उस्ताद राशिद खान : शतकोत्तर नायकाचा अनपेक्षित निरोप...
भारतीय अभिजात संगीताच्या भीमसेनी शतकानंतर आकाश मोकळे होण्याआधीच उस्ताद राशिद खॉ नावाच्या ध्रुव ताऱ्याने संगीतरूपी क्षितीजावर स्वतःला प्रस्थापित केलं. परंतु हा ध्रुव उगवतीच्या सूर्याचा केवळ एक छोटा तारा म्हणून चमकण्यात धन्यता मानणारा नव्हता !! त्यांनं उराशी प्रत्यक्ष सूर्य होण्याची जिद्द बाळगली आणि ती पूर्णही केली !! भारतीय अभिजात संगीताचं संपूर्ण आकाश पादाक्रांत करून विद्वान आणि सामान्य रसिक दोघांनाही शास्त्रादपि शरादपि चा आनंद दिला. एका अतिशय सामान्य कुटुंबातील मुलाचे असामान्य कर्तुत्व पाहून अनेकांना या क्षेत्रात स्वतःला झोकून द्यावं असं वाटलं!! केवळ 55 वर्षे जीवनात जेवढ्या मैफिली त्यांनी गाजवल्या त्याबबतीत त्यांची तुलना या सम हा ! अशीच केली जाऊ शकते.
प्रसिद्धी नसताना लोभ नसणे वेगळे आणि प्रसिद्धी चरणाची दासी असताना सुध्दा तिचे कौतुक नसणे वेगळे!! जीवनभर खॉ साहेबांनी प्रसिद्धीला पायीची वहाण पायी बरी म्हणूनच वागवले. गाणं ऐकवण्याच्या शुद्ध कामापलिकडे ते कधीही कुठल्या सामाजिक,राजकीय, फिल्मी मंचावर भाषणं करत हिंडले नाहीत. गायनाआधी देखील एक दोन वाक्यांच्या पुढे कधी उथळ संभाषण केले नाही. कधी एकदा गायन सुरू करू हेच भाव त्यांच्या चेहऱ्यावर असत. त्यांचा सगळा भर ये हृदयीचे ते हृदयी चालणाऱ्या स्वर संवादावर केंद्रित असे.
त्यांच्या खास रसिक वर्गानेही त्यांचा हा खॉ साहेबी रूबाब कायम राखला. आपल्या गंभीर चेहऱ्यावर एक जरब ठेवून शेवट पर्यंत मैफिल फक्त आपल्यावरच केंद्रित राहिल याची हुकमी काळजी ते घेत. त्यांचे सादरीकरण कधीही साथीदार शरण नसे. संपूर्ण मैफिलीवर आणि रसिकमनावर संपूर्ण पणे केवळ आणि केवळ रशिद खॉ नावाच गारूड असे.
मैफिलीत हा माणूस मोठा ऐटबाज,निडर आणि देखणा दिसत राही. पहिला सूर लागताच नैसर्गिक सौंदर्य नसलेल्या त्यांच्या रूपालाही एक तेज प्राप्त होत असे. हजारो लोकांमध्येही हा माणूस आपल्याशीच बोलतोय अशी ऐकणाऱ्या प्रत्येकाची समजूत होत असे. जसे ते साथीदार शरण नव्हते तसे तंत्र शरणही नव्हते. टाळ्या पडतातच आहेत तर करू सरगम असलं त्यांनी कधी केलं नाही.
आपल्या खानदानी गाण्याच्या श्रोत्यालाही खानदानी अदब त्यांनी शिकवली. अभिजात केलं! शास्त्रीय संगीताचं अर्थकारण एका उंचीवर नेण्यात निःसंशय त्यांच मोठं योगदान आहे. त्यांचा प्रत्येक राग हा मनावर गारुड करतो तरीही कौसीकानडा गावा तर खॉ साहेबांनीच...! असं मला एक श्रोता म्हणून कायम वाटत आलं.
त्यांच्या पाठी नव्या युगाचे नवे नायक निश्चित आहेत पण ज्यांनी आयुष्यात उस्ताद राशिद खान अनुभवले तो त्यांच्या प्रेमात अखंड बुडलेला असेल!! नायक अनेक होतील पण....
झालेत बहू | आहेत बहू | होतील ही बहू | परी 'या सम हा'!!!
"🙏आखरी खुदा हाफिज खॉ साहब पर्वर्दिगार आपको जन्नत बक्षे | आमीन🙏"