ओळख भारतीय शास्त्रीय संगीताची
भारतीय संगीताची व्याख्या करतानाच गायन, वादन आणि नृत्य हे तिन्ही मिळून
संगीत होते असे म्हटलेले आहे. भरतमुनींच्या काळापासूनच इ. स. पू. चारशे पाचशे
वर्षांपासून ही व्याख्या शास्त्रकारांनी मान्य केलेली आहे, आणि नाट्य हा नृत्याचाच भाग
मानला गेला आहे.
संगीत ही कला समाजाशी अनेक स्तरांवरून संबंधित आहे. समाजात होणारे बदल,
माणसांची राहणी आणि राहणीमान, समाजात प्रसृत होणारे आधुनिक किंवा सनातनी विचार इत्यादीमुळे संगीतही
बदलत गेले आहे. प्रत्येक कलेची आपली अशी खास परंपरा असते. कसोशीने कमी अधिकपणे पाळण्याचे नियम
वा दंडक घालून दिलेले असतात.
एकंदरीत कंठ आणि वाद्यसंगीतात जवळपास पन्नास पेक्षाही अधिक प्रकारांची मोजदाद करता येते. तरी देखील
मैफिलींमध्ये सादर करण्यायोग्य प्रकारांचा विचार केल्यावर त्यांची संख्या कमी होते. सामवेदापासून सुरू झालेले
गायन भरतनाट्यशास्त्राच्या काळापर्यंत जाती गायन करीत होते. शास्त्रीय गायनातील राग गायन कल्पना बृहद्देशीच्या
सातव्या शतकातील ग्रंथात प्रथमतः उल्लेखित झालेली दिसते. भरताच्या काळाचे जाती गायन रागापर्यंत परिवर्तित
होत गेले. शास्त्रीय गायनाच्या काळाच्या पहिल्या टप्प्यात जातीगायनाचे परिवर्तन विकास रागगायनापर्यंत येऊन
पोहोचले. ९ वे शतकात धृपदाच्या साचेबंद गायकीला
कंटाळलेल्या संगीत रसिकांनी ख्यालाचे जंगी स्वागत
केले.
प्रबंध : धृपद, धमार ही गायन शैली प्रचारात येण्यापूर्वी
हा गीतप्रकार प्रचारात होता. प्रबंध याचा अर्थ स्वर
तालयुक्त रचना असा मानला जातो.
धृपद : धृपद या शब्दाचा शब्दश: अर्थ पक्के, स्थिर
आणि कडवे, स्थळ होतो. धृवपद या
संज्ञेचा अर्थ काव्यात आणि पद्यशास्त्रात गीताचे धृपद
असाही अर्थ होतो. भारतीय संगीतात ख्यालगायकी
प्रचार पावण्यापूर्वी भारतीय संगीत धृपद-धमार गायकीत
समावलेले होते. धृपदाचे काव्य वीर, शृंगार, शांत
रसाला पोषक होते. मर्दानी आवाजात जोरदार पद्धतीने
गायन होई.
बैजूबावरा, गोपाल नायक, तानसेनासारखे
आख्यायिकांचे नायक धृपदाचे मुख्य गायक होते.
ग्वाल्हेरचा राजा मानसिंग, स्वामी हरिदास यांचीही नावे
धृपद गायक म्हणून घेतली जातात.
धृपद गायनात चौताल, सूलफाक्ता, झपताल,
ब्रम्हताल, रुद्रताल वापरतात. तालासाठी पखवाज
हे वाद्य वापरतात. धृपदात ताना नसतात. अस्ताई,
अंतरा, संचारी, आभोग हे चार भाग असतात. भारतीय
संगीतात गेले १५० ते २०० वर्षांत ख्याल गायकी
प्रचारात पावली. आज रागसंगीताचे गायन ख्यालगायन
शैलीने व्यापून टाकले आहे.
धमार : धृपदानंतर सादर होणाऱ्या एका कंठसंगीत
प्रकाराचे नाव आहे. अंगभूत द्रुत चलन असलेल्या
धमार तालात, १४ मात्रांमध्ये, पखावज वाद्यावर
सादर होणाऱ्या या गीतप्रकाराची गायनाची पद्धती
धृपदासारखीच असते. मात्र धृपदाइतके गंभीर नसते.
धमाराचे काव्य शृंगाररस पोषक असते. लयीचे विविध
प्रकार व बोलतानांच्या अंगाने गायन यांचे वैशिष्ट्य
होय.
सादरा : दहा मात्रांच्या झपतालात सादर होणारे धृपद
असेच या गीत प्रकाराचे वर्णन होय.
