अभिजात रागसंगीत
शेकडो वर्षे टिकतो तो "संस्कार"...
आणि
अचानक उगवते ती "कावळ्याची छत्री"
काळाच्या ओघात जे दीर्घकाळ ‘टिकते’ त्याला संस्कार म्हणतात. आजवर असे बरेच संस्कार अभिजात रागसंगीताचा प्रसार करताना अनेक गुरुजनांनी अनेकांवर, अनेक प्रकारांनी केले आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे रागवर्गीकरण पद्धती समजवून सांगणारी "थाट"पध्दती. रागांचा स्वभाव ओळखू येण्यास कामी येणारे सोपे साधन म्हणजे "थाट"पद्धती. थाटपद्धतीच्या आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या भारतीय रागांवर या 'थाट' पद्धतीने काही वेगळा संस्कार केला का ? तर या प्रश्नाचे उत्तर "नाही" असे द्यावे लागते; पण मग "या संस्कारामुळे भारतीय रागांचा स्वभाव ओळखणे सोपे झाले का ?" या प्रश्नाचे उत्तर मात्र "होय" असे द्यावे लागेल. एखाद्या क्षेत्रात असे गोंधळ उडविणारे प्रश्न निर्माण करणे फारसे अवघड नाही. पण ते साधकाच्या जिज्ञासेला धरून आहेत का ? हे देखील तपासून पाहिले पाहिजे. "थाट आधी की राग आधी?" या प्रश्नांपेक्षाही "थाट" पद्धतीमुळे रागांचे अस्तित्व आणि स्वभाव समजणे सोपे झाले" हे जास्त महत्त्वाचे आहे. थाटपद्धतीची ज्ञानपक्षातून जिज्ञासा करणे सोडून, गुणी कलाकारांकडूनच पं. विष्णू नारायण भातखंडे प्रणित 'दशथाट' पद्धतीची सध्या सोशल मीडियावरून जी खिल्ली किंवा टिंगल उडविली जाते आहे त्यातून व्यथित होऊन लिहिलेला हा लेख... अर्थातच, दहा थाटांचा "थाट" जपणाऱ्यांसाठी आणि तो न जपणाऱ्यांसाठीही ...
पंडित व्यंकटमखींसारख्या महान विद्वानाने दाक्षिणात्य रागसंगीताचे वर्गीकरण करताना ते राग ७२ थाटांमध्ये बसवून बुद्धिजीवी संगीत जगतावर फार मोठे उपकार केले आहेत. त्यांचे हे संशोधन गणिती पद्धतीनुसार अतिशय नेमके, सुसंबद्ध आणि असंदिग्ध आहे हेही निर्विवाद. परंतु या संशोधनानंतरही, उत्तर भारतीय संगीत शिकणारा एक मोठा वर्ग असा होता जो रागवर्गीकरणाची ही बौद्धिक गुंतागुंत पचवू शकत नव्हता. या वर्गाला रागांचा स्वभाव समजावून सांगण्यासाठी त्या रागांचे वर्गीकरण सोप्या पद्धतीने कुणीतरी जाणकाराने करणे आवश्यक होते. ही जबाबदारी पं. वि.ना. भातखंडे यांनी स्वीकारली होती हे सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे. संगीत शिकू पाहणाऱ्या नवसाधकांनी 'थाट' आणि 'राग' या संकल्पनांचे नेमके आकलन कसे करून घ्यावे? असा मोठा प्रश्न तत्कालीन संगीत प्रसारकांपुढे होता. या प्रश्नावर चिंतन करून, 'संगीत प्रसाराचा हा मार्ग अधिक सुगम आणि खुला कसा करून देता येईल' या उदात्त भावनेतून पं. विष्णू नारायण भातखंडे यांनी उत्तर भारतीय संगीताच्या बाबतीत एक विशिष्ट वाट आणि त्या वाटेला चौकटही आखली. या वाटेवरून चालणे सर्वसामान्यांनाही सुकर व्हावे, हे त्यांचे सोपे आणि साधे धोरण होते. ते स्वतः उत्तम वकील होते त्यामुळे कायद्याची चौकट आणि नागरिकांचे मानसशास्त्र यावर त्यांची उत्तम पकड होती. याच असमान्य बुद्धिच्या बळावर त्यांनी रागसंगीताच्याही बाबतीत एक धोरण आखले. हे धोरण सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही पटल्यामुळे संगीत जगताने राग ओळखण्यासाठी "थाट" हा सोपा आणि नवा मार्ग "संस्कार" म्हणून मान्य केला. हा संस्कार घेऊनच आजचे संगीत क्षेत्र इतके विस्तारले आहे. एकेकाळी अभिजात संगीत ही फक्त बुद्धीवादी वर्गाची मक्तेदारी होती पण आज सर्वसामान्य माणसालाही भारतीय संगीत आपलेसे वाटते आहे याचे श्रेय पं. भातखंडे यांनाच जाते याबाबत मी अगदी नि:शंक आहे. इतरांनी ते श्रेय त्यांना द्यावे की नाही हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
