संगीतोपचार : एक स्वास्थ्यवर्धक उपाय..!

0


संगीतोपचार : एक स्वास्थ्यवर्धक उपाय..!


          आजार, व्याधी शरीराला विळखा घालत आहेत, त्यावर बऱ्याचदा औषधांच्या मात्राही काम करीत नाहीत. संगीतात असणाऱ्या अनोख्या संमोहन शक्तीमुळे सध्या रोगांवर पूरक उपचार म्हणून संगीतोपचार लोकप्रिय होत आहे.

संगीतं श्रवणामृतं !

संगीत हे नेहमीच आनंद देणारं, मनःशांती मिळवून देणारं असत. कोणतंही काम करीत असताना एकीकडे गाणं चालू असलं की काम चुटकीसरशी संपतं. कामाचा शीण तेव्हढासा जाणवत नाही. सकाळच्या वेळी फिरायला जाताना कानात इयर-प्लग्ज घालून गाणं ऐकत गाण्याच्या तालासोबत भराभर चालणारे लोक आजकाल खूप दिसतात. जिममध्ये तालबद्ध गाण्यांच्या साथीने सगळे वर्कआऊट्स होत असतात. कामाच्या ठिकाणी मोठ्ठा ‘आ’ करून, तोंड बधीर करून बसलेले असताना आणि तिथून कधी एकदा सुटका होतेय त्या क्षणासाठी अधीर झालेले असताना जर का तिथे मंद, सुखद वाद्यसंगीत वाजत असलं तर आपलं लक्ष दुखण्यापासून थोडं दूर हटत. अंगाई गीताच्या सुरांनी चुळबुळ करणारी छोटी बाळ चट्कन झोपेच्या आधीन होतात.

संगीत हे मनाला, चित्तवृत्तींना शांत करते हे तर सर्वश्रुत आहे. पण संगीताचा उपयोग रोग निवारणासाठीदेखील करता येतो याबद्दल मात्र अजून फारशी कुणाला माहिती नाही. आपल्या वेदांपैकी सामवेदात संगीताबद्दल विस्तृत माहिती आहे. संगीत कला ही आयुर्वेदाचा देखील खूप जुना भाग आहे.

भारतीय शास्त्रीय संगीतात राग-समय चक्राची संकल्पना फार महत्वाची मानली जाते. त्या नुसार दिवसाच्या प्रहराप्रमाणे राग गायले जातात. जसे सकाळी गायचे राग म्हणजे भैरवचे प्रकार, तोडीचे प्रकार इ. दुपारी सारंगचे प्रकार, पटदीप, भीमपलास इ. संध्याकाळच्या रागामध्ये भूप, कामोद, यमनकल्याण वगैरे आणि रात्रीच्या रागामध्ये बागेश्री, मालकौंस, भिन्न षड्ज इ. रागांचा समावेश होतो.

             आयुर्वेदात त्रिदोष म्हणजे कफ, पित्त आणि वात ही संकल्पना आहे. हे त्रिदोष आपल्या शरीरात असतात. त्यांचं प्रमाण हे व्यक्तीपरत्वे भिन्न असत. या दोषांच प्रमाण हे नेहमी संतुलित असावं लागतं. कोणताही एक दोष वाढला की आजार येतो. या दोषांच्या वेळा ठरलेल्या असतात. दिवसभरात दोन चक्रात त्या वेळा विभागलेल्या असतात. म्हणजे सकाळी 6 ते 10 कफाचं प्रमाण जास्त असते. 10 ते 12 पित्त आणि 2 ते 6 वात. दुसऱ्या सायकलमध्ये 6 ते 10 कफ, 10 ते 2 पित्त आणि 2 ते 6 वात.

          ज्या वेळेला त्रिदोषांपैकी जो दोष वाढलेला असतो त्यानुसार रागाची निवड केली जाते (अर्थात तो राग त्या वेळी गायचा राग असतो). मात्र त्यात थोडा बदल करावा लागतो. राग विशिष्ट पद्धतीने वाजविला किंवा गायला तरच त्याचा परिणाम होतो एरवी त्याने नुसते मनोरंजन होते. पं.शारंगदेवाच्या ‘संगीत-रत्नाकर’ या ग्रंथात याविषयीचे श्लोक आहेत. त्रिदोषांपैकी प्रत्येक दोषाचे पाच प्रकार आहेत आणि ते शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. त्या नुसार राग बांधलेले आहेत.

           आधुनिक वैद्यक शास्त्रात आता संगीतात असलेल्या रोगनिवारक शक्ती (हिलिंग पॉवर) बद्दल नवीन शोध लागत आहेत. संगीताच्या माध्यमातुन उपचार करण्यासाठी आपल्या शरीरातल्या पेशींना कंपनाच्या साह्याने सचेत केलं जात. या कंपनामुळे रोग्याच्या जाणीवेवर परिणाम होतो व त्याला आरोग्याचा लाभ होतो. त्या साठी रोगाचं अचूक निदान करून त्याला ऐकवण्यासाठी नेमक्या रागाची निवड करून तो किती वेळ आणि कोणत्या समयी ऐकायचा हे ठरवावं लागत.

            चेन्नईतील राग रिसर्च सेंटर सध्या भारतीय राग आणि त्यांचा रोग- निवारणासाठी कसा उपयोग करून घेता येईल याबद्दल अभ्यास आणि संशोधन करीत आहे. या साठी संगीतज्ञ, डॉक्टर्स, मानसोपचारतज्ञ यांची एक टीम काम करते आहे.

             मुंबईत प्रसिद्ध सतारवादक व संगीतकार पं.शशांक कट्टी (शांक-नील फेम ) यांनी गेली अनेक वर्ष या संदर्भात अभ्यास व चिंतन करून डॉक्टर्स आणि आयुर्वेदाचार्य यांच्या बरोबर काम करून स्वतःची ‘सूर-संजीवन’ या नावाची एक उपचार पद्धती विकसित केली आहे. इच्छुकांना ते या विषयीचे प्रशिक्षणसुद्धा देतात. रोगनिवारणासाठी विशिष्ट रागांची निवड करून ते विशिष्ट पद्धतीने वाजवून त्यांनी अनेक सीडीजची निर्मिती केली आहे.

            डोकेदुखी, पोट दुखी, संधीवात, ऍसिडीटी, मधुमेह, कोलायटिस, यकृताचे विकार, अस्थमा, रक्तदाब, निद्रानाश, फिट्स अशा अनेक विकारावर संगीतोपचार फार उपयुक्त ठरत आहेत. अर्थात चालू असलेली औषध पूर्णपणे बंद करून चालत नाही. पण त्यांच्या जोडीने पूरक उपाय म्हणून ह्या उपचारांचा खूप फायदा होतो. औषधांची मात्रा कमीकमी करीत पूर्णपणे बंद करून रोग बरा होऊ शकतो. नुसतं करमणूकीचं साधन न राहता आरोग्य सुधारण्यासाठी आता संगीताचा उपयोग करण्यात येतो आहे.

            आधुनिक जीवनाचा परिपाक म्हणून निरनिराळ्या प्रकारच्या व्याधी वाढीस लागल्या आहेत. ऍलोपेथीच्या मर्यादा लक्षात आल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून सुजोक, रेकी, प्राणिक हिलिंग इत्यादी अनेक पूरक वा पर्यायी उपचारपद्धती लोकप्रिय झाल्या आहेत. त्यांच्याच जोडीने आता येणाऱ्या काळात संगीतोपचार पद्धती लोकप्रिय झाली तर त्यात नवल वाटायला नको.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top