वारकरी संगीताचे शिक्षण घेण्याची राज्यात प्रथमच संधी
भारतीय संगीत कलापीठातर्फे अभ्यासक्रम तयार
महाराष्ट्राची प्राचीन आणि समृद्ध परंपरा असलेल्या वारकरी संगीतात करिअर करू इच्छिणाऱ्यांना आता या कलेचे अधिकृत शिक्षण घेता येईल. त्यासाठी राज्यात पहिल्यांदाच भारतीय संगीत कलापीठामार्फत वारकरी संगीतावर आधारित सुलभ अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. हे अभ्यासक्रम चालवण्यासाठी राज्यातील वारकरी शिक्षण संस्था व विविध संगीत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना संलग्नीकरण मिळणार आहे. अधिकाधिक संस्थांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन कलापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.राहुल आघाडे यांनी केले आहे. अन्य राज्यांप्रमाणे वारकरी संगीताचा सुसंगत अभ्यासक्रम आणि त्यास प्रमाणित करणारी संगीत संस्था महाराष्ट्रात उपलब्ध नव्हती. ही बाब ओळखून शासनाकडे नोंदणीकृत असणारे भारतीय संगीत कलापीठ यांनी हा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पारंपरिक वारकरी चालींचे मोफत प्रशिक्षण वारकरी संगीत परंपरा व संतसाहित्याचा प्रचार प्रसार हे कलापीठाचे मुख्य उद्दिष्ट आहे. कोणत्याही वयोगटांचे संगीत साधक मोफत प्रशिक्षण व अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात . अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर संगीत भजन विशारद, मृदंग विशारद ही पदविका व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. शासनाच्या विविध योजनांसाठी ते उपयोगी ठरेल.
२० % अनुदान व संलग्नीकरणाची संधी
वारकरी संगीताचा अभ्यासक्रम राबवण्यासाठी वारकरी संस्थांना मोठी संधी आहे. यासाठी २०% सहाय्यक अनुदान सुद्धा मिळणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज, संस्था संलग्नता आणि परीक्षा केंद्र घेण्याची माहिती जाणून घेण्यासाठी www.omkarsangeet.org या संकेतस्थळाला ऑनलाइन अर्ज उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील नामांकित संस्था आतापर्यंत कलापीठाशी संलग्नित झालेल्या आहे. जास्तीत जास्त संस्थांनी नोंदणी करून वारकरी संगीताचा प्रचार प्रसार करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन कलापीठामार्फत करण्यात येत आहे.