पावसाळा आणि आजारपण
पावसाळा आनंदच घेऊन येतो. पण घरोघर आई-बाबांना चिंता असते ती पाऊस सुरु झाला की मुलांना सर्दी-खोकला होणार. अनेक मुलांना या काळात भयंकर खोकला होतो. रात्री ढास लागते. रात्र रात्र मुलं स्वोकतात. उबळ येते. आई-बाबा औषधं देऊन थकतात. घरगुती उपाय केले जातात. वाफ-शेकणे सगळे होते; पण ढास थांबत नाही. दिवसभर मूल बरे असते. पण शाळेत पाठवता येत नाही. सर्दी, भूक न लागणे, जुलाब होणे हे सारं मुलांच्या संदर्भात सुरु होतं आणि रात्र रात्र जागरणं करून पालकही हैराण होतात. पावसाळ्यात मुलांची आजारपणं अशी वाढतात. त्यात अनेकदा डेंग्यू, मलेरिया, व्हायरल तापाची भीती असतेच. शाळेत गेलं की संसर्गजन्य आजारही मुलांसोबत घरी येतात.
काळजी काय घ्यायची?
1. मुलांची प्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे मुलांच्या आहारविहाराकडे लक्ष द्यायला हवे.
2. पाणी दूषित नाही ना खात्री करा. फिल्टर हा पर्याय नसेल तर उकळलेले पाणी वापरा. 20 मिनिटे पाणी उकळून घ्यायला हवे.
3. उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नका. घरातही अन्नपदार्थ उघडे ठेवू नका.
4. पचायला हलके, गरम अन्न खा. शिळे-पॅकेज फूड-रस्त्यावरचे खाणे टाळा
5. श्वसनाचे आजार लवकर होतात, त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क लावा.
6. मूल आजारी असेल, सर्दी असेल तर शाळेत पाठवू नका, त्यामुळे अन्य मुलांना संसर्ग होतो.
7. घरात माश्या असतील तर त्यांचा बंदोबस्त करा.
8. घरात डास असतील तर त्यावर उपाय शोधा. डास चावल्याने होणारे आजार मुलांसाठी त्रासदायक ठरतात.
9. मुलांना वारंवार हात धुवायला सांगा.
10. पावसात भिजले तर ओले कपडे लवकर बदला, त्यामुळे त्वचेचे विकारही टाळता येतात.