तबल्याची वैज्ञानिक बनावट

0

तबल्याची-वैज्ञानिक-बनावट

तबल्याची वैज्ञानिक बनावट 

                     भारतीय संगीत असो की पाश्चिमात्य संगीत, त्यामध्ये तालाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. फरक इतकाच, की पाश्चिमात्य तालवाद्ये फक्त ताल निर्माण करतात, तर आपली तबला व मृदंग ही वाद्ये चक्क 'बोलतात." तबला व डग्गा दोन्हीमध्ये कंपित होणारा ताणलेला चामड्याचा तुकडा हा वर्तुळाकार असतो. या चामड्याच्या तुकड्यावर आघात करून नादनिर्मिती होते. त्या नादाची कंपनसंख्या चामड्यांच्या तुकड्यावरील तीण, त्याचा व्यास व तुकड्याच्या एक सें.मी. वर्ग एवढ्या क्षेत्रफळाचे वजन या चार गोष्टी एका वैज्ञानिक सूत्रात बांधलेल्या असतात. त्यावरून समजते, की कंपनसंख्या ही व्यास व वजन यांच्या व्यस्त प्रमाणात तर ताणाच्या समप्रमाणात असते. म्हणजेच असे, की वर्तुळ मोठे असेल तर वारंवारिता कमी म्हणजे स्वर खालचा येतो. तर वर्तुळ लहान म्हणजे वरचा स्वर निर्माण होतो.  खालचा स्वर म्हणजे कसी कंपनसंख्येचा स्वर, तर वरचा स्वर म्हणजे जास्त कंपनसंख्येचा स्वर असतो. डग्गा साधारणपणे डाव्या हाताने वाजवतात. तो टिकाऊपणाच्या दृष्टीने धातूचा बनवलेला असतो. त्याची उंची १० ते १२" असते. चामड्याच्या ताणून बसवलेल्या भागाला 'पुडी' असे म्हणतात, या वर्तुळाकार पुडीच्या कडेवर अंदाजे १/२" रुंदीची कातडी पट्टी असते. तिला 'गोट' किंवा 'चाट' म्हणतात. त्यानंतर कातड्याची वीण असलेल्या किनारीला 'गजरा' असे म्हणतात. याला असलेल्या सोळा घरांतून कातड्याच्या लांब पट्ट्या ओवलेल्या असतात, त्यांना 'वादी' असे म्हणतात. या पट्ट्या डग्ग्याच्या तळाशी म्हणजे 'गुडरीत' बांधल्या जातात. या ताणून पुडीला म्हणजेच चामड्याच्या तुकड्याला कमी-जास्त ताण देता येतो. डग्ग्याच्या पुडीची जाड़ी, वर्तुळाचा व्यास व वाद्यांमधला ताण असा ठेवतात की पुडीवर आघात केल्यावर निघणाऱ्या स्वराची वारंवारिता ही मंद्र सप्तकातील 'सा' एवढी असते, ही खूपच कमी असते. मूलभूत वारंवारिता जेव्हा कमी असते तेव्हा पुडीखालील हवेच्या आकारमानाचा त्यावर फार परिणाम होतो. अर्धगोलाकारामध्ये हा परिणाम कमीत कमी होऊ शकतो. म्हणून डग्गा अर्धगोलाकार असून त्याचे आकारमान तबल्यापेक्षा खूप जास्त असते व यामुळेच डग्गा सुरात व्यवस्थित लागू शकतो. तबल्याच्या बऱ्याच गोष्टी डग्ग्या प्रमाणे असतात, पण त्याचे आकारमान कमी असते. तो शिसम किंवा खैराच्या लाकडाचे खोड आतून कोरून पोकळ करून त्यावर बकऱ्याचे चामडे ताणून बसवून बनवलेला असतो. तबल्यात डग्ग्यासारख्या सोळा वाद्या असतात, सगळीकडे सारखा ताण बसण्यासाठी त्यांची संख्या सोळा असते. फक्त तबल्यामध्ये त्याशिवाय आठ गट्टे असतात. हे गट्टे म्हणजे लंब वर्तुळाकार किंवा वृत्तचिनीच्या आकाराचे लाकडाचे ठोकळे असतात व ते तबल्याच्या वाद्यांमधून बसवलेले असतात. हे गट्टे हातोडीने वर खाली सरकवून पुडीचा ताण कमी जास्त केला जातो.

