मानवी जीवन व संगीत

1
मानवी जीवन व संगीत

मानवी जीवन व संगीत
मानवाला मिळालेली उत्तम देणगी म्हणजे संगीत. मानवी संस्कृतीच्या विकासा बरोबरच संगीताचा विकास झालेला आहे. संगीत ही निसर्गातील सुंदर रचना आहे. आज संगीत हे जीवनाचे एक अविभाज्य अंग आहे. रोजच्या घाई-गर्दीच्या आणि कामाच्या धकाधकीच्या, चिंतेच्या वणव्यात
आणि नीरस आयुष्यात चैतन्य आणण्याचे काम करते ते केवळ संगीतच! संगीतामुळे आपले जीवन सुसह्य झाले आहे. भर्तृहरी एका श्लोकात म्हणतात, ‘साहित्य संगीत 
कला विहीनः साक्षात्पशु: पुच्छविषाणहीनः’ याचा अर्थ ‘‘साहित्य, संगीत आणि कला यांचा गंध नसलेली व्यक्तीही शिंगे व शेपटी नसलेल्या पशूसमान आहे.’’ दैनंदिन जीवनात संगीताचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे काही मुद्द्यांच्या आधारे पाहता येईल. 

(१) उपासना व संगीत : विविध जातीधर्मांमध्ये उपासनेसाठी विविध प्रार्थना योजलेल्या असतात.दैनंदिन जीवन जगत असताना या प्रार्थना जर संगीताच्या मदतीने गायल्या तर निश्चितच त्यातून योग्य परिणाम साधला जातो. देवळातील भजन, कीर्तन असेल अथवा मशिदीमधील अजान असेल; गुरुद्वारातील गुरुबाणी असेल किंवा चर्चमध्ये गायल्या जाणाऱ्या प्रार्थना असतील, या उपासनेला सप्तसुरांचा साज चढवलेला असतो. त्यामुळेच आपल्याला त्या अलौकिक शक्तीची अनुभूती येते.

(२) मनोरंजनासाठी संगीत : अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा असल्यातरी त्याला मनोरंजनाचीसुद्धा तेवढीच गरज असते. ‘रंजको राग चित्तानाम्.’ जेव्हा माणसाला कंटाळा येतो, थकवा येतो. अशा वेळी त्यांचा थकवा नाहीसा होऊनचैतन्य निर्माण होते. अशा वेळी संगीतामुळे त्याचे चांगले मनोरंजन होते व तो पुढील कामे व्यवस्थित करू शकतो. अशा प्रकारे मनोरंजनासाठीही संगीत उपयुक्त ठरते.

(३) श्रमपरिहारासाठी संगीत : कष्ट करताना संगीत ऐकले तर कष्टाची जाणीव होत नाही. एखादे कंटाळवाणे काम जर संगीत ऐकत केले तर ते काम लवकर होते. पूर्वी स्त्रिया जात्यावर दळण दळायच्या तेव्हा श्रमाची जाणीव न होण्यासाठी त्या ओव्या गायच्या. शेतकरी विविध कामे करताना वेगवेगळी गाणी म्हणतात. अशा प्रकारे श्रमपरिहारासाठी संगीत हे उत्तम माध्यम आहे.

(४) मन:शांतीसाठी संगीत : या धावपळीच्या युगात हरवलेली मन:शांती पुन्हा मिळवण्यासाठी संगीतासारखे दुसरे माध्यम नाही. आपल्या शरीर व मनावर रोज असंख्य आघात होत असतात. ते सोसण्याचे सामर्थ्य संगीतामुळे प्राप्त होते. संगीतामुळे आपण तहानभूक विसरतो. व्यथा वेदनांचा आपल्याला विसर पडतो. संगीताच्या ध्वनी लहरींमुळे ध्यानधारणा सहज होते. विचलित होणाऱ्या मनाला शांत करण्यासाठी संगीतच उपयुक्त ठरते.