याच काळात, आणि याच धर्तीवर, पं. विष्णू दिगंबर पलुस्करांनी देखील अभिजात संगीताच्या सुगमीकरणाचे अत्यंत उत्तुंग असे कार्य उभारले. विष्णूद्वयींच्या या अफाट कार्यामुळे एकेकाळी 'अप्राप्य' असलेले संगीत हे आज अनेकांच्या रोजगाराचे साधन झाले आहे. अभिजात संगीत हे कानांपुरते मर्यादित होते तोवर त्याची आब राखली जात होती. या आदरातून त्यातील गुणवत्ता आणि दर्जा सरस पातळीवर गेला होता. आकाशवाणीने संगीताला सुगीचे दिवस दाखवले. इथपर्यंत सगळे ठीक चालले होते. परंतु आजच्या विज्ञानयुगाने संगीतक्षेत्रासमोरर एक नवे आव्हान उभे केले. ते म्हणजे संगीत या 'श्राव्य' कलेचा ताबा 'दृश्य' माध्यमांनी देखील घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे आता संगीत ही केवळ 'गुरुमुखी विद्या' म्हणून उरली नाही. ते सेवा क्षेत्र म्हणावे तर तशीही परिस्थिती नाही. तर ती एका बोटाच्या क्लिकवर उपलब्ध असलेली एक "बाजारपेठ" झाली आहे असेे नाइलाजाने म्हणावे लागते. याला अपवाद जरूर आहेत परंतुुु फार मोजके. 'बाजारपेठ' म्हटली की ती 'ग्राहकाभिमुख' ठेवावी लागते कारण "कमाई" हे तिचे अंतिम उद्दिष्ट असते. शिवाय 'मागणी तसा पुरवठा' हे सूत्र त्यात आलेच. गुरुमुखी विद्या ही मात्र या बाजारपेठेपासून जरा दूर असते. त्या विद्येत मागणी आणि पुरवठ्यापेक्षा योग्यतेला जास्त महत्त्व असते. ही विद्या बाजारपेठेत विकता येत नाही, आणि विकतही घेता येत नाही. आधी ती कमवावी लागते, मग तिचे दान करावे लागते; तरच ती आपोआप वाढू लागते. विद्येचे हे नीतिमूल्य फार थोड्या साधकांनी जाणले आणि जपले. पण अनेक लोकांकडून काळाच्या ओघात ते हळूहळू बाजूलाही पडू लागले. 'शिक्षणपद्धती' आणि 'बाजारपेठ' एकत्र आल्यामुळे, घेणाऱ्याला आणि देणाऱ्यालाही संगीत प्रचाराच्या या मूलभूत विचारसरणीचाच विसर पडू लागला. या विचारसरणीच्या कसोटीवर स्वतःला तपासून पाहण्याची ज्याची इच्छा असेल त्याच्याकडून या विद्येचे पावित्र्य जपले जाईल. पण मनाची एक मेख अशीही आहे की एकदा का त्याला उलट्या दिशेने विचार करायची सवय लागली की आधी स्वतःच्या आतमधला 'संस्कार' भ्रष्ट होतो आणि मग तीच व्यक्ती समाजाचाही संस्कार भ्रष्ट करू पाहते. अशीच व्यक्ती वर्णसंकराचे हत्यार उपसू शकते असे काहीसे होऊन दशथाट पद्धतीची निंदा खुद्द प्रतिथयश कलाकारांकडूनच सुरू झाली आहे हे संगीतक्षेत्राचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.
आचार्य विनोबांनी ज्याप्रमाणे गीताईच्या रूपाने गीतेचा 'संस्कार' सामान्य समाजात, सोप्या भाषेत रुजवला, त्याचप्रमाणे चतुर पंडित भातखंडेनी दशथाट पद्धतीचा संस्कार संगीतावर प्रेम करणाऱ्या सामान्य समाजात रुजवला. आता असेही लक्षात घ्या की, ज्याअर्थी ‘दशथाट' हे भारतीय रागांचे जनक आहेत’ हा पं. भातखंडे प्रणित "संस्कार" भारतीय संगीत क्षेत्रात शंभर वर्षांहून अधिक काळ रुजलेला आणि टिकलेला आहे, त्याअर्थी त्या संस्कारात पुढील तीन तथ्ये असली पाहिजेत.
