ग्वाल्हेर घराणे
अभिजात संगीताची घराणी व परंपरा
सर्व घराण्यांचा उगम ग्वाल्हेर घराण्यातून झाला. ग्वाल्हेर घराणे हा सर्व घराण्यांचा 'वंशवृक्ष' आहे. नियामतखाँ उर्फ सदारंग हे तानसेनाच्या मुलीच्या वंशातले दहावे गायक. सदारंगाच्या तिसऱ्या-चौथ्या पिढीपासून ग्वाल्हेर घराण्याची सुरुवात झाली. या प्रकारे ग्वाल्हेर घराण्याची परंपरा चालू राहिली. पुढे नियामतखाँ व फिरोजखाँ या दोन बंधूंची नावे सदारंग व अदारंग अशी चिजांमधून टिकून राहिली. ह्या परंपरेचा मागोवा सदारंग-अदारंगापासून नथ्थन पीरबक्ष, हस्सूखाँ, हद्दूखाँ, गुलाम रसूल, बड़े महंमदखों, वासुदेवबुवा जोशी आणि बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर असा घेता येतो. बाळकृष्णबुवांनी जी ख्यालगायकी महाराष्ट्रात प्रचलित केली आणि जिचा प्रसार केला ती ख्यालगायकी ग्वाल्हेर गायकी म्हणून ओळखली जाते. ग्वाल्हेर गायकीमध्ये ध्रुपदगायनाचा सांगीतिक आविष्कार व हिशेबीपणा मागे पडला. ह्या गायकीने संगीताला गतिमानता आणली. स्वर आणि लयीच्या समन्वयातून जो सांगीतिक आकृतिबंध साकारला त्याचा सुंदर मेळ साधला गेला व ही गायकी सर्वश्रेष्ठ ठरली. ग्वाल्हेर गायकीने अभिजात संगीतातील ध्रुवपद गायकीनंतरची विकसित अवस्था म्हणून महाराष्ट्रातील संगीतक्षेत्रात प्रवेश केला व अभिजात संगीताला प्रगत केले. संगीता धन प्राप्त करून घेतलं व ते महाराष्ट्रातील कलावंतांना भरभरून दिलं. आपल्या पुढील पिढीला कलासाधना सुकर व्हावी ह्याची काळजी ग्वाल्हेर घराण्यानेच प्रामुख्याने वाहिली. शंकरराव पंडितांनी त्यांचे शिष्य राजाभैय्या पूछवाले व कृष्णराव पंडित यासारखे अनेक शिष्य तयार केले. या दोघांनी पुढे संगीत विद्यालय आणि संगीत समाज अशा संस्था चालवून संगीताच्या प्रसारार्थ ग्रंथही प्रकाशित केले. अनेक विद्यार्थी तयार केले. ग्वाल्हेर घराण्याच्या शिष्यप्रशिष्यांनी संगीत क्षेत्रात विविध प्रकारचे कर्तृत्व दाखविले. आपल्या परंपरेत ते प्रभावी गायक तर ठरलेच पण केवळ कलावंत निर्माण करावा ह्या अपेक्षेने नव्हे तर जास्तीत जास्त लोकांना संगीताचे ज्ञान व्हावे, कलेची उपासना करण्याची वृत्ती निर्माण व्हावी व समाजात संगीताची अभिरुची वाढावी या हेतूने ग्वाल्हेर घराण्याच्या सर्व गायकांनी संगीताचे शिक्षण देण्याचे प्रयत्न केले. संगीताचे अध्यापन शालेय शिक्षणात करून त्यासाठी स्वरलेखनासह पुस्तके लिहिण्याचा उपक्रम बऱ्याचजणांकडून झाला. केवळ विद्याकरताच नव्हे तर जिज्ञासूंच्या माहितीकरिता पुस्तकांच्या माध्यमातून संगीताच्या कलेचे व शाखाचे ज्ञानभांडार उघडले गेले. त्यामुळे संगीताच्या शिक्षणपद्धतीतील गुरुशिष्यपरंपरेने निर्माण झालेले दोष दूर करण्याचा प्रयत्न ग्वाल्हेर घराण्याच्या गायकांनीच केला. संगीत विषयाचा प्रचलित शालेय व विद्यापीठीय शिक्षणक्रमात अंतर्भाव व्हावा व ते न जमल्यास तसाच एक स्वतंत्र अभ्यासक्रम शिक्षणक्रम अंमलात आणावा ह्या कल्पनेलाही ग्वाल्हेर घराण्याच्या गायकांनी व संगीतज्ञांनी उचलून धरले. संगीतात पदवीकरिता अभ्यासक्रम तयार करून संगीताला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. ग्वाल्हेर घराण्याच्या परंपरेत अनेक प्रभावी गायक तयार झाले. पं. विष्णु दिगंबर पलुस्कर, पं. ओंकारनाथ ठाकुर, पं. विनायकबुवा पटवर्धन, पं. नारायणराव व्यास, पं. बी. आर. देवधर अशा अनेक महान गायकांनी व संगीतज्ञांनी आपल्या घराण्याचं नाव उज्ज्वल केलं व सर्व प्रकारे संगीताचा प्रसार, प्रचार करून संगीताची प्रतिमा जनमानसात उंचावली. ग्वाल्हेर घराण्याने संगीताचा विकास व प्रचार होण्यासाठी जे कार्य केले, त्याला योगदान हाच शब्दयोग्य ठरेल. सर्व घराण्यांमध्ये ग्वाल्हेर घराणंच संगीताच्या उत्कर्षासाठी झटलं. विकास, प्रसार व उत्कर्ष ह्या संगीताच्या तिन्ही अवस्थांना ग्वाल्हेर घराण्याची परंपराच कारणीभूत झाली आहे. म्हणून संगीताच्या विकासात सर्व घराण्यांमध्ये ग्वाल्हेर घराण्याचं योगदान फार मोठं आहे.
ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीची वैशिष्ट्ये
१. धृपद अंगाचे ख्याल
२. जोरदार खुला व भरदार आवाज
३. बेहलाव्याने रागविस्तार
४. गमकांचा उपयोग
५. लयकारीच्या लडंत ताना
६. अलंकारिक व सपाट आरोही, अवरोही ताना
७. ठुमरीऐवजी तराणा प्रकार
८ तयारीवर विशेष भर
९. स्वर- लपीचे संतुलन, मध्यगतीने ख्याल गाणे
१०. उत्तम बंदिशींचा संग्रह व पाठांतरावर भर, ही ग्वाल्हेर घराण्याच्या गायनशैलीची वैशिष्ट्ये म्हणता येतील.