संगीतातील शोध पद्धती
शोध शब्दाचे अर्थ आणि पर्याय
शोध शब्दाची व्युत्पत्ती 'शुध' धातूपासून झाली आहे. शुध म्हणजे शुध्द करणे. विविध शब्दकोशांच्या अनुसार याचे अर्थ पुढीलप्रमाणे आहेत- शुध्दिकरण, स्वच्छीकरण, सुधार, म्हणजेच याअंतर्गत प्राप्त माहिती शुध्द स्वरूपात लोकांसमोर ठेवणे, किंवा प्राप्त माहितीचे सुव्यवस्थितपणे अध्ययन करून त्यातील निष्कर्ष मांडणे. याचे हिंदी पर्यायवाची शब्द म्हणून अन्वेषण, अनुसंधान, खोज, संशोधन इत्यादीचा उल्लेख केला जातो.
अनुसंधान हा शब्द धातु, अनु आणि सम उपसर्ग, आणि लुट या प्रत्ययाने बनतो. याचा अर्थ आहे, शोध, तत्त्व, सूक्ष्म निरीक्षण, पर्यावेक्षण, परीक्षा इ. याचाच अर्थ अतिरिक्त चिंतन असाही होतो. म्हणजेच कुठल्याही वस्तूची वर्तमान आणि भूतकाळातील परिस्थिती काय होती, तसेच तिचे भविष्यकालीन स्वरूप कसे असेल याचा विचार करणे म्हणजे अनुसंधान होय. 'खोज' शब्दाची व्युत्पत्ती प्राकृतातील 'खोज्ज' या शब्दापासून झाली. खोज्ज म्हणजे पदचिन्ह, याचा दुसरा अर्थ निशाण, चिन्ह अथवा शोध असाही होतो. प्रवाहाच्या विरोधात काम करणे म्हणजे अनुसंधान. संधान म्हणजे लक्ष्य स्थिर करणे. अनुसंधान म्हणजे लक्ष्याकडे जाणे. हे सर्व पर्यायवाची शब्द आहेत. शोध या शब्दाचे इंग्रजी पर्याय पुढीलप्रमाणे मिळतात.
१) Discovery
२) Research
३) Doctorate
४) Thesis
५) Ph.D.
१) Discovery म्हणजे अनावरण करणे किंवा उघडणे.
Discovery of facts :- अज्ञात तथ्यांचा शोध घेणे हा विद्यापीठीय स्तरावरील संशोधनाचा पहिला उद्देश आहे. Discovery of facts विस्मृत सिध्दांताविषयीचे अनुसंधान.
२) Research :- Re + Search म्हणजेच शोधाची पुनरावृत्ती, आधीच उपलब्ध असलेल्या तथ्यांना सुस्पष्ट रीतीने प्रस्तुत करणे, किंवा पूर्वी अस्तित्वात असलेल्या अशा काही गोष्टी, ज्या काळाच्या ओघात लुप्त झालेल्या आहेत, त्यांना पुनःप्रकाशात आणणे. उदा. संगीताच्या संदर्भात असे राग, जे पूर्वी प्रचारात होते, परंतु आता ते प्रचारात नाहीत, किंवा त्यांच्या स्वरूपात परिवर्तन झाले आहे, त्यावर अभ्यास करणे.
३) Doctorate - सन्माननीय व्यक्ती, पण शोध क्षेत्रात याचा अर्थ आहे, शोध उपाधी ने अलंकृत व्यक्ती. अर्थात विश्वविद्यालयाच्या नियमांचे पालन करून शोध उपाधि प्राप्त केलेली व्यक्ती म्हणजे डॉक्टर.
४) Thesis - प्रतिज्ञा, विचार, चिंतन, थिसिस म्हणजे असा शोधप्रबंध, जो संशोधनकर्त्याच्या चिन्तन, विचार अथवा निश्चित प्रतिज्ञेचे फलित होय.