१. मूलभूत तथ्य
२. टिकाऊ तथ्य
३. अनुभवसिद्ध तथ्य
या तिन्ही तथ्यांत 'सत्य' अनुस्यूत आहे. मात्र त्या सत्यापर्यंत 'मला स्वतःला जाता यावे' ही तळमळ 'असणे' वा 'नसणे' ही भूमिका फार वैयक्तिक असते. ती प्रत्येकाला मिळालेल्या ज्ञानसंस्कारावर देखील अवलंबून असते. यातही एक गंमत अशी आहे की, बुद्धिजीवी कलाकारांना अशा प्रकारची जिज्ञासा करावीशी वाटेलच असे नाही कारण ते बुद्धिजीवी असले तरी "कलाकारी तबियत" किंवा कलंदर स्वभावामुळे या जिज्ञासेच्या पलीकडे गेलेले असतात. परंतु एका चांगल्या शिक्षकाला असे करून चालणार नाही. आपला विद्यार्थी हा नेमक्या कोणत्या संस्कारात वाढतो आहे' हे त्याने वेळोवेळी तपासून घेतले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांनीही 'माझ्या शिक्षकाला नेमके काय म्हणायचे आहे' हे समजून घेतले पाहिजे. संगीत क्षेत्रातला एक विद्यार्थी या नात्याने हे मी तपासून पाहिले पाहिजे असे मला वाटले म्हणून हे मनोगत लिहावेसे वाटले. कारण आजचे हे जग माहितीच्या विस्फोटाचे आहे आणि कालपर्यंत माझ्या सुरेल मनावर झालेले संस्कार ही फार नाजूक गोष्ट आहे, ती मला सोशल मीडियावरून मांडता येणार नाही.
कोणताही संस्कार रुजण्यासाठी काहीतरी काळ जावा लागतो. तो समजून घेण्यासाठीदेखील धीर, संवेदना आणि स्वानुभवाची जोड असावी लागते, तेव्हा कुठे तो 'संस्कार' काळाच्या कसोटीवर टिकतो. गायकीच्या बाबतीत तो काळाच्या कसोटीवर तर उतरावा लागतोच परंतु गळ्याच्याही कसोटीवर उतरावा लागतो. असा संस्कार संगीतक्षेत्रावर सुसंस्कृतपणे, संयतपणे, आणि अत्यंत शास्त्रीय प्रामाणिकतेने रुजविणारे पं. विष्णू नारायण भातखंडे हे फार मोठे विद्वान होते. त्यांची राग-वर्गीकरणासंबंधीची दूरदृष्टी काय होती, हे त्यांच्या भारतीय संगीत पद्धतीतील राग-वर्गीकरणावरील ग्रंथांचा विचारपूर्वक आणि अंतर्मुख अभ्यास केल्याखेरीज समजणे कठीणच. एखाद्याने मनात ठरवले तर असभ्य भाषेतून या संस्काराची थट्टाही करता येईल; आणि मनात ठरवले तर सभ्य भाषेत या संस्कारांचा आदरही राखता येईल. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक संस्कारक्षमतेचा प्रश्न आहे.
हा संस्कार समजण्यासाठी "प्रत्यक्ष श्राव्य माध्यम" हे सर्वोत्तम. ते मुळातच फार तरल, सूक्ष्म, आणि ग्रहणक्षम असायला हवे. 'दृश्य' माध्यमांतून समजावून सांगता येईल असा हा मुळी विषयच नाही, कारण आपल्या डोळ्यांना कानांची जाणिव कळत नाही. प्रत्यक्ष श्राव्य संगीत संवाद हा श्रेष्ठ यासाठी की तो 'श्रुती रूपात वरकरणी आपल्या कानांशी, त्यानंतर आपल्या मनाशी आणि त्यानंतर बुद्धीशी संवाद साधत असतो. या संवादातूनच साधकाच्या बुद्धीचे विचारमंथन सुरू होते. या विचारमंथनातून योग्य अर्थनिष्पत्ती झाली तरच चित्त आणि अंतःकरण यांना हा विषय समजू शकतो. पुढे विषय समजल्यानंतर त्याचे अनुभवात रूपांतर होणे हा तर त्याही पुढचा विषय ... असो.
