भैरवी…
लहान असताना घरी कुणी नात्यातलं, ओळखीतलं आलेलं माणूस गाणं वगैरे म्हणणारं असेल तर त्याला म्हणायचा आग्रह व्हायचा. मोठ्या माणसांकडून शेवटी 'एक झकास भैरवी होऊ दे' असं म्हटलं जायचं. तो 'राग' आहे वगैरे गोष्टी काही ठाऊक नव्हत्या. चिमुकला मेंदू (अजूनही तेवढाच आहे, उत्क्रांती काहीही नाही) विविध शक्यता तपासात बसायचा. मागच्यावेळेला अभंग होता भैरवी म्हणून यावेळी वेगळंच गाणं कसं भैरवी म्हणून असे अज्ञानी प्रश्न पडायचे. मैफिलीच्या शेवटी म्हटला जाणारा राग असं नंतर समजलं. मग आयुष्याच्या संध्याछायेला पण भैरवी म्हणायची वेळ आली वगैरे असं झालं. एकदा शिक्का बसला की बसला, तसं झालंय भैरवीचं. अपभ्रंश, अर्धवट माहितीवर आधारित पायंडे, कालबाह्य प्रथा सहसा बदलत नाहीत, उलट त्या नेमाने पाळल्या जातात. क्रॉफर्ड मार्केटच्या उत्तरेला रहाणारे इंग्रज दक्षिण भागाला Behind the Bazar म्हणायचे त्याचं भेंडी बाजार झालं आणि तेच अधिकृत नाव झालं. भारतीय शास्त्रीय संगीतात जे घराणी आहेत त्यात हे भेंडीबझार घराणं पण आहे.
एका मासिकात मी वाचलं होतं. भैरवी हा सकाळच्या पहिल्या प्रहरात म्हणायचा राग. तेंव्हा मैफिली रात्रभर चालायच्या आणि पहाटेला संपायच्या. सकाळी सांगता करताना भैरवी सकाळचा राग म्हणून गायला जायचा. नंतर ते भैरवी मैफिल संपताना म्हणतात असं रूढ झालं आणि ती प्रथा झाली. एरवी नियमात चालणारी घराणी यात कुठे आडवी आली नाहीत हे नशीब. मैफिल संध्याकाळी, रात्री जरी संपली तरी भैरवी आळवली जाऊ लागली. अतिशय गोड, चटकन ओळखता येईल असा हा राग आहे. रे, ग, ध, नी - सगळे कोमल स्वर आहेत. कठोर, तीव्र काहीही नाही म्हणून मी साने गुरुजी राग म्हणतो याला. मनाला अतिशय 'शांत' करणारा हा 'राग' आहे. त्याचे एखादा स्वर बदलून केलेले, नटभैरव, अहिरभैरव वगैरे प्रकार पण आहेत. स्वर रांग सोडून कधी बाहेर येतोय का यावर लक्ष ठेवणारे ट्राफिक पोलिस रसिकत्व करायचय काय.
अगदी अलीकडची आवडलेली आणि कायम ऐकावीशी वाटणारी भैरवी म्हणजे 'चिन्मया सकल हृदया'. आनंदगंधर्व भाटे पोटातून गातात अगदी. असे चित्रपट म्हणून थेटरात बघावेत. तो मोठा पडदा आणि ते आर्त स्वर. आत हलतं काहीतरी. मोकळ्या माळरानावर गाणारे बालगंधर्व आणि तो तापलेला, खणखणीत आवाज. तंतुवाद्यच ते गळ्यातलं. पोटातून निघून स्वरयंत्रापर्यंत ज्या नसा, शीरा जात असतील त्यावर घासून आलेला आवाज तो. मला कायम प्रश्न पडत आलाय, एवढं सुंदर गाणं म्हटल्यावर त्यांचे शरीरातील अणुरेणु किती तापत असतील, त्यांच्या सुखाचा आलेख कुठल्यातरी यंत्रावर काढता यायला हवा. भैरवी संपल्यानंतर कुणीही टाळ्या वाजवू नयेत खरंतर, निरव शांतता हवी. गायकाचा देहतंबोरा थांबलेला वाटला तरी त्या तारांची कंपनं चालूच रहात असतील काही काळ, त्यांना शांत व्हायला अवधी द्यायला हवा. अशा सुखाला सुद्धा चव असते. ती शांततेत चाखता येते. एक अनाम ठेवा मिळाल्याचा आनंद गायकाला होत असावाच पण आपल्याबरोबर श्रोत्यांनाही तो पोचवू शकलो हा दुप्पट आनंद मिळत असणार. स्वांतसुखाय आपण करतोच असतो, दुस-यालाही आनंद मिळेल अशी काही कला अंगात हवी.
'जिव्हाळा' चित्रपटातली 'लळा जिव्हाळा शब्दच खोटे' ही एक कातर भैरवी आहे, गदिमांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात राम गबालेंना अर्जन्सी होती म्हणून लगेच कागद घेऊन त्यांनी झरझर लिहून दिलंय हे गाणं. तेंव्हा त्यांनी 'कोण कुणाची बहीण, भाऊ, पती, पुत्र वा जाया, सांगायाची नाती सगळी जो तो अपुले पाही' असं जिव्हारी लागणारं लिहिलंय.