कुठे, किती आणि केव्हा गावे ?
गायन,वादन आणि नृत्य ह्या सादरीकरणाच्या कला आहेत. बरेच विद्यार्थी जेव्हा शिकायला येतात तेव्हा सांगतात ,"सर, आम्हाला कुठे चार लोकात गायचे आहे. आम्हाला कुठे मैफिली करायच्या आहेत". तेव्हा त्यांचे हे अज्ञान मूलक बोलणे ऐकून खूप आश्चर्य वाटे व खेदही होई. ते पुढे म्हणत, "आम्ही आमच्या आनंदासाठी शिकणार आहोत". तेव्हा मी मनात म्हणत असे , "अहो, आनंद मिळण्यासाठी दीर्घकालिन तपश्चर्या करावी लागते. सर्वस्व पणाला लावावे लागते तेव्हा कुठे आनंदाची चाहूल लागते".
पण समजावून सांगणार कोण ? अज्ञानात आनंद असतो असे म्हणतात.
आपल्याला किती छान गाता येते हे आपण स्वतः ओळखले पाहिजे. आपण गाणे शिकतो आहे असे लोकांना कळले की ते लगेच आपल्याला कार्यक्रम करा असे सांगतात. "आमच्या घरी पूजा आहे. तेव्हा एक तासाभराचा भक्तीगीतांचा कार्यक्रम करा", असा आग्रह लोक नवशिक्या गाण्याच्या विद्यार्थ्याला करतात. तो ही हुरळून जातो. तोडक्या मोडक्या स्वर तालात तो कार्यक्रम सादर करतो. त्यावेळेस बरेच लोक आपापसात गप्पा मारीत असतात. काही लोक उगाचच गायकाचे कौतुक करतात. बोलावणाऱ्याचा उत्सव फुकटात साजरा होतो. "ठीक गायली गाणी,आम्हाला कुठे पट्टीचा गायक हवा होता.वेळ मारून नेली. झालं." असे बोलावता धनी उद्गार काढतो.
असे कार्यक्रम करावे का ? आपली १००% तयारी नसताना चार लोकात गावे का ? ह्याचा अंदाज गाणे शिकणाऱ्याला यायला हवा. लोकांच्या धूर्त आग्रहाला बळी पडू नये. हेच लोक नंतर निंदा करतात. म्हणतात, "ना सूर ना ताल,आणि हा असुर गायला तयार". आपल्या गुरूने परवानगी दिल्याशिवाय लोकांसमोर आपली कला पेश करू नये.
जिथे "धन", "यथोचित मान" आणि "श्रोतृगण" दिला जातो तिथेच गायनाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण स्वीकारावे. शिवाय जिथे पुरेसे श्रोते नसतात तेथे गायला अजिबात जाऊ नये.
बरीच भजनी मंडळे वेगवेगळ्या सार्वजनिक उत्सवात मोठमोठ्या स्टेज वर बसून अगदी रेटून कार्यक्रम करतात. पण ऐकायला एकही श्रोता नसतो. मंडपात चार पाच मुले खळत असतात. पण मानधन मिळण्यासाठी ते पूर्ण वेळ कार्यक्रम करतात. हे असे होऊ नये. हा कलेचा आणि कलाकाराचा अपमान आहे असे मला वाटते. श्रोतृगण जमविणे हे आयोजकांचे काम असते. ते काम जर जमत नसेल तर कार्यक्रम तरी कशासाठी ठेवावे ?
आता कुठे काय गावे याचाही विचार करावा. आपण कुठे गात आहोत ? तेथील श्रोत्यांची आवड काय आहे ? हे कार्यक्रमापूर्वी जाणून घेणे महत्वाचे आहे.
जर एखाद्या धार्मिक उत्सवात प्रार्थनास्थळी जर कार्यक्रम असेल तर शक्यतोवर त्या देवाची भक्तिगीते गावीत. तिथे शृंगार गीते टाळावीत. परंतु हा अलिखित नियम हल्ली पाळताना कोणी दिसत नाही.
सत्यनारायण पूजेच्या वेळी शृंगारिक चित्रपटगीते हल्ली सर्रास सादर केली जातात व त्या गीतांची मागणीही होते. तिथे लोक त्यावर वेडेवाकडे नाचतातही. हे मी स्वतः अनुभवले आहे. मी त्यावेळी कार्यक्रम थांबविला होता . हे थांबविणे केवळ कलाकाराच्या हातात असते. परंतु बक्कळ मानधनापुढे त्यांना नैतिक मूल्यांचे महत्व विशेष वाटत नसावे असे वाटते.
जर कार्यक्रम गणपतीच्या देवळात असला तर तिथे महादेवाची गाणी गाऊ नयेत. आणि कार्यक्रम विठ्ठलाच्या देवळात असला तर तिथे इतर देवांची गाणी शक्यतोवर गाऊ नयेत. कारण ऐकायला आलेले भक्त हे विठ्ठलाचे निस्सिम भक्त असतात. त्यांच्या मनात विठ्ठलाविषयी श्रद्धा व भक्ती असते. त्यांना विठ्ठलाची गाणी ऐकण्यात जास्त रस असतो. असे न झाल्यास रसभंग होण्याचा संभव असतो.
संयोजकांनी जितका वेळ दिलेला आहे तेवढा वेळच गावे. तेवढ्या वेळात आपले गायन बसविता येणे हे कौशल्याचे काम असते. ते जमायला हवे. तेव्हढ्या वेळात आपल्या गायनात रंग भरता आला पाहिजे. समोरच्या श्रोत्यांकडे लक्ष हवे. ते जर कंटाळलेले वाटले तर आपले गायन त्यांच्यावर न लादता ते आटोपते घेण्याची मानसिकता असणे जरुरीचे आहे.
ज्या लोकांना गायन आवडत नाही किंवा जे गायनाला नाके मुरडतात त्यांच्यासमोर कधीही गाऊ नये किंवा त्यांना गायनाचे महत्व सांगू नये. ते अस्थानी होईल.
अर्थात चांगला रसिक श्रोता कलाकाराला मिळणे हा मोठा योगायोग असतो.प्रत्येक कलाकाराचे श्रोते जन्माला आलेले असतात. पण ते कलाकाराला योग्य वेळी योग्य ठिकाणी भेटणे हा कलाकाराच्या जीवनातला एक दिव्य योग असतो. हा योग कलाकाराला यशाच्या आणि प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवतो. अन्यथा तो दुर्लक्षित रहातो.
म्हणून कलाकाराला कुठे,किती व कसे गायचे हे कळले पाहिजे. म्हणजे तो कलविश्र्वात यशस्वी होतो.
✍️किरण फाटक
अपने संगीतप्रेमी दोस्तों में हमारे लेख अवश्य शेअर करें । संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए हमारा फेसबुक पेज Sangeet-Jagat को लाइक कीजिए और हमसे व्हाट्स ऐप पे जुड़े रहने के लिए यहाँ क्लिक करे।
अगदी बरोबर आहे तुमंच ।। खूप छान माहिती दिली
ReplyDelete