वाद्य वर्गीकरण
भारतीय संगीतात गायनाप्रमाणे वादनालाही महत्त्वाचे स्थान आहे. वादनाशिवाय गायनाला पूर्णत्व नाही. प्राचीन काळापासून शिल्पकलेत, चित्रकलेत, मूर्तिकलेत वाद्यांचा उल्लेख आढळतो. तसेच रामायण महाभारतातील ग्रंथात गायन-वादन-नर्तनाचा उल्लेख मिळतो. वाद्यांचा नाद, आकार, प्रकार, उपयोग, वादनशैली, नादोत्पत्ती इत्यादींनुसार वाद्यांचे चार प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते.
• भारतीय वाद्यांचे प्रकार :
१. तत् वाद्ये
२. सुषीर वाद्ये
३. अवनद्ध वाद्ये
४. घन वाद्ये
(१) तत् वाद्ये :
ज्या वाद्यांमधून तारांच्या साहाय्याने स्वर उत्पन्न होतात, त्या वाद्यांना ‘ तत् वाद्ये’ असे म्हणतात. या मध्ये (अ) तत् वाद्य, (ब) वितत् वाद्य असे दोन प्रकार पडतात.
(अ) तत् वाद्ये : नखी, मिजराब किंवा बोटांच्या साहाय्याने तारा छेडून वाजवल्या जाणाऱ्या वाद्यांना ‘तत् वाद्ये’ असे म्हणतात. उदा. तंबोरा, सतार, सरोद, वीणा स्वरमंडल इत्यादी.
(ब) वितत् वाद्ये :- जी वाद्ये गजाच्या साहाय्याने वाजवली जातात त्यांना ‘वितत् वाद्ये’ असे म्हणतात. उदा. व्हायोलिन, सारंगी, दिलरूबा ई.
(२) सुषीर वाद्ये :
जी वाद्येहवेच्या मदतीने वाजवली जातात त्यांना सुषीर वाद्य असे म्हणतात. याचेही दोन प्रकार आहेत.
(अ) रीड किंवा पत्तीच्या साहाय्याने वाजवली जाणारी वाद्ये. उदा. संवादिनी (हार्मोनियम), पायपेटी इत्यादी.
(ब) फुंकेच्या साहाय्याने वाजवली जाणारी वाद्ये. उदा. बासरी, बिगुल, शंख, शहनाई, क्लॅरोनेट इत्यादी.
(३) अवनद्ध वाद्य :
जी वाद्ये चामड्याने मढवलेली असतात त्यांना ‘अवनद्ध वाद्ये’ असे म्हणतात. उदा. मृदंग, पखवाज, तबला, ढोलक, नाल, ताशा, नगारा, डफ, खंजिरी, डमरू इत्यादी.
(४) घन वाद्य :
जी वाद्ये विशिष्ट धातूच्या साहाय्याने एकमेकांवर आघात करून वाजवली जातात त्यांना ‘घन वाद्ये’ असे म्हणतात. उदा. जलतरंग, काष्ठतरंग, मंजिरी, चिपळ्या, घुंगरू, टिपरी, लेझीम, घंटा, झांज इत्यादी.