५) Ph.D. याचा अर्थ आहे Doctor of Philosophy. Philosophy चा अर्थ आहे तत्त्वज्ञान. म्हणजेच चिंतन-प्रधान व्यक्ती. • एखाद्या विषयावर परिश्रमपूर्वक अभ्यास करून लिहिल्या गेलेल्या प्रबंधासाठी मिळणाऱ्या उपाधीला Ph.D. उपाधी म्हणतात. हिंदीत याला 'दर्शनाचार्य' असे म्हणतात. Doctor - कोणत्याही ज्ञानक्षेत्रात आपले पांडित्य आणि ज्ञानाच्या आधारे शिक्षण आणि विश्लेषण करण्यात अधिकारी असणाऱ्या व्यक्तीला Doctor असे संबोधतात.
• ज्या व्यक्तीने एखाद्या विशिष्ट क्षेत्रात अनेक वर्षापर्यंत सतत साधना आणि अभ्यास करून विविध परीक्षा उत्तीर्ण केलेल्या आहेत, ज्याने लिहिलेल्या लघुशोधप्रबंधांना (Minor Research Projects) मान्यता मिळाली आहे, आणि युनिवर्सिटीद्वारे प्रदान केली जाणारी Ph.D. ही शैक्षणिक क्षेत्रातील उपाधी ज्याला प्राप्त झालेली आहे, अशा व्यक्तीला डॉक्टर असे म्हणतात. अशी व्यक्ती, जिला विद्यापीठ / विश्वविद्यालयाद्वारे कोणत्याही क्षेत्रातील असाधारण योगदानाच्या सन्मानार्थ डॉक्टरेट देण्यात येते, तिला 'Doctor' असे म्हणतात. म्हणजेच कोणत्याही विषयातील ज्यांच्यावर आधी विचार झालेला नाही, अशा तत्त्वांवर अभ्यास करून विश्लेषणाद्वारे निश्चित निष्कर्षाप्रत पोहोचणे आणि त्याचे समर्थन करणे, विवादास्पद किंवा अस्पष्ट विषयाला पूर्णपणे स्पष्ट करून निश्चित लक्ष्य साध्य करणे या सर्व गोष्टींचा संशोधनात समावेश होतो. परंतु या कार्यात मौलिकता असणे आवश्यक आहे. संशोधक ज्या विषयावर संशोधन करीत आहे, त्याच विषयावर त्यापूर्वी संशोधन झालेले नसावे. विज्ञानाप्रमाणे संगीतात कुठल्याही गोष्टीचा आविष्कार करणे शक्य नसले, तरी प्राप्त सिध्दांतांच्या आधारे एखाद्या विषयाला स्पष्ट रूप देणे, आणि त्या आधारे नवीन परिमाण मांडणे यालाच मौलिकता म्हणता येईल.
शोध शब्द हा इंग्रजीतील Research चा समानार्थी शब्द आहे. अनुसंधान या हिंदी शब्दाचाही अर्थ शोध असाच आहे. अनुसंधान म्हणजे विखुरलेल्या सूत्रांना एकत्रित बांधणे. परंतु शोध हा शब्द आकाराने लहान, उच्चारण्यास सोपा असल्यामुळे, तसेच Research संबंधी इतर शब्दांचे अर्थ हिंदी अथवा मराठी भाषेमध्ये शोध शब्दांच्या आधारे व्यवस्थितपणे स्पष्ट होत असल्याने संशोधन प्रणालीसाठी शोध या शब्दाचा अधिक उपयोग केला गेला. हळूहळू संशोधनामध्ये शोध या शब्दाचा प्रयोग अधिकाधिक प्रचलित आणि सर्वमान्य होतआहे. शोध-विषयक संबंधित काही शब्द पुढीलप्रमाणे आहेत.
१) Research Scholar शोधार्थी
२) Research Institute शोध संस्थान
3) Research Methodology शोध-प्रविधी
४) Research Paper शोध-पत्र
५) Research Scholarship शोध वृत्ती
६) Research Subject शोध-विषय
७) Research Thesis शोध-प्रबंध
८) Research Work शोध-कार्य