संगीत क्षेत्रात करिअर
संगीत एक मनोरंजनाचे माध्यम म्हणून आपण त्याचा नित्य आनंद घेत असतो प्रत्येक व्यक्तीला कोणत्या न कोणत्या प्रकारचे संगीत आवडत असते आपल्या रोजच्या जीवनात आपण रेडिओ, टीव्ही, मोबाईल, चित्रपट, मंदिर व प्रार्थनास्थळातील भक्ती गायनाच्या माध्यमातून संगीताचे आस्वादन करत असतो. प्रत्येकाचा आवडी-निवडीनुसार आपण केव्हाही आपल्या आवडीचे संगीत ऐकू शकतो ते केवळ विज्ञानाच्या प्रगतीमुळेच. आजच्या युगात प्रत्येक गोष्टीची जाहिरात होत आहे. हीच जाहिरात परिणामकारक होण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने संगीताचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसत आहे. त्यामुळे संगीत शिकण्यापासून ते शिकवण्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर संगीत क्षेत्रात संधी उपलब्ध झाल्या आहेत. पूर्वीच्या काळी संगीत फक्त मनोरंजनाचे साधन म्हणून आपण त्याकडे पाहिले आहे. गायन-वादन शिकून मैफिलीचा कलाकार होणं हेच संगीत साधकाचे अंतिम ध्येय असायचे परंतु अलीकडच्या काळात दूरदर्शन, उद्योग जाहिराती, चित्रपट, मालिका, कार्यक्रम, रियालिटी शोज, प्रोडक्शन हाऊस, रेडिओ, साऊंड रेकॉर्डिंग, एफ एम रेडिओ, युट्युब चॅनेल्स, सांस्कृतिक विभाग आणि संगीत सॉफ्टवेअर उद्योगाने कमालीचा उच्चांक गाठला आहे तसेच खाजगी संगीत शिकवणी, संगीत शिक्षक, संगीत प्राध्यापक, संगीतकार, गीतकार, संगीत प्रकाशक, संगीत संयोजक, संगीत पत्रकारिता, संगीत सल्लागार, संगीत उपचारक, वाद्यवृंद कलाकार व मैफिलीचा कलाकार अशा विविध प्रकारच्या करिअरच्या संधी संगीत क्षेत्रात आहेत. दिवसेंदिवस संगीताची वाढती लोकप्रियता व कार्यक्रमांना कार्पोरेट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात दिले जाणारे प्रायोजकत्व यामुळे संगीत क्षेत्रात करिअर करण्याकडे नवीन पिढीचा कल वाढत आहे.
संगीत क्षेत्रात करियर करण्यासाठी कुठलीही शैक्षणिक योग्यतेची आवश्यकता नसते तरी देखील महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कोणत्याही शाखेत प्रवेश घेऊन अकरावी पासून संगीत विषय निवडण्याची सुसंधी आज मिळत आहे. संगीत क्षेत्रात प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पद्द्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहे. प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्ष, पदवीचा तीन वर्षे तर पदविका व पद्युत्तर अभ्यासक्रमाचा दोन वर्षांचा कालावधी आहे. संगीत विषयाचे शिक्षण व प्रशिक्षण संगीत शिक्षक, कलाकार व विविध संस्थांच्या माध्यमातून दिले जाते. तसेच पदवी देण्याचे ही कार्य बन्याच संस्थांच्या माध्यमातून होत आहे. भारतात मद्रास येथील कलाक्षेत्र, दिल्ली येथील भारतीय कला केंद्र व मिरज येथील गांधर्व महाविद्यालय मंडळ, इंदिरा कला संगीत विश्वविद्यालय या संस्था संगीत क्षेत्रातील नामवंत संस्था आहेत, प्रतिभा, अभिरुची व परिश्रम घेणाऱ्या साधकांना संगीत क्षेत्राला संगीत क्षेत्रात यशाची उंच भरारी सहज घेता येते भारतीय संगीताला खूप मोठी प्रदीर्घ आणि महान परंपरा लाभलेली आहे भारतीय संगीत हे मुक्त, अफाट सराव व विचारांनी घडवलेला अलंकारच आहे. करिअरच्या कोणत्याही सांगितिक प्रभागात उत्तम यश मिळवण्यासाठी योग्य गुरु, अखंड साधना व अभ्यासाची गरज आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार संगीत क्षेत्रात अजून नवनवीन संगीताच्या संधी उपलब्ध होत आहेत व होणार आहेत. साधकांनी आपली कलाकार वृत्ती जोपासत साधना करत करत पदवी प्राप्त करून व्यावसायिक संधीचा शोध घेणे ही गरजेचे आहे.