                  तबल्याच्या पुडीची जाडी, वर्तुळाचा व्यास व चामड्यावरील ताण असा प्रकारे ठेवला जातो, की पुडीतून निघणाऱ्या स्वराची मूलभूत कंपनसंख्या ही गायकाच्या मध्य सप्तकातील 'सा' एवढी असते. हा स्वर सापेक्षा खूप वरचा असल्याने स्वाभाविकच तबल्याच्या पुडीचा व्यास हा डग्ग्याच्या पुडीच्या व्यासापेक्षा खूपचकमी असतो. पुरुष गायकांचा स्वर स्त्रियांपेक्षा खालचा म्हणजे कमी कंपनसंख्येचा असल्याने त्यांच्या तबल्याच्या पुडीचा व्यास हा स्त्रियांसाठी वापरल्या जाणाऱ्या तबल्याच्या पुडीच्या व्यासापेक्षा जास्त असतो. तबल्याच्या पुडीखालील लाकडी पोकळी ध्वनिप्रारणाचे (रेडिएशन) काम करते. या पोकळीमुळे ध्वनीची तीव्रता वाढते. तबल्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाई. नोबेल पारितोषिक विजेते सी. व्ही. रामन यांना संगीताची विशेषतः वाद्यांची फार आवड होती. पाश्चात्त्य तालवाद्यांमध्ये शाई नसते व तबला आणि मृदंग यामध्ये ती असते. आणि या शाईमुळेच या वाद्यांमध्ये सांगीतिक गोडवा येतो हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे मृदंगावर त्यांनी खूप संशोधन केले. रोशिंग नावाच्या वैज्ञानिकानेही शाईवर खूप संशोधन केले आहे. तवल्यावर शाई नसेल तर त्यातून निर्माण होणाऱ्या मूलभूत कंपनसंख्येच्या नादाबरोबरच जास्त कंपनसंख्या असलेले अवरनाद (overtones) निर्माण होतात. पण ते सहसंवादी (हारमोनियस) नसतात. त्यामुळे सांगीतिक गोडवा येत नाही. पण शाई लावली की या अवरनादांनाचे रूपांतर सहसंवादी स्वरांमध्ये होत असल्याने सांगीतिक गोडवा निर्माण होतो हे या संशोधनाअंती कळून आले आहे. नर्मदेच्या वाळवंटातील काळ्या दगडांची पूड किंवा लोखंडाची व कोळशाची वस्त्रगाळ भुकटी व सरस किंवा गव्हाची खळ वापरून शाई तयार होते. पुडीतून निघणाऱ्या सहसंवादी स्वरांचं अस्तित्व हे पुडीवर केलेल्या आघाताच्या स्थानावर अवलंबून असतं. आणि म्हणूनच वादकाला अत्यंत काळजीपूर्वक या स्थानी आघात करावा लागतो. तारेमध्ये शून्य विस्थापन असलेले (निस्पंद पेवशी) व जास्तीत जास्त विस्थापन असलेले बिंदू असतात, कारण तरंग एकमितीय असतो पण तबल्यावरील तरंग द्विमितीय असल्याने हे निस्पंद म्हणजे वर्तुळे किंवा व्यास असतात, उ. झाकिर हुसेन सारख्या वादकाच्या हातात तबल्याला तंतुवाद्याचं माधुर्य येतं रिचर्ड फायनामन किंवा सी. व्ही. रामनसारख्या नोबेल पारितोषिकविजेत्या शास्त्रज्ञांना भुरळ घालणारा तबला विज्ञानाधिष्ठित असतो यात काय नवल !


संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए नीचे दिए गए सोशल मीडिया बटन पर क्लिक करके अभी जॉईन कीजिए।

संगीत की हर परीक्षा में आनेवाले महत्वपूर्ण विषयोंका विस्तृत विवेचन
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Please Follow on FacebookFacebook
Please Follow on InstagramInstagram
Please Subscribe on YouTubeYouTube

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top