लंगडा धृपद : नावात सुचवल्याप्रमाणे या गीतप्रकारात
धृपदाला पंगू केलेले असते. धृपदाचा ताठरपणा आणि
ख्यालाचा लवचीकपणा याच्या मधला गीतप्रकार
म्हणजे हे संगीत होय.
ख्याल : साधारणत १५व्या शतकात जौनपूरच्या
बादशहा सुलतान हुसेन शर्की याने ख्यालगायकी प्रथम
प्रचारात आणली. आपल्या कल्पनेप्रमाणे रागनियमांचे
पालन करून विविध आलाप-तानांचा विस्तार
करतांना एकताल झुमरा, त्रिताल, आडाचौताल
इत्यादी तालांत ख्यालगायन केले जाते. ख्याल दोन
प्रकारचे असतात. (१) विलंबित लयीत जे ख्याल
गायले जातात, त्यांना विलंबित ख्याल असे म्हणतात.
(२) जे द्रुतलयीत गायले जातात त्यांना छोटाख्याल
असे म्हणतात.
ख्याल नुमा : पर्शियन भाषेत नुमा म्हणजे च्याप्रमाणे.
अर्थातच ख्यालनुमा म्हणजे ख्याल प्रमाणे ख्यालातील
अर्थपूर्ण शब्दांची जागा ज्यात अर्थहीन ध्वनीनी घेतलेली
असते. अशा रचनांचा निर्देश या संगीत प्रकाराने होतो.
तराणा : अमीर खुसरो (इ.स. १२५३-१३२५) यांनी
फारसी रुबाई आणि अर्थहीन ध्वनी यांची सांगड घालून
तराणा सिद्ध केला. तराणा मुख्यत: अर्थहीन ध्वनीवर
अवलंबून राहाणारा कंठसंगीताचा एक महत्त्वाचा
प्रकार होय.
त्रिवट : अर्थहीन शब्द/ध्वनी वापरून सिद्ध होणारा
आणखी एक संगीत प्रकार म्हणजे त्रिवट होय.
याची रचना राग व तालात असून शब्दांऐवजी यात
पखवाजाच्या बोलांची योजना केलेली असते. रचनेची
द्रुतलय व पखवाज, पटहाचे दणदणीत बोलामुळे विशेष
प्रभाव पडतो.
रास : राग व ताल यांत रचना बांधताना ज्यात कथ्थक
नृत्यातील बोलांचा वापर केलेला असतो, त्या संगीत
प्रकारास रास म्हणतात.
चतरंग : ख्याल, तराणा, सरगम व त्रिवट अशी चार
अंगे ज्या गीतात समाविष्ट असतात. त्याला चतरंग
म्हणतात. पहिल्या भागात गीत, दुसऱ्या भागात
तराण्याचे बोल, तिसऱ्या भागात रागाची सरगम
आणि चौथ्या भागात मृदंगाचे बोल असतात. चतरंग
ख्यालाप्रमाणे गातात. परंतु यात ताना नसतात.
सरगम : एखाद्या विशिष्ट रागात वापरल्या जाणाऱ्या
स्वरांची संक्षिप्त नावे, सा रे ग म च्या साहाय्याने
केलेली संगीत रचना म्हणजे सरगमगीत होय.
अष्टपदी : मध्ययुगात बंगालमधील जयदेवाने
क्रांतिकारी नृत्य नाट्य रचले. आठ ओळी असल्याने
अष्टपदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गीतगोविंदाची
बांधणी झाली होती. ग्वाल्हेरच्या गायकांनी १९ व्या
शतकात कंठसंगीत प्रकार म्हणून पुन्हा प्रचारात आणले.
जयदेवाचे लालित्यपूर्ण कवित्व आणि शिष्टसंमत पण
परम कोटीचा शृंगार हे या प्रकाराचे वैशिष्ट्य होय.
विशिष्ट ताल व राग वापरून या बंदिशी तयार झाल्या.
या प्रकरणात हिंदुस्थानी संगीताची घडण, संगीत
प्रकाराच्या तपशीलवार विवेचनातून शास्त्रीय संगीताची
थोडक्यात ओळख झाली असेल.
अपने संगीतप्रेमी दोस्तों में यह लेख अवश्य शेअर करें । संगीत जगत ई-जर्नल आपके लिए ऐसी कई महत्त्वपूर्ण जानकारियाँ लेके आ रहा है। हमसे फ्री में जुड़ने के लिए हमारा फेसबुक पेज Sangeet-Jagat को लाइक कीजिए और हमसे व्हाट्स ऐप पे जुड़े रहने के लिए यहाँ क्लिक करे।