संगीत : संपर्क साधण्याचे प्रभावी माध्यम

0
जीवनात-संगीताचे-महत्व


संगीत : संपर्क साधण्याचे प्रभावी माध्यम


मोबाईलची रिंग वाजली की आपण मोबाईल उचलून कॉल घेतो. इथे मोबाईलची रिंग ही आपल्याला सूचना देते की फोन आला आहे. ही रिंग अनेक प्रकारची असते. ती वेगवेगळ्या स्वररचनांमध्ये असते.

लिफ्ट उघडली की एका विशिष्ठ गाण्याची धून वाजू लागते. लिफ्ट बंद केली की ती वाजायची थांबते. लिफ्ट बंद आहे की लिफ्टचे दार उघडे आहे याची सूचना आपल्याला मिळते.

दारावरची बेल सुद्धा संगीतमय असते. ती बेल आपल्याला कुणीतरी आल्याची खबर देते. इन्व्हर्टर मधली बॅटरी संपली की तोसुद्धा विशिष्ठ स्वरमलिकेतून आपल्याला संदेश देतो.

याचप्रमाणे वॉटर प्युरिफायर,वॉशिंग मशीन यातही विशिष्ठ संदेश देण्यासाठी विशिष्ठ स्वरावलिंचा उपयोग केलेला आढळतो.
Ambulance चा सायरन आपल्याला एक संदेश देतो व सर्व वाहने त्या ambulance ला पुढे जाण्यासाठी वाट करून देतात. हा सायरन म्हणजे दोन किंवा तीन स्वरांची एक विशिष्ठ आवाजातील स्वरावलीच असते.

देवळातील घंटेचा गंभीर स्वर आपल्याला पावित्र्याचा संदेश देतो. सध्या नामजपाची इलेक्ट्रॉनिक यंत्रे निघाली आहेत. एक नामजप बराच वेळ सुस्वरात चालू रहातो व वातावरण मांगल्याने भरून जाते.

सिनेमातील एखादे गाणे कथानक पुढे नेण्यास उपयोगी ठरते. तर एखाद्या प्रसंगात गडद रंग भरण्यासाठी पार्श्वसंगीताचा उपयोग करतात.

आजकाल राजकीय क्षेत्रात सुद्धा प्रचारासाठी गाणी तयार करतात. त्या गाण्यात राजकीय विचारधारा अथवा निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवाराची स्तुती केलेली आढळते. त्याशिवाय हल्ली लग्नसमारंभात वाद्यवृंद ठेवण्याची प्रथा पडत आहे.

थोडक्यात प्रभावी संपर्क करण्यासाठी शब्दांबरोबर सुरांचीही योजना करण्याकडे लोकांचा कल दिसून येतो.
प्रश्न असा पडतो की या सर्व संपर्क प्रकारात शास्त्रीय/अभिजात संगीत कुठे येते ?

अभिजात संगीत हे शब्दांपलीकडच्या जाणीवा,संवेदना ऐकणाऱ्या पर्यन्त पोहोचविण्यासाठी असते. हे संगीत मनाचा विशिष्ठ मूड बनविण्यासाठी असते.  हा विशिष्ट मूड म्हणजे सर्व भावनांच्या पलीकडे असलेल्या शांतीचा एक अद्भुत अनुभव. जिथे शरीर,ज्ञान,अज्ञान, बुद्धीमत्ता भावना असे काहीच नसते. असते फक्त एक विलक्षण शांती जी सर्व विश्वाला व्यापून असते.
 
सुख , दुःख , आनंद , विरह , क्लेश , वेदना ह्या गोष्टी व त्यांचे मनातील प्रमाण हे दाखविता येत नाही किंवा वर्णन करून सांगता येत नाही. ह्या सर्व मनाच्या विकारवश अवस्था आपल्याला सुगम संगीताच्या माध्यमातून दाखविता येतात. लोकांपर्यंत पोहचविता येतात. लोकही पूनःप्रत्ययाच्या माध्यमातून त्यातून ती भावना पुन्हा जगतात. अर्थात या संगीतातून देखील आनंद निर्मितीच होते.
 
निर्गुणाचा प्रत्यय अथवा निर्गुणाचे दर्शन जेव्हा सगुणातून होते, तेव्हा माणसाला आनंद प्राप्ती होते. सुगम संगीतात स्वर शब्दात प्राण भरतात व शब्दांना बोलके करतात. निर्गुण भावना सगुण करतात व श्रोत्यांना आनंद देतात. आनंद ही देखील मनाची एक निर्गुण अवस्था आहे.

तर शास्त्रीय संगीतात स्वरांच्या तरंगांमुळे  मनाच्या पटलावर उठणाऱ्या लाटा शांत होत जातात व मन एका वेगळ्या शांतीचा अनुभव करते.

थोडक्यात कोणतेही मधुर, संयमित आणि सात्विक संगीत हे वैश्विक शक्तीचे रूप असते. ते रूप आपल्याला स्वरांच्या माध्यमातून जाणवते. वैश्विक शक्तीलाच आपण देव, भगवान  म्हणतो.

म्हणून जर देवाशी संपर्क साधायचा असेल तर संगीतासारखे दुसरे माध्यम नाही. म्हणूनच स्वरांना " सूर "(देव) म्हटले जाते. प्रवाही संगीत हे नेहमी वाहते असते व ते विखुरलेल्या मंगल शक्ती जवळ आणीत असते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top