"भारतीय रागांचे वर्गीकरण करण्यासाठी दहा प्रकारचे साचे तयार करणे आणि त्या दहा साच्यांमध्ये जास्तीत जास्त भारतीय राग अचूकतेने सामावून दाखविणे" हा विद्या-विषय गहन आणि किचकट आहे. हिंदीमध्ये "गागर में सागर भरना" असे याचे वर्णन करता येईल. या दहा साच्यांत असंख्य रागांचे रूप, गुणधर्म, आणि स्वभाव सामावून घेणे—हा विषय संगीतशास्त्राच्या अस्तित्वावरील मूलभूत प्रयोग होता. हे शिवधनुष्य केवळ भातखंडे यांनी नव्हे तर भातखंड्यांच्या माध्यमातून प्रकटलेल्या प्रातिनिधिक भारतीय संगीतबुद्धीने उचलले होते. त्यांनी या विषयाला 'शास्त्रीय' आणि 'व्यवहार्य' अशा दोन्ही स्तरांवर भक्कमपणा दिला म्हणून तो 'संस्कार' म्हणून मान्य झाला आणि रुजलादेखिल.
आता हे शिवधनुष्य एखाद्याने मोडून पुन्हा नव्याने पेलण्याचे आव्हान स्वतःच्या खांद्यावर घ्यायला काहीच हरकत नाही—कारण परंपरा जागीच स्थिर राहावी असा तिचा हेतू नसतो; तिला स्वतःला स्वतःतून विकसित व्हायचे असते. भारतीय रागसंगीत विद्या ही इतकी विविधांगी आणि अथांग आहे की ती आणखी एका नवीन राग-वर्गीकरण पद्धतीची, आणि ती जन्माला घालणाऱ्या एखाद्या संगीत-महात्म्याची वाटच पाहते आहे. भातखड्यांच्या तोडीस तोड विद्वान जर जन्माला आला, त्यानेही भातखंड्यांप्रमाणे विद्वान समाजाचे प्रतिनिधित्व करण्याचे नेतृत्व दाखविले तर आनंदच आहे; संगीत विद्वानांच्या मांदियाळीत भरच पडेल. पण महाराज, प्रश्न तोलामोलाचा आहे, आणि विद्वानांच्या स्वीकृतीचाही. ‘भातखंडे चुकीचे होते’ हे म्हणणे फार सोपे आहे. पण त्यांची चूक सिद्ध करू पाहणाऱ्या विद्वानाने 'स्वतःची थाटपद्धती आधी सलक्षण संगीतबद्ध करून पहावी' ही किमान तर्कसंगत आणि शास्त्रनिष्ठ अशी पहिली अपेक्षा आहे. ज्याप्रमाणे पं. भातखंडे यांनी दशथाट लक्षणगीत मालिका संगीतबद्ध करून स्वतःचे मत केवळ शब्दांनी नव्हे तर 'गायकीद्वारे' दृढ केले, त्याचप्रमाणे नव्या थाटांच्या रचनाकारांनी स्वतःचे मत गायकांमध्ये 'गायकीद्वारे' दृढ करून बघावे.
नवीन विचारांना संगीत क्षेत्रात जागा आहे— निश्चितच. परंतु तो विचार सांगितिक दृष्ट्या तेव्हाच अर्थपूर्ण होतो, जेव्हा तो गायकीतून जिवंत होतो. अन्यथा तो निरर्थक. म्हणून नाईलाजाने म्हणावेसे वाटते, कलाकाराने उगा 'निरर्थक शब्द' वाया घालवायचे की 'सुरेल स्वर' जपायचे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे.
विचार हा शब्दांत सांगता येतो, पण सत्य केवळ अनुभवाद्वारे सिद्ध होत असते—आणि संगीताचा अनुभव हा सदैव 'स्वरांच्या' माध्यमातूनच जन्मतो. म्हणून उत्तम कलाकार तोच जो गळ्याने गाऊन दाखवतो.
पं. विष्णू नारायण भातखंडे हे माझ्यासाठी संगीत तपस्वी आणि ऋषीतुल्य व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या थाटपद्धतीविरोधात उद्दामपणे कुणीतरी दंड थोपटून उभे राहणे आणि त्यांनी रुजवलेल्या संस्कारांची अशी खिल्ली उडवणे हे मला रुचले नाही म्हणून हा लेखप्रपंच. यात कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही. नकळत तसे झाले असल्यास क्षमस्व.
- मा. श्री. सचिन चंद्रात्रे.

