संगीतातील प्रयोगशीलता

0

 
संगीतातील प्रयोगशीलता,creativity in music

संगीतातील प्रयोगशीलता

     नाविन्याच्या शोधात असलेली व्यक्ती जेव्हा त्यासाठी निरनिराळे प्रयत्न करते व तर्कसंगत नवीन समीकरणे मांडते त्यास प्रयोग म्हणावेसे वाटते. प्रयोग हा तळमळीने केलेला एक प्रामाणिक व अभ्यासू प्रयत्न असतो. प्रयोगामागचा हेतू हा शुद्ध असतो. किंबहुना वास्तवातील एखाद्या अपूर्ण वाटणाऱ्या गोष्टीला पूर्णत्व देण्यासाठी केलेला प्रयास असतो. जुन्या किंवा कालबाह्य परंतु तत्कालीन लोकप्रिय गोष्टींना नवे परिमाण व आकृती देण्यासाठी जो अभ्यास केला जातो त्यास प्रयोग म्हंटले तर वावगे ठरणार नाही. दोन किंवा अधिक वस्तूंच्या मिश्रणातून तिसरी उपयोगी वस्तू निर्माण करणे यासाठी प्रयोगाची आवश्यक ता लागते. मानव कल्याणासाठी(शारीरिक अथवा मानसिक उन्नतीसाठी) निरनिराळ्या प्रयोगांची गरज भासते.


मानसिक शांती व उन्नती हे मानवी जीवनाचे साध्य आहे. त्यासाठी ललित कलांचा जन्म झाला. संगीत,चित्रकला,स्थापत्य,शिल्प व काव्य ह्या कला मानवाला मानसिक आनंद देतात. या कला प्रवाही रहाणे अत्यंत महत्वाचे असते. समाज जीवनाबरोबर ही कला बदलती रहाणे आवश्यक असते. त्याच प्रमाणे वाट चुकलेल्या समाजाला योग्य मार्गावर आणणे हे देखील कलेचे व कलाकाराचे व कला संशोधकांचे काम असते. "समाजाबरोबर चालावे पण समाजाबरोबर वाहत जाऊ नये" हा नियम प्रयोगकर्त्यांनी सांभाळला पाहिजे.

संगीतात अनेक शाखा आहेत. स्वर,ताल,सादरीकरण,वाद्ये असे अनेक घटक आहेत. त्याचप्रमाणे देशोदेशींचे संगीत,लोकसंगीत,शास्त्रीय संगीत असेही अनेक प्रकार आहेत. हे सर्व बारा स्वरात सीमित आहे. संगीताचा प्रसार व प्रचार संपर्क माध्यमांच्या सामर्थ्यावर अवलंबून असतो. अनेक प्रकारचे संगीत एकल्याने जनरूची बदलत जाते. संगीताच्या वेगवेगळ्या प्रकारांचे संक्रमण वेगाने होते. त्यामुळे संगीताचे आकृतीजन्य आयुष्य कमी होते. आधीचे वेगाने मागे पडते व नवे नवे येत रहाते. त्यामुळे संगिताकृती टिकावू व आनंददायी कशी होईल यासाठी प्रयोग होत असतात. यात सादरीकरणाच्या क्षेत्रात जास्त प्रयोग होतात. बारा स्वरातून नवनव्या आकृत्या निर्माण करून त्या अभिनव पद्धतीच्या सादरीकरणातून कश्या सादर करता येतील यावर प्रतिभावंत विचार करीत असतात. प्रयोग करीत असतात. या प्रयोगांचे फलित काय असेल, याचा त्यांना विशेष अंदाज असेलच असे नाही. लोकांसमोर हा प्रयोग ठेवल्यावर त्याचे कौतुक होईल की निंदा होईल याचाही त्याला अंदाज बांधता येत नाही. कारण प्रयोग हा एक कर्मयोग आहे. त्याचे फळ गोड असेल की कडू असेल हेही सांगता येत नाही. 


