अशी घ्या पावसाळ्यात स्वतःची काळजी
यंदा उन्हाळा इतका तापला की आपण सारेच वाट पाहतो आहोत की पाऊस कधी येईल! मान्सून दरवर्षी येतो तेच 'मॅजिक' असतं. सगळं अवतीभोवतीचं जग क्षणात बदलून जातं. आणि त्यासोबतच बदलते आपली तब्येत ! आला पावसाळा, तब्येत सांभाळा हे दरवर्षीचं वाक्य कितीही नेहमीचं वाटलं तरी पावसाळी कुंद हवेत तब्येत सांभाळायला हवी. स्वतः सह घरातल्या वडीलधाऱ्या माणसांची आणि लहान मुलांची जास्त काळजी घ्यायला हवी.
सोपे साधे नियम
1. पावसाळा सुरु होताना पचायला हलकं अन्न खा शक्यतो गरम खा.
2. बाहेर रस्त्यावरचं, हॉटेलातलं खाणं बंद करा. खायची वेळ आलीच तर गरम सूपसारखे पदार्थ खा.
3. तळलेले, मसालेदार पदार्थ खाऊ नका.
4. पचायला जड पदार्थ म्हणजे उसळ खाणं कमी करा. पचनशक्ती कमी असेल, वारंवार पित्त होत असेल तर उसळ न खाणंच योग्य.
5. पालेभाज्या खाणं पावसाळ्यात टाळा. विशेषतः ज्यांचं पोट लवकर बिघडतं त्यांनी पालेभाज्या विशेषतः पालक खाणं टाळलेलंच बरं.
6. पाऊस म्हणजे वडे, भजी हे पदार्थ आवडीचे होतात. एखाद्यावेळी खाण्यात गैर काही नाही पण बेसनाचे, तळलेले पदार्थ जास्त खाल्ले तर पोट बिघडणारच.
7. ठेचे, मिरच्या, खूप तिखट झणझणीत न खाणंच बरं.
8. रोज सायंकाळी लवकर जेवा, हलकं जेवा म्हणजे पोटाचे त्रास होण्याचा धोका कमी होईल.
9. हायजिन सांभाळा, पावसाळ्यात सर्वप्रकारची स्वच्छता सांभाळा. घरात साचलेलं पाणी असेल तर मलेरियासह डेंग्यूचा धोका वाढतो.
10. लहान मुलं-वृद्ध यांच्या आहाराची काळजी घेताना पौष्टिक म्हणून पचायला जड पदार्थ, सुकामेव्याचे, दुधाचे प्रमाण डॉक्टरांशी बोलून ठरवा.