हार्मोनियम (संवादिनी)
हार्मोनियम हे वाद्य पाश्चात्य वाद्य असूनदेखील भारतामध्ये लोकप्रियता प्राप्त झालेले वाद्य आहे. भारतीय वाद्य वर्गीकरण पद्धतीमध्ये या वाद्यांचा समावेश सुषिर वाद्य प्रकारात होतो.सध्या प्रचलित असलेल्या हार्मोनियम या वाद्याची निर्मिती फ्रान्सच्या अलेक्झांडर डॅबिन याने १८४० मध्ये केली. पाश्चात्य संगीतामध्ये हार्मनी हे तत्त्व प्रामुख्याने येत असल्याने हार्मोनियम हे नाव त्यास अनुकूल आहे. म्हणून या वाद्यास हार्मोनियम हे नाव दिले आहे.हार्मोनियम रचना
(१) कॅबिनेट - कॅबिनेट हे लाकडी फळ्यांपासून तयार केलेली लाकडी मंजूषा किंवा पेटी असून ते लाकूड सिसम, देवदार, सागवान अथवा तून या लाकडापासून तयार केलेले असते. या खोक्याचे बूड पातळ सागवानी फळी किंवा देवदाराच्या फळीपासून बंद केलेले असते. या फळीवर स्वर दाब लक्षात घेऊन २ किंवा ३ स्प्रिंग बसवतात. त्यावर हार्मोनियमचा पोटभाता बसवतात. या भात्यावर खोक्याच्या मापाची एक फळी बसवलेली असते. या फळीला चार-पाच मोठी छिद्रे असतात. या छिद्राला लाकडी झडपा बसवून एका बाजूने त्या पातळ चामड्याने पक्क्या करतात. या पेटीच्या दर्शनी भागात स्टॉपर्स बसवतात. त्यामुळे आतील झडपांमध्ये ते लांब सळ्यांद्वारा उघडतात. हार्मोनियमच्या मागील बाजूस साधा भाता, दुहेरी भाता, किंवा चार पाच घड्यांचा भाता असतो.
(२) स्वर फलक - खोक्याच्या वरच्या बाजूला स्वर फळीच्या चौकटीचे अाच्छादन असते. या चौकटीचे दोन भाग करण्यात येतात. भात्याच्याबाजूने २-३ किंवा ३-४ छिद्रे आवश्यकतेनुसार पाडतात.
(३) स्वरपट्ट्या - पेटीच्या पुढच्या बाजूने या फलकांवर डावीकडून उजवीकडे स्वरपट्ट्याची ओळ केलेली असते. या स्वर पट्ट्यांवर एक लांब लाकडी पट्टी बसवलेली असते. या पितळी स्वरपट्ट्यास्वरफळीवरच्या छिद्रांवर घट्ट बसवतात. या ताणाची हालचाल स्प्रिंग पट्टीप्रमाणे होते. पट्टीदाबली असता छिद्रावरून ती वर उचलली जाते. बोट उचल्यावर ती पूर्ववत होते.
(४) रीड किंवा सूर - रीडवर हवेचा दाब पडल्याने हार्मोनियममधून आवाज उत्पन्न होतो. त्यामुळे रीड हा भाग अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. उंचीप्रमाणे, घनतेप्रमाणे खर्ज, नर; मादी असे स्वरांचे प्रकार पडतात. रीड हे पितळेचे किंवा ब्राँझ धातूचे केलेले असतात. एका पितळी चौकटीवर पितळेची अंक पट्टी एका बाजूला घट्ट बसवलेली असते. तिचे दुसरे तोंड मोकळे ठेवलेले असते. हवेचा दाब रीडवर पडल्याने ही पट्टी आंदोलित होते व आवाज उमटतो. या रीडच्या गुणवत्तेप्रमाणे हार्मोनियमची गुणवत्ता किंवा किंमत ठरते.
(५) फिंगरबोर्ड किंवा कीबोर्ड - स्वरपट्ट्यांना कीबोर्ड म्हणतात. या दोन प्रकारच्या पट्ट्या असतात (१) काळ्या पट्ट्या (२) पांढऱ्या पट्ट्या. या रुंदीने कमी असून किंचित वर आलेल्या असतात. यावरून काळी १, काळी २, काळी ३, काळी ४ आणि काळी ५ म्हणण्याची पद्धत रूढ झालेली आहे.त्याप्रमाणे पांढरी १ ते पांढरी ७ अशा या पट्ट्यांची संख्या असते. एका सप्तकात काळ्या पाच व पांढऱ्या सात अशा एकूण १२ स्वरपट्ट्या असतात.वादन पद्धती वास्तविक हार्मोनियमवर वाजवले जाणारे स्वरसप्तक हे टेम्पर्ड किंवा समांतर स्वरसप्तक असते. त्यामुळे ते भारतीय स्वरसप्तकाच्या दृष्टीने सदोष मानतात. तरीसुद्धा अत्यंत सोयीस्कर वाद्य म्हणून हे वाद्य नवशिक्या तसेच ज्येष्ठ कलाकारांपर्यंत सर्वांच्याच दृष्टीने उपयुक्त असे आहे. या वाद्यातील रीडस हे योग्यतऱ्हेने होण्यासाठी ते तज्ज्ञ/कुशल व्यक्तीच्या हस्ते घर्षण करतात. याला ‘ट्यूनिंग’ म्हणतात.सामान्यतः डाव्या हाताने हार्मोनियमचा बाहेरील भाता समप्रमाणात ओढून हवेचा भरणा करतात व त्याप्रमाणे बोटांच्या कुशलतेनुसार हार्मोनियम वादन केले जाते.
काही हार्मोनियम कलाकार - पं. गोविंदराव टेंबे, पं. आप्पाजळगावकर, पं. गुंडोपंत वालावलकर आणि पं. मनोहर चिमोटे असे अनेक हार्मोनियम वादक पुढे कलाकार म्हणून प्रसिद्ध झाले.