संगीत आणि शिक्षण

0

 
संगीत शिक्षण

संगीत आणि शिक्षण

                        आज जग जवळ आल्यामुळे संगीताचा अथांग सागर पसरलेला आपल्याला दिसतो. यामध्ये पाश्चात्य संगीत, लोकसंगीत ,शास्त्रीय संगीत, पाश्चात्य शास्त्रीय संगीत, सिनेमा संगीत, कराओके संगीत, परीक्षा संगीत असे अनेक प्रकार येतात. अजूनही आपल्या भारतात शास्त्रीय संगीताचा प्रसार हवा तसा झालेला आपल्याला दिसत नाही. विशिष्ट संगीत प्रिय असणारे विशिष्ट असे जनसमूह आपल्याला पहायला मिळतात. 

                        आज-काल कराओके संगीताचा विशेष प्रचार होताना आपण बघत असतो. जास्तीत जास्त सुलभ रीतीने स्वतःला लोकांसमोर पेश करण्याची संधी प्रत्येक जण पहात असतो. यामागे त्याचा जरा सुद्धा विचार दिसत नाही. आपल्याला कितपत स्वरात आणि तालात गाता येते, हे सुद्धा पाहिले जात नाही. आजकाल लवकरात लवकर आणि सहज अशी प्रसिद्धी प्रत्येकाला हवी असते. यामागे त्या व्यक्तीचा एक अहंकार दडलेला असतो. लोक त्याच्या एफबी आणि व्हाट्सअप वरच्या पोस्टला लाईक करतात, आणि त्याचा अहंकार सुखावला जातो. परंतु अहंकार सुखावण्यासाठी संगीत आहे का याचा आपण खोलात जाऊन विचार केला पाहिजे. संगीत हे मनशांतीसाठी असते हे आज संपूर्ण जग विसरले आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमात मोठमोठ्या स्टेजवर आपल्याला सादरीकरण करता यावे , यासाठी अनेक छोटे मोठे, हौशी गौशी, नवोदित, होतकरू असे कलाकार प्रयत्न करत असतात. अर्थात त्यांना हवे असतात श्रोते. परंतु आज संगीत शांतपणे ऐकण्यासाठी श्रोत्यांना देखील वेळ नसतो. कारण आजच्या अत्यंत गतिमान अशा आयुष्यामध्ये चार क्षण चांगले संगीत ऐकण्यात घालवावे असे काहीच जणांना वाटत असते. परंतु बरेच जण आपल्या व्यस्त वेळापत्रकामुळे कलांना ( म्हणजेच संगीत, चित्रकला, शिल्पकला, रचनाशास्त्र आणि काव्यकला यास वेळ देऊ शकत नाहीत. त्यांना हे कळत नाही की आनंद कशात आहे ? सर्वजण आनंदासाठी अक्षरशः जीवाचे रान करत असतात. परंतु आनंद कशात आहे हे फारच थोड्या लोकांना माहीत असते.