फार पूर्वी काव्यगायन व काव्यवाचनाचे कार्यक्रम होत असत. परंतु निवडक गेय कवितांना सुंदर चाली लाऊन त्या मधाळ आवाजात जाहीर कार्यक्रमात सादर करणे हा प्रयोग प्रथम श्री गजानन राव वाटवे यांनी केला व तो अत्यंत यशस्वी ठरला. त्यांनीच मराठीत "भावगीत" या प्रकाराला ऊर्जितावस्था आणून दिली.


मराठीत श्री.सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचा "गीतरामायणाचा" एकल गायनाचा प्रयोग सफल झाला. यात  बाबुजीच सीता,राम,लक्ष्मण,भरत,दशरथ,हनुमान,विश्वामित्र यांची गाणी गात असत व ओघवती निवेदनही करीत असत. हा चरित्र गायनाचा त्यांचा अभिनव प्रयोग होता व तो यशस्वीही झाला.


सलील कुलकर्णी आणि कविवर्य संदीप खरे यांचा काव्य व संगीताचा "आयुष्यावर बोलू काही " हा प्रयोगही खूप यशस्वी ठरला. माझ्या माहितीत यापूर्वी असा प्रयत्न कुणीही केला नव्हता.


उपशास्त्रीय संगीतात "बैठकीची लावणी" हा प्रयोग श्री.अशोक रानडे यांनी सादर केला व त्याचेही रसिकांनी स्वागतच केले. 


मात्र "फ्युजन" या प्रयोगाचे म्हणावे तितके स्वागत झाले नाही. किंबहुना त्यावर मान्यवरांकडून बरीच टीका झाली. प्रस्थापित गाण्यात बदल(ठेक्यात अथवा मधल्या संगीतात) करून ते नवे म्हणून स्वीकारणे रसिकांना रुचले नसावे. प्रस्थापित गाणी ही श्रोत्यांच्या हृदयात एक वेगळे प्रेम लेऊन स्थानापन्न झालेली असतात. त्याला धक्का लावलेला त्यांना रुचत नाहीत. म्हणून प्रयोग करताना शक्यतोवर प्रस्थापित गाण्यांना हात न लावलेलाच बरा.


शास्त्रीय संगीतात नवरागनिर्मिती हा एक प्रयोगच ठरतो. परंतु या नवीन रागांचे प्रमाणीकरण होणे फार गरजेचे आहे. शिवाय चित्रपटगीतातील बंदिश सदृश गीते निवडून ती शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत गायिली तर तो एक अभिनव प्रयोगच होईल. त्याचप्रमाणे शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत "चतुरंग", "त्रीवट", "सरगमगीत" यांचे विधिवत विस्तारपूर्वक गायन हा सुद्धा एक प्रयोग होईल.


शास्त्रीय संगीतातील रागातील बंदिशी सर्वसाधारणपणे हिंदी,उर्दू, भाषेत असतात.

परंतु या बंदिशी इंग्लिश व मराठी भाषेत रचून त्या विस्तारपूर्वक गाण्याचा प्रयोग डोंबिवली येथील श्री किरण फाटक यांनी केला. या प्रयोगाला सनातनी लोकांनी विरोध केला पण बऱ्याच प्रतिभावंत कलाकारांनी या प्रयोगाला पाठिंबाही दिला.


प्रत्येक प्रयोगामागे एक तर्कशुद्ध विचार हवा. हेतू स्वच्छ व प्रामाणिक असावा. प्रयोगा मागे एक सौंदर्यदृष्टी हवी. प्रयोग सादरीकरणाची एक विशिष्ठ वेगळी पद्धत हवी. उगाच तोडमोड,आदळआपट नसावी.

प्रयोग हा सवंग लोकप्रियतेसाठी करणे उचित नव्हे. आपल्या प्रयोगामुळे जनमानसात उच्च अभिरुची निर्माण व्हावी व तो प्रयोग कला प्रांताला सुदृढ करणारा असावा असे माझे प्रांजळ मत आहे.


          ✍️किरण फाटक


अपने संगीतप्रेमी दोस्तों में हमारे लेख अवश्य शेअर करें । संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए हमारा फेसबुक पेज Sangeet-Jagat को लाइक कीजिए और हमसे व्हाट्स ऐप पे जुड़े रहने के लिए यहाँ क्लिक करे

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top