श्रुती
नित्यं गीतोपयोगित्वमभिज्ञेयत्वमप्युत । लक्षे प्रोक्तं सुपर्याप्तं संगीतश्रुतिलक्षणम् ।।
(अभिनव रागमंजरी) "श्रुति म्हणजे कानांनी स्पष्ट ऐकू येणारा संगीतोपयोगी नाद" अशी ग्रंथकारांनी श्रुतीची व्याख्या केली आहे. 'श्रूयते इति श्रुतिः' अशी व्याख्या प्राचीन ग्रंथकारांनी केली आहे. 'श्रू-श्रूयते' म्हणजे ऐकणे या धातूपासून श्रुति हा संस्कृत शब्द तयार झाला आहे. परंतु कानांना ऐकू येणारा प्रत्येक नाद श्रुती म्हणता येणार नाही. तो नाद संगीतोपयोगी असायला हवा. "निकटवर्ती नादांमधील अंतराला शास्त्रकार 'श्रुती' म्हणतात. श्रुती हे सूक्ष्म स्वरांतर आहे. नाद व्यक्त होण्यापूर्वीचा जो नादबिंदू तो श्रुती होय. म्हणजे संगीतातील स्वर व्यक्त व्हावयाच्या ज्या नियोजित जागा त्यांना श्रुती म्हणता येईल." म्हणजे श्रुती हा नादाचा सूक्ष्मतम आविष्कार असे म्हणता येईल. नाद उत्पन्न होत असताना तो श्रवणेन्द्रियांना गोचर होईतोपर्यंत त्याचे चार प्रकार होतात. १. उदात्त २. अनुदात्त ३. स्वरित व ४. उच्चरित. पहिल्या दोन प्रकारांचा नादाशी सूक्ष्म संबंध आहे. बाकीच्या दोन प्रकारांचा संगीताशी संबंध येतो, त्यामुळे श्रुती म्हणजे ऐकलेली ज्ञानमय स्थिती. व्यवहारात संगीतातील पायाभूत सप्तस्वरांचा श्रुतींशी संबंध येतो.
स्वरूपमात्रश्रवणान्नादोऽनुरणनं बिना। श्रुतिपित्युच्चते भेदास्तस्था द्वाविंशतिर्मताः ।।
(संगीत दर्पण) अर्थ: "प्रथम झालेल्या आघाताने प्रतिध्वनिशिवाय जो हस्व नाद निर्माण होतो त्याला 'श्रुती' असे म्हणावे."
श्रुती हा नादाचा सूक्ष्म आविष्कार असून दोन निकटच्या नादांमध्ये असणाऱ्या नादस्थानाला श्रुती असे म्हणावे लागेल. ह्या श्रुतींवरच स्वरांची स्थाने निश्चित केली आहेत, असे सात स्वर निश्चित केले असून ह्या सप्तकातील श्रुती २२ मानल्या आहेत. ह्या बावीस श्रुतींवर कोमल व तीव्र मिळून १२ स्वर निश्चित केले आहेत. हे १२ स्वर भारतीय संगीताचा मूलाधार आहेत. भारतीय संगीतातील रागगायन ह्या १२ स्वरांवर आधारित असून त्यांचा कौशल्यपूर्ण उपयोग केला जातो. ह्या २२ श्रुतींची नावे अशी १. तीव्रा, २. कुमुद्धती, ३. मंदा, ४. छंदोवती, ५. दयावती, ६. रक्तिका, ८. रौद्री, ९. क्रोधी,१०. वज्रिका, ११. प्रसारिणी, १२. प्रीती, १३. मार्जनी, १४. क्षिती, १५. रक्ता, १६. संदीपिनी, १७. आलापिनी, १८. मदंती, १९. रोहिणी, २०. रम्या, २१. उग्रा, २२. क्षोभिणी.
प्राचीन ग्रंथकारांनी आपल्या हृदयात २२ नाड्या असून त्यांचे स्पष्टपणे नाद ऐकू येतात त्यांना 'श्रुती' मानले.
तस्य द्वाविंशतिर्भेदाः श्रवणात् श्रुतयो मताः।
हृदयाभ्यन्तरसंलग्ना नाड्यो द्वाविंशतिर्मताः ।।
नाद क्रमाने उंच चढत गेल्याने ह्या २२ श्रुतींमधून बारा स्वर निवडले. ठराविक श्रुतिस्थानेच 'स्वर' म्हणून ठरविण्यात आली. ती स्थाने १-५-८-१०-१४-१८-२१. ही शुद्ध स्वरांची तर ३-७-१२-१६-२० ही स्थाने विकृत स्वरांची ठरविण्यात आली. ह्या १२ स्वरांनाच संगीताचे मूलभूत स्थान देण्यात आले.