                          खरा आनंद आणि मनःशांती ही कलास्वादामुळे मिळते हे बऱ्याच लोकांच्या ध्यानीमनी सुद्धा नसते. बाहेर फिरायला जाणे, अपेय पान करणे, तीर्थक्षेत्राला भेटी देणे, मोठमोठ्या मिरवणुकातून सामील होणे, वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या मोर्चामध्ये सामील होणे, यातच आनंद आहे असे त्यांना वाटत असते. परंतु जेव्हा ते चांगलं संगीत ऐकतात, चांगले चित्र पाहतात, चांगलं शिल्प पाहतात , चांगलं काव्य वाचतात आणि ते समजावून घेतात, त्यावेळी त्यांचे मन एक नवीन रम्य आणि आनंददायी प्रदेशात गेल्यामुळे आनंदित होते. शरीराला आणि मनाला आलेली मरगळ निघून जाते. आजकाल चांगले संगीत कोणते आणि वाईट संगीत कोणते याची निवड करायला सुद्धा माणसाला वेळ नसतो. आजकाल मेलडी असणारी अतिशय सुंदर अशी लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी, मुकेश, मन्ना डे, हेमंत कुमार, किशोर कुमार, सुमन कल्याणपुर, उषा मंगेशकर अशा महान गायिका गायक आणि गायलेली गाणी ऐकणे आजकालच्या पिढीच्या नशिबी आहे असे मला वाटत नाही. कारण आजकाल ऐकण्यापेक्षा ते सादर करण्यामागे(गाण्याकडे) जास्त कल दिसतो.  ते गाणे मी सुरा तालात जातो की नाही हे बघण्यासाठी कोणाला वेळ नसतो. जसे येईल तसे लोक गातात. आता तर काही ठिकाणी स्वतः पैसे मोजून सुद्धा लोक अशा कराओकेच्या भव्य कार्यक्रमात गातात आणि आपला अहंकार सुखावतात. अनेक प्रकारचे संगीत आपल्या कानावर आदळत असल्यामुळे त्यातले कोणते ऐकावे आणि कोणते सोडावे हा सुद्धा एक मोठा यक्षप्रश्न असतो.

                            यातील काही मुद्दे लिहिण्याचा मी प्रयत्न करणार आहे. शास्त्रीय संगीत हे मनशांती देणारे आणि शारीरिक आणि मानसिक रोगांवर उपचार करण्याचा प्रयत्न करणारे असे संगीत आहे. परंतु फक्त ऐकणे असे हल्ली होत नाही. ऐकल्यावर ते समजले देखील पाहिजे असे अनेकांना वाटते. परंतु नुसत्या ऐकण्याने सुद्धा आपल्या मनाला आणि शरीराला एक प्रकारचा दिलासा मिळतो हे कोणीतरी जनमानसांना समजावून देण्याची गरज निर्माण झाली आहे. जे मी ऐकतो ते मला समजते असे नसते. बरीच सुगम गाणी ही जटील शब्दांमुळे बऱ्याच लोकांना समजत नाहीत.

                          दुसरा मुद्दा असा की, शास्त्रीय संगीत हे राग संगीत असल्यामुळे आणि ते बसून सादर केले जात असल्यामुळे, आणि त्याला फक्त पेटी आणि तबला ही दोनच वाद्य साथीसाठी असल्यामुळे, या गाण्याला दृक श्राव्य इफेक्ट मिळत नसल्याचे सांगून अनेक दूरदर्शन वाहिन्या शास्त्रीय संगीताला सापत्न वागणूक देत आहेत.

                          आजकाल लोकांना जास्त बघण्याची सवय झालेली आहे. ऐकण्यापेक्षा बघणे लोक पसंत करतात. बघण्यामध्ये अनेक वासना, अहंकार हे निर्माण होतात. माणसाला बघणे खूप आवडते. आणि म्हणूनच हल्ली संगीताचे प्रयोग हे सुद्धा जास्त डोळे दिपवणारे असे होतात. श्रोत्यांचे लक्ष लाईट इफेक्ट, अनेक साथीची वाद्ये, परीक्षक यांच्यात विभागले गेल्यामुळे मुख्य गायक काय गातोय हे थोडेसे डोळ्याआड होते. त्यामुळे तो गायक जर स्वराला कच्चा असला किंवा तालाला कच्चा असला, तर ते या सगळ्या देखाव्यात लपून जाते, आज-काल रॅप  संगीताचा प्रभाव सुद्धा खूप वाढत आहे. त्यांना आपण मराठीत बडबड गीते असे म्हणतो. त्यामध्ये फक्त ध्रुव पदाला संगीतात बेतलेले असते. बाकी सर्व एका छंदात किंवा वृत्तांत बद्ध केलेले असते. तो गायक ते काव्य भराभर भराभर म्हणत जातो. यामध्ये शब्दांची योजना सुद्धा आजकाल अतिशय अश्लील आणि दोन अर्थांची अशी झालेली असते.

