रियाझ : विस्तृत माहिती

1

रियाझ,riyaz
 

रियाझ

भारतीय अभिजात संगीताची साधना करण्याची पद्धत म्हणजे रियाझ. रियाझ म्हणजे सराव. स्वर, ताल व लयीच्या सतत सहवासात असणे म्हणजे रियाझ. यात श्रवण,मनन,चिंतन(विचार), रटन, वाचन व प्रत्यक्ष गायन वादन येते. रियाजने कलाविष्कारात सहजता व उत्स्फूर्तता येते. रियाजामुळे स्वराच्या केंद्रबिंदुकडे पाहण्याची दृष्टी व काळाच्या गतिमानतेकडे पाहण्याची वृत्ती विकसित होते. निर्गुण,निराकार आणि अस्पर्श अशा प्रवाही सांगीतिक ऊर्जेला सगुणात परिवर्तन करण्याची किमया साधते. रियाजात मुख्यत्वेकरून स्वर,लय यावर प्रभुत्व मिळविण्याच्या पद्धतींचा अभ्यास करावा लागतो. काळाच्या गतीतील सौंदर्याचा स्वरांच्या चौकटीत राहून आस्वाद कसा घेता येईल व कसा देता येईल याचाही सूक्ष्म अभ्यास करावा लागतो. स्वरसंवाद,स्वरांचे दर्जे,स्वरांचे बहुरंगी व्यक्तिमत्व यांचा खोलवर जाऊन अंदाज घ्यावा लागतो. हे सगळे साध्य करण्यासाठी जे जे करावे लागते त्याला रियाझ म्हणतात. रियाझ हा व्यक्तिनुरुप वेगळा असतो.


जसे अध्यात्मात अधिकारी व्यक्ती शिष्याला विशिष्ठ मंत्राची दीक्षा देतात, त्याप्रमाणे संगीतात गुरू प्रत्येक शिष्याला रियाजाचा वेगळा कानमंत्र देतात. शिष्याचा आवाज,प्रकृती,स्वभाव,सच्चेपणा,आकलनशक्ती,आवडी निवडी वगैरे लक्षात घेऊन गुरू त्याला त्याच्यासाठी रियाजाची एक विशिष्ट पद्धत ठरवून देतात.


म्हणून रियाजाची एक सामान्य पद्धत सर्वांसाठी ठरवून देणे जरा कठीण असते. जसे ज्योतिष हे सामान्यपणे सर्वांसाठी सांगता येत नाही (कारण प्रत्येकाची कुंडली वेगळी असते) तसेच रियाजाचे असते.


सर्वसाधारणपणे विद्यार्थ्याच्या मनात रियाजसंबंधी खालील शंका असतात.

प्रश्न 1: रियाझ रोज एका विशिष्ठ जागी बसून विशिष्ट वेळी व विशिष्ट काळ करावा का ?

उत्तर: आपण संगीत शिकतो याची प्रत्येक क्षणी आठवण हवी. त्याला प. पू. गोंदवलेकर महाराज "अनुसंधान" असे म्हणतात. यात जशी, जेव्हढी जागा मिळेल तशा व तेवढ्या जागेत रियाझ करावा. उठता बसता चालता फिरता सूर डोक्यात घोळत असावेत. सदैव गुणगुणणे चालू असावे. वेगवेगळ्या माध्यमातून निर्माण होणारी लय जाणवत असावी. उदा. फिरणारा पंखा, रेल्वे गाडीचा आवाज, नळा तून पाणी थेंब थेंब ठिबकण्याची लय,पक्ष्यांच्या आवाजातील स्वर व लय वगैरे. रियाझ हा नेहमी चालू असावा. कधी श्रवण तर कधी चिंतन तर कधी मनन तर कधी गुणगुण, या माध्यमातून स्थळकाळाचे भान ठेऊन रियाझ चालू ठेवावा. लोक पागल म्हणतील, लोक "फुकट गेला" म्हणतील. पण त्याकडे लक्ष देऊ नये. रियाझ बागेत झाडाखाली बसूनही करता येतो. स्वयंपाक करता करता करता येतो. मात्र यासाठी मी संगीत शिकतो ही जाणीव सतत मनात जागी असायला हवी.


मात्र जर आपण आपल्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी नोकरी करीत असू तर तेथे मात्र प्रामाणिकपणे काम करावे.नोकरीच्या मध्ये संगीत येऊ नये. कारण "सर सलामत तो पगडी पचीस" अशी हिंदीत म्हण आहे. 


प्रश्न 2 : रियाझ कोणत्या वाद्याबरोबर करावा ? पेटी की तानपुरा ?

सुरुवातीला स्वर ज्ञान होईपर्यंत पेटीची मदत घ्यावी. पण एकदा स्वरांतरे कळू लागली की तानपुरा घ्यावा. हल्ली तानपुरा मोबाईल मध्ये उपलब्ध असतो. पेटीचे सूरही बऱ्याच वेळा बेसुरे असतात. म्हणून पेटि नियमितपणे tune करून घ्यावी. रियाझ डोळसपणे करावा.प्रत्येक स्वराचा नाद जाणून घेऊन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा.


प्रश्न 3: रियाझ मित्रांबरोबर सामुहिकरीत्या करावा की नेहमी एकट्यानेच करावा ?

मित्र जर आपल्या संगीताच्या आवडीला जपणारा व मिळून मिसळून रहाणारा असला तर दोघांनी मिळून रियाझ करावा. मात्र यात गप्पा जास्त आणि रियाझ कमी असे होता कामा नये. मित्रांबरोबर संगीतचर्चा अवश्य करावी. दोघे मित्र एकमेकांना पूरक असावेत. चुका जर मित्राने सांगितल्या तर त्या चुका ,न चिडता मान्य करून, त्या सुधारण्याचा प्रयत्न करावा. माणूस चुकांमधून शिकत असतो.


प्रश्न 4- रियाझ मोठ्या आवाजात करावा की छोट्या आवाजात करावा ?

आपल्या आवाजाची range व श्वासाची शक्ती समजण्यासाठी शुद्ध आकारात , कुणाला त्रास न होईल इतपत मोठया आवाजात करावा. आवाजात सुरीलेपण येईपर्यंत तेच तेच गात रहावे.(शुध्द स्वर अलंकार, पलटे)

 सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे रियाझ करावा. आपले डोके चालवू नये. मात्र शंका आली तर मात्र गुरूंकडून त्या शंकेचे समाधान अवश्य करून घ्यावे. 


"रियाझ करोगे तो राज करोगे" असे संगीतातील बुजुर्गमंडळींनी म्हटले आहे. ते सार्थच आहे.


अपने संगीतप्रेमी दोस्तों में हमारे लेख अवश्य शेअर करें । संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए हमारा फेसबुक पेज Sangeet-Jagat को लाइक कीजिए और हमसे व्हाट्स ऐप पे जुड़े रहने के लिए यहाँ क्लिक करे


Post a Comment

1 Comments
Post a Comment

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top