने मनाशी पक्के करणे महत्वाचे आहे. दोन्ही गोष्टींचा लाभ मिळणार नाही हे मात्र पुरते ध्यानात ठेवले पाहिजे. जो मार्ग निवडला त्या मार्गावर चालत चालत आपले ध्येय गाठणे हे फार जरुरीचे आहे. प्रत्येक मार्गावरील फायदे तोटे स्वीकारले पाहिजेत. एकदा एक मार्ग निवडला की पूर्ण तयारीनिशी ,कोणतीही तक्रार न करता ध्येयपूर्तीच्या दिशेने दमदारपणे वाटचाल केली पाहिजे.
तिसरा मार्ग म्हणजे संगीताचा प्रसार व प्रचार करण्यासाठी कटिबद्ध होणे. यात प्रामाणिकपणा,विषयाचे सखोल ज्ञान,ज्ञान देण्याचे कौशल्य,ज्ञान देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, व संयम या गुणांची नितांत आवश्यकता असते. विद्यार्थी घडविणे ही फार मोठी कला आहे. हे कोणालाही जमण्यासारखे काम नाही. शिक्षक ही जन्माला यावा लागतो. याला मराठीत हाडाचा शिक्षक असे म्हणतात. शिक्षक तानसेन आणि कानसेन या दोन प्रकारच्या शिष्यांना तयार करतो.संगीतसाठी कान तयार करणे व संगीतासाठी गळा तयार करणे हे काम शिक्षकच करू शकतो.
तेव्हा संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानी शिकण्यापूर्वी आपला संगीत शिकण्यामागचा हेतू मनात स्पष्ट करून घ्यावा. यासाठी आपल्या गुरूजनांबरोबर ,पालकांबरोबर चर्चा करावी. स्वतः आत्मचिंतन करावे आणि मगच संगीत शिक्षणाचा श्रीगणेशा करावा.
अपने संगीतप्रेमी दोस्तों में हमारे लेख अवश्य शेअर करें । संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए हमारा फेसबुक पेज Sangeet-Jagat को लाइक कीजिए और हमसे व्हाट्स ऐप पे जुड़े रहने के लिए यहाँ क्लिक करे।