                       अर्थात आपण आज शास्त्रीय संगीताचा प्रसार झाला पाहिजे असे म्हणतो. परंतु ही सगळी आक्रमणे म्हणण्यापेक्षा विविध संगीताची झालेली गर्दी हटवून, त्यातून एक अतिशय चांगलं असं संगीत निवडून, ते लोकांना ऐकवणे, यामध्ये संगीत विषयक कार्यकर्त्यांनी कार्य करणे खूप आवश्यक आहे.

                           जे आपल्या भारतीय संस्कृतीला उंचावेल, जे आपल्या लोकांची मूळ आवड जपेल, असं संगीत आपण जपलं पाहिजे. दुसऱ्या संगीताचा प्रभाव किंवा दुसऱ्या संगीताची गुलामगिरी आपण स्वीकारता कामा नये. तेही लोकांना ऐकू द्या. पण त्याचे वर्चस्व आपल्या संगीतावर होऊ देऊ नका. आज आपल्या देशात आपली संस्कृती संवर्धन करण्याचं काम विशेष कोणी करताना दिसत नाही. सगळीकडे इंग्लिश, इंग्लिश याचा नारा घुमत आहे. संगीत हे सुद्धा आजकाल इंग्लिश होत चालले आहे. सर्व खाजगी मोठमोठ्या शाळातून आपले शास्त्रीय संगीत शिकवले जात नाही. तर त्या शाळांमध्ये गिटार सिंथेसायझर ही वाद्ये आणि विविध इंग्लिश गाणी शिकवली जातात. ह्या विरुद्ध कोणीही आवाज उठवत नाही. 

                            अनुदानित शाळांना संगीत शिक्षक ठेवणे तेवढे परवडत नाही. कारण त्यांच्या लेखी संगीत हे जीवनावश्यक नाही. जीवनाला आवश्यक अशा गोष्टींचे शिक्षण या संस्था आवर्जून देत असतात. संगीत ही कला भारतीय संस्कृतीचे एक अविभाज्य अंग आहे हे मला वाटते कोणालाच माहीत नाही. आपल्याला जर आपली संस्कृती टिकवून धरायची असेल तर शाळेमध्ये संगीत, योगा आणि आयुर्वेद त्याचप्रमाणे थोर विचारवंतांचे छोटे छोटे विचार शिकवणे जरुरीचे आहे. त्याचप्रमाणे संस्कृत श्लोक, मनाचे श्लोक, रामरक्षा सारखी स्तोत्र ही सुद्धा शिकविली गेली पाहिजेत. तरच आपली भारतीय संस्कृती टिकेल असे मला वाटते.

