पढंत व बजंत यामधील फरक
आपल्या तबल्याची भाषा विद्वानांनी प्रचंड मेहनतीने व अभ्यासपूर्ण रितीने तयार केली आहे. तबल्याच्या भाषेमध्ये तालव्य, कंठ्य व दंत्य इ. प्रकारचे बोल असतात. 'ओष्ठ्य' प्रकाराचे बोल तबल्याच्या भाषेत वर्ज्य केले आहेत. वाणी-सुलभता व द्रुतगतीत उच्चारण सुलभ व्हावे हा विचार प्रामुख्याने तबल्याची भाषा बनविताना केलेला दिसून येतो. आता बजंतबद्दल सांगायचे झाल्यास वर्णाद्वारे जी भाषा आपण प्रकट करतो (पढंत) ती तबल्यावर विशिष्ट निकासांच्या आधारे वाज़विली असता त्याला 'बजंत' म्हणतात. काही शब्दांच्या बाबतीत 'पढंत' व 'बजंत 'मध्ये फरक दिसून येतो. याला काही कारणे आहेत. काही वेळा दुतलयीत काही अक्षरे उच्चारली जातात. पण वाजविताना त्या अक्षरांचा नाद उच्चारलेल्या अक्षरांच्याजवळ असण्याकडे लक्ष पुरविले जाते. उदा. काही बोलसमूहात 'त्रक' या शब्दातील 'क' हा शब्द वायाँवर न काढता तबल्याच्या शाईवरच काढला जातो. काही काही बोलांच्या बाबतीत असे घडते की, पढंतप्रमाणे त्यांची बजंत करणे तसेच बजंतप्रमाणेच त्याची पढंत करणे जवळजवळ अशक्य असते. त्यामुळे अशा बोलांच्याबाबतीत पढंत व बजंत वेगवेगळी होते. द्रुतलयीतही त्या बोलाची पढंत व बजंत सुलभ व्हावी यादृष्टीने विद्वानांनी त्याची रचना केली आहे. उदा. 'धिकिट' हा बोल. या बोलाची पढंत 'धिकिट' व बजंत 'धितीट' अशी आहे. याचे कारण एवढेच कि 'धितीट' द्रुत लयीत म्हणणे अवघड व 'धिकिट' वाजवणे अवघड. म्हणूनच पढंत 'धिकिट' व बजंत 'धितिट' अशी बनली.
तबल्यातील बोलपंक्तिंना काही काव्यात्मक अर्थ, सौंदर्य, वेग लाभावा हाही विशिष्ट निकासामागील एक प्रमुख उद्देश असतो. यामुळेही पढंत व बजंतमध्ये फरक झाले. आधी सांगितल्याप्रमाणे 'धिन' या बोलानंतरच 'धा' हा बायाँवर वेगळा आघात करून न वाजता तो 'ना' असा वाजतो. पण आपण उच्चारण 'धा' असे करतो. आपण पढत 'धिरधिर' अशी करतो पण बजंत मात्र 'धिरतिर' अशी असते. या सर्व गोष्टी केवळ वेगाच्या हव्यासापोटी नाहीत. तर आपण बायाँच्या पहिल्या 'धि'ची आस दुसऱ्या 'धि' पर्यंत पोचवू शकत असू तर सौंदर्य वृद्धिंगत होते. त्या ऐवजी दोन्ही 'घि' डग्ग्यावर वाजवले तर तो शब्द नाहक तुटेल ही भीती असते. परिणामी वाक्य तुटेल व त्याबरोबरच अर्थही. म्हणून या सर्वांचा विचार करूनच पढत व बजंतमध्ये काही ठिकाणी अंतर ठेवले आहे. 'गदिगन' हा बोल म्हणताना 'गदिगन' असा तर वाजविताना 'गदिकन' असा आहे. हा मुळात खुला, पखवाजाचा बोल आहे. कदाचित दोन्ही 'ग' साठी पंजाचे खुले आघात वेगाच्या दृष्टीने अनुकूल नसावेत. तसेच ते नादसौंदर्याच्या दृष्टीने तेवढे चांगले वाटत नसावे. म्हणून याची बजंत 'गदिकन' अशी झाली असेल. यामध्ये पहिला 'ग' खुला व दुसरा बंद असल्यामुळे विरोधी नादसंगती अनुभवायला मिळते व वादन वेगसुलभ बनते. असे म्हणतात की भारतासारख्या खंडप्राय देशात दर १४ मैलावर भाषा बदलते. अर्थातच मातृभाषेचा अथवा स्थानिक भाषेचा प्रभाव तबल्याच्या भाषेच्या उच्चारणावरही पडणे साहजिक आहे. उदा. काही जण 'तिटकत' काहीजणतिटीकत' तर काही जण 'तिटीकोता' असे उच्चारतात. काही ठिकाणी 'धेरधेर', 'घिरीधिरी', 'धिरधिर' असे नानाविध उच्चार ऐकायला मिळतात. पण असे जरी असले तरी याची बजंत सर्वसाधारणपणे सारखीच, म्हणजे बाज व घराणी यांना अनुसरून असते.