(५) आनंदप्राप्तीसाठी संगीत : माणूस प्रत्येक गोष्ट आनंदासाठी करत असला तरी संगीतातून मिळणारा आनंद हा अलौकिक असतो. संगीतामुळे आनंदाचे चार क्षण आपल्या वाट्याला येतात. काही काळापुरते का होईना आपण दु:ख विसरतो. संगीताच्या सान्निध्यात आल्यानंतर स्थळ काळाचा विसर पडतो. म्हणूनच संगीतातून मिळणारा आनंद हा सुखदु:खांच्या पलीकडचा असतो.

(६) एकाग्रता, स्मरणशक्ती व संगीत : संगीत हा साधनेचा विषय आहे. संगीताची साधना केल्यामुळे एकाग्रता वाढते. यातील स्वर लावणे, स्वरांचा विस्तार करणे, लय - तालांचे प्रकार हाताळणे यांसाठी एकाग्रतेची आवश्यकता असते. त्याचबरोबर संगीत हे सात सुरांवर आधारलेले आहे. संगीताच्या अभ्यासाने पाठांतर क्षमता, ग्रहण क्षमता व स्मरणशक्ती विकसित होते. तसेच तबल्यातील काही बोलही सारखेच असतात. त्यांना विविध तालात व वादन प्रकारात वाजवत असताना एकाग्रता व स्मरणशक्ती वाढते. 

(७) राष्ट्रीय एकात्मता व संगीत : भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या काळात अनेक राष्ट्रभक्तीपर गीतांचा उपयोग झाला. अनेक व्यक्ती जेव्हा समूहाने राष्ट्रभक्तीची गीते गातात तेव्हा सर्वहेवेदावे विसरून त्या एकत्र येतात. त्यांच्यात सामूहिक भावना जागृत होऊन राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागते.
(८) वातावरण निर्मितीसाठी संगीत : शाळेच्या सुरुवातीला मुले प्रार्थना म्हणतात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागतगीत गायले जाते. नाटकाची सुरुवात नांदीने होते. डोंबारी, मदारी व गारुडी आपला खेळ सुरू करण्यापूर्वी विविध वाद्ये वाजवतात. कुस्ती खेळणाऱ्या पहिलवानाला स्फूर्ती येण्यासाठी हलगी वाजवतात. त्यामुळे वातावरण निर्मिती होते.ईश्वरभक्तीचे माध्यम होते पण आज तेच संगीत दैनंदिन, जीवनोपयोगी वस्तूंपर्यंत जाऊन पोहोचले आहे. उत्पादकांना आपले उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आकर्षक जाहिराती कराव्या लागतात. ही जाहिरात संगीतमय असेल तरच त्याचा प्रभाव ग्राहकांवर होतो. अशा प्रकारे संबंधित उत्पादनांची विक्री वाढवण्यासाठी संगीतमय जाहिराती उपयुक्त ठरतात.

(९) निसर्ग आणि संगीत : निसर्ग हा मानवाचा पहिला गुरु! चराचरामध्ये संगीत सामावलेले आहे. 
मानवाने आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी निसर्गातल्या वेगवेगळ्या नादांचे अनुकरण केले. सकाळच्या प्रहरी सुटलेल्या गार वाऱ्याचे गुंजन, झऱ्याचा खळखळाट, पक्ष्यांचा किलबिलाट, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, हृदयाची स्पंदने, नाडीचे ठोके यातून संगीताची अनुभूती येते. कदाचित यातूनच पुढे गायन, वादन व नृत्याची सुरुवात झाली असावी. थोडक्यात संगीत हाच मानवी जीवनाचा आधार आहे. संगीत हे सागराप्रमाणे अथांग आहे. संगीत साधनेसाठी आयुष्य अपुरे पडेल. म्हणून या संगीताचा आनंद घेऊन आपले जीवन सुसह्य व आनंदी करूया.

अपने संगीतप्रेमी दोस्तों में शेअर करें । संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए हमारा फेसबुक पेज Sangeet-Jagat को लाइक कीजिए और हमसे व्हाट्स ऐप पे जुड़े रहने के लिए यहाँ क्लिक करे

एक टिप्पणी भेजें

1 टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top