                            आज बऱ्याच खेडोपाड्यातून संगीत म्हणजे भजन आणि कीर्तन असे समजले जाते. तर कित्येक ठिकाणी लावणी, पोवाडा असे लोकसंगीत म्हणजेच संगीत असेही समजले जाते.अर्थात लावणी, पोवाडा, भजने या गोष्टी संगीतात मोडतात. परंतु स्वराधिष्ठित संगीत म्हणजेच आपले अभिजात भारतीय संगीत याची पुसटशी कल्पना सुद्धा बऱ्याच लोकांना नसते. खरंतर घराघरातून स्वराधीष्टीत संगीत शिकवले गेले पाहिजे. स्वराधीष्टीत संगीत शिकवणे हा एक सुसंस्कार आहे असे प्रत्येक घरातील व्यक्तीला पटायला हवे. बारा स्वरांमधील अतिशय सुंदर असे संवाद, मनाला एक वेगळाच स्वरानंद देऊन जातात, हे मुलांच्या मनावर बिंबवले गेले पाहिजे. यासाठी सर्व संगीत जाणकारांनी, संगीत शिक्षकांनी आपल्या परीने प्रयत्न केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या स्वराधीष्टीत संगीताचे महत्त्व आपल्या राज्यकर्त्यांना पटवून दिले गेले पाहिजे. सरकारमध्ये असलेले मंत्री, सचिव आणि वरिष्ठ अधिकारी यांना सुद्धा स्वराधीष्टीत संगीताचे महत्त्व काय याची  कल्पना दिली गेली पाहिजे. आधी सर्व सरकारी अधिकाऱ्यांमध्ये आणि मंत्र्यांमध्ये स्वराधीष्टीत संगीताचे महत्त्व पटवणारी शिबिरे आयोजित करणे महत्त्वाचे ठरते. जर राज्यकर्त्यांना संगीताचे (म्हणजेच स्वराधिष्ठ संगीताचे) महत्त्व पटले , तर ते प्रत्येक शाळेतून हा विषय सक्तीचा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतील. त्यांना जर याविषयी काहीच कल्पना नसली, तर ते सुद्धा संगीत म्हणजे लावणी, पोवाडा आणि भजने असे आहे असे वाटून, संगीत हे मनोरंजनाचे एक चांगले साधन आहे असे म्हणून संगीत विषयाकडे कानाडोळा करतील. आपले भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून , त्यात, आजच्या काळात अत्यंत दुर्मिळ झालेली मनशांती आणि रोगमुक्त जीवन मिळवून देणारी, अशी एक स्वर ऊर्जा असते, हे सुद्धा पटवून द्यायला हवे. शिवाय आपल्या भारतीय अभिजात संगीताला कुठल्याही धर्माचा दर्प येत नाही.  हे केवळ सूर आणि तालांचे संगीत असल्यामुळे, सर्व जाती धर्माचे लोक हे संगीत गाऊ शकतात. हे सुद्धा राज्यकर्त्यांना पटवून देणे गरजेचे आहे.यासाठी सामान्य शिक्षकांवर भार न टाकता, मोठमोठ्या गायक वादक कलाकारांनी ही जबाबदारी उचलली पाहिजे. कारण त्यांची ओळख, ही राज्यकर्त्यांमध्ये विशेष असते. राज्यकर्त्यांना हे मोठमोठे कलाकार चांगल्या रीतीने आपल्या भारतीय अभिजात संगीताचे महत्त्व पटवून देऊ शकतील, असे मला वाटते. ज्याप्रमाणे चित्रकला, शिल्पकला यासाठी शहरा शहरातून मोठमोठी कॉलेज आहेत , त्याप्रमाणे प्रत्येक शहरातून भारतीय अभिजात संगीत शिकण्यासाठी शाळा कॉलेजची सोय सरकारकडून करून दिली गेली पाहिजे. संगीत शिकवणाऱ्या शिक्षकांना पदोन्नती, पगार, इत्यादी इतर सामान्य शिक्षकांना मिळतात त्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजेत. यासाठी मोठमोठ्या श्रीमंत अशा उद्योगपतींनी, इमारत व्यवसायिकांनी आर्थिक सहाय्य केले पाहिजे. यासाठी असंख्य संगीत प्रेमींनी, संगीत शिक्षकांनी, संगीत विचारवंत आणि जाणकारांनी,l लेखकांनी प्रयत्न करणे अत्यंत जरुरीचे आहे. कोणा एका विशिष्ट समूहाची ही जबाबदारी नाही. सर्वांनी जर मिळून, सहकार्याने अभिजात संगीत जागृती केली तर हे काम अवघड आहे असे मला वाटत नाही.

                                              -श्री.किरण फाटक सर


संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए नीचे दिए गए सोशल मीडिया बटन पर क्लिक करके अभी जॉईन कीजिए।

संगीत की हर परीक्षा में आनेवाले महत्वपूर्ण विषयोंका विस्तृत विवेचन
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now
Please Follow on FacebookFacebook
Please Follow on InstagramInstagram
Please Subscribe on YouTubeYouTube

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top