आवाज लावणे - एक कला
मी परीक्षक म्हणून एका केंद्रावर गेलो होतो. तिथे एक "सर"(संगीत शिकविणारे) शेवटची परीक्षा देण्यासाठी आले होते. परीक्षेला सुरूवात झाली. तंबोरे जुळले,तबलजी ने तबल्यावर थाप मारली. पहिल्या बडा ख्यालापूर्विची आलापी सुरू झाली. आणि मी दचकलोच. त्यांनी मान वेळाउन, गळ्याच्या शिरा ताणून असा काही "सा" लावला की त्यांच्याकडे मला पाहवेना.
त्यांचा चेहराही वाकडातिकडा झाला होता. "रेकणे" म्हणजे काय याचा मला प्रत्यय आला. मी त्यांना प्रेमाने म्हटले ,"सर, आपण इतके कष्ट का घेता ? अगदी सहज असा "सा" लावा." मग मोठ्या कष्टाने त्यांनी सहज असा "सा" लावला. पण "पडले वळण इंद्रिया सकला" या उक्तीप्रमाणे ते पुन्हा रेकुन गाऊ लागले. मी ओळखले की यांना सांगून काही उपयोगाचे नाही. बडा ख्यालानंतर त्यांचा चेहरा घामाने डबडबला होता. माझ्या मनात विचार आला की हे सर विद्यार्थ्यांना कसे शिकवीत असतील ? आणि हे सर या शेवटच्या परिक्षेपर्यंत सुखरूप पोहोचलेच कसे ?
दुसऱ्या एका प्रसंगात एक साधारण चाळिशीच्या मॅडम पूर्णपणे अनुनासिक आवाज लाऊन गायल्या. पण तान अंगाकडे आल्यावर मात्र त्यांना तान घेणे (अनुनासिक आवाजात) जमेना.
काहीजण गाताना तोंड जेमतेम उघडतात. मग त्यांना सांगावे लागते ," अरे तोंड उघडुन गा. तू काय गातोस ते एकु तरी येऊ दे"
मुद्दा असा की आवाज लावणे ही गायनातली खूप मोठी शिकण्यासारखी क्रिया असते. पहिला "सा" कसा लावावा हे शिकवताना काय काळजी घ्यावी हे गुरूंनी शिष्याला सांगणे खूप महत्वाचे आहे. "सा"
लावताना तोंड किती उघडावे,श्वास कधी घ्यावा,कसे बसावे,तो "सा" किती सेकंद टिकायला हवा हे सगळे सांगायला हवे.
१) "सा" गाताना स्वच्छ आकार लावावा. "आ" ऐकू येणे महत्वाचे आहे.
२) प्रथम श्वास घ्यावा नंतर "सा" लावावा.
३) ताठ बसावे.
४)"सा" निदान २० ते ३० सेकंद, न हालता डूलता लागायला हवा.
५) लक्षात असू द्या, जो अस्थिर आहे तो स्वरच नव्हे.
या प्रकारे सर्व स्वर लागायला हवेत.
सुरूवात करताना ज्याचा "आ" कार बिघडला, त्याचे गायन पूर्ण बिघडले असे समजावे.
"आ" कारा बाबत प्रख्यात गायक संगीतकार पंडित यशवंत देव यांनी आपल्या "शब्दप्रधान गायकी" या पुस्तकात फोटोसहित (तोंड किती उघडावे) फार छान माहिती देऊन "आ" काराचे महत्व अधोरेखित केले आहे. हे पुस्तक प्रत्येक संगीत साधकाने वाचायला हवे.
स्वर लावताना त्यावर श्वासाचे किती वजन टाकावे हेही माहीत असायला हवे.
स्वराला दाबणे(त्यावर श्वासाचे जास्त वजन टाकणे),स्वर चावणे(गाताना चावण्याची क्रिया करणे),जबडा हालवित गाणे टाळले पाहिजे. जबडा हालवित गायल्याने "आय,आय" असा विचित्र ध्वनी उमटतो व ते गायन हास्य रसाची उत्पत्ती करते. स्वर हे कसे सहजगत्या,विशेष कष्ट न घेता व श्रवणीय असे लावता येणे महत्वाचे आहे. स्वर लावताना चेहरा वेडावाकडा होणे,डोळे वटारणे, विचित्र हातवारे करणे या गोष्टी टाळल्या तर ते गायन प्रेक्षणीय ही होते. श्रोत्यांचे लक्ष पूर्णपणे गाण्याकडेच राहते.
म्हणून विद्यार्थ्यांनो , प्रथम आवाज लावायला शिका म्हणजे पुढचा मार्ग खूपच सोपा होईल.
अपने संगीतप्रेमी दोस्तों में हमारे लेख अवश्य शेअर करें । संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए हमारा फेसबुक पेज Sangeet-Jagat को लाइक कीजिए और हमसे व्हाट्स ऐप पे जुड़े रहने के लिए यहाँ